एक डाव, दोन विक्रम… रोहित शर्माने 36 वर्षे जुना विक्रम मोडला; सचिन-विरूलाही मागे सोडले
कर्णधार शुभमन गिलची नाबाद 84 धावांची धडाकेबाज खेळीच्या बळावर हिंदुस्थानने पहिल्या वनडे सामन्यात अफगाणिस्तानचा 7 विकेट्सने पराभव केला. पावसाच्या व्यत्ययामुळे प्रत्येकी 25 षटकांच्या खेळवण्यात आलेल्या या सामन्यात हिंदुस्थानने एकतर्फी विजय मिळवला. या सामन्यात हिटमॅन रोहित शर्मा याने ‘डबल’ धमाका करत दोन विक्रम आपल्या नावावर केले.
रोहित शर्माने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरताच इतिहास रचला. रोहित शर्मा आता हिंदुस्थानमधून वनडे क्रिकेट खेळणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. त्याने 39 वर्षे आणि 44 दिवस वय असताना हा सामना खेळला. यासह रोहितने हिंदुस्थानचे खेळाडू मोहिंदर अमरनाथ यांचा तब्बल 36 वर्षे जुना विक्रम मोडला. अमरनाथ यांनी 1989 मध्ये 39 वर्षे आणि 36 दिवस वय असताना आपला शेवटचा वनडे सामना खेळला होता.
सचिन-विरूला मागे टाकले
रोहित शर्माने पहिल्या वनडेमध्ये सलामीवीर म्हणून 16 हजार धावा पूर्ण केल्या आणि महान फलंदाज सचिन तेंडुलकर व वीरेंद्र सेहवागला मागे सोडले. हिंदुस्थानकडून सलामीवीर म्हणून वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा रोहित हा आता अव्वल खेळाडू ठरला आहे. सेहवागच्या नावावर 15,758 तर सचिनच्या 15,335 धावा होत्या. रोहितच्या नावावर आता 16,010 धावा आहेत.
स्केलिंग माउंट 16,000
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून रोहित शर्माने केलेला एक महत्त्वाचा टप्पा
अपडेट्स ▶️ https://t.co/lCuohEZYAl #TeamIndia | #INDvAFG | @IDFCFIRSTBank | @ImRo45 pic.twitter.com/vyC4C0oPvg
— BCCI (@BCCI) १३ जून २०२६
शुभमन गिलचा विक्रम
सलामीवीर शुभमन गिलने 84 धावांच्या मॅचविनिंग खेळीदरम्यान वनडे क्रिकेटमधील आपल्या 3000 धावा पूर्ण केल्या. त्याने अवघ्या 62 डावांमध्ये हा पराक्रम केला. वनडेत सर्वात जलद 3 हजार धावा करणारा तो हिंदुस्थानचा पहिला तर जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम अमलाने 57 डावांत हा टप्पा गाठून जागतिक विक्रम आपल्या नावावर ठेवला आहे.
Comments are closed.