रोहितच्या क्लासला तोड नाही! त्याच्यात 45व्या वर्षापर्यंत खेळण्याची ताकद – योगराज सिंग
रोहित शर्माने टी20 आणि कसोटीनंतर आता वनडेतूनही निवृत्ती घ्यावी का? अलीकडे क्रिकेटच्या मैदानात याच चर्चेला उधाण आलं आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा मात्र 2027 च्या वर्ल्ड कपपर्यंत खेळण्याच्या विचारात आहे. तर दुसरीकडे टीकाकारांचे म्हणणे आहे की, रोहितने आत्ता निवृत्ती घेतली पाहिजे आणि तरुण खेळाडूंना संधी द्यावी. सध्या रोहित शर्मा 38 वर्षांचा असून पुढील वनडे वर्ल्डकपपर्यंत तो 40 वर्षांचा होईल. फिटनेससह फक्त वनडे सामन्यांसाठी उपलब्ध राहण्यामुळे त्याच्यावर टीका होत आहे.
पण या टीकेवर टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू आणि युवराज सिंह यांचे वडील योगराज सिंह यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. योगराज म्हणाले की, भारताला रोहित शर्मा खूप गरजेचा आहे. तो हवे तर 45 वर्षांपर्यंतही क्रिकेट खेळू शकतो.
“रोहित शर्मा… त्याच्याबद्दल अनेक लोक निरर्थक बोलतात. पण मी आधीच सांगितले होते की रोहित माझा माणूस आहे, माझा खेळाडू आहे. त्याची फलंदाजी एकीकडे आणि बाकी खेळाडूंची फलंदाजी दुसरीकडे इतका फरक आहे. त्याची खेळी म्हणजे जगभरापेक्षा वेगळी क्लास आहे. मी तर म्हणेन, ‘रोहित, अजून 5 वर्षे देशासाठी खेळ यार.’ फिटनेसवर मेहनत कर, त्याच्यासाठी चार माणसे लाव, रोज सकाळी 10 किमी धावायला लाव. त्याच्यात 45 वर्षांपर्यंत खेळण्याची क्लास आहे.”
योगराज सिंग पुढे म्हणाले, “माझा विश्वास आहे की तुम्ही जितके जास्त देशांतर्गत क्रिकेट खेळाल, तितके फिट राहाल. चॅम्पियन्स ट्राॅफी फायनलमध्ये मॅन ऑफ द मॅच कोण झाला? रोहित शर्मा. त्यामुळे तुम्हाला फक्त त्याच गोष्टींवर बोलायला हवे ज्याची तुम्हाला माहिती आहे. जर तुम्हाला त्याच्या फिटनेस आणि खेळाबद्दल बोलायचे असेल, तर आधी स्वतः किमान काही पातळीवर क्रिकेट खेळलेले असावे. अन्यथा अशा बोलण्यात काही अर्थ नाही.”
Comments are closed.