“रोहितला निवृत्तीबाबत पूर्ण स्वातंत्र्य असावे” माजी क्रिकेटपटूचे मोठे विधान!
भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या भविष्याबद्दल सतत चर्चा सुरू आहे. दरम्यान आता असे मानले जात आहे की आता तो कदाचित 2027 चा विश्वचषक खेळण्याची तयारी करत आहे. रोहितच्या निवृत्तीबद्दल सतत विधाने होत आहेत आणि आता माजी भारतीय खेळाडू आणि निवडकर्ता दिलीप वेंगसरकर यांनीही आपले मत मांडले आहे. रोहितसारख्या मोठ्या खेळाडूला स्वतःच्या इच्छेनुसार निवृत्ती घेण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे असे वेंगसरकर यांचे मत आहे.
रोहित शर्माच्या खराब फलंदाजीमुळे त्याच्यावर सतत टीका होत होती. असे असूनही, त्याने भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यात मोठी कामगिरी केली, अंतिम सामन्यात त्याने 76 धावांची शानदार खेळीही खेळली. अंतिम सामन्यानंतर रोहित निवृत्त होऊ शकतो असे वृत्त होते पण सामन्यानंतर त्याने सांगितले की गोष्टी जशा आहेत तशाच चालू राहतील. त्याच वेळी, ताज्या अहवालात असे म्हटले आहे की रोहितने 2027 च्या विश्वचषकात खेळण्याचे लक्ष्य ठेवले आहे, त्यासाठी तो भारतीय सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायरसोबत त्याच्या फिटनेस तसेच फलंदाजीवर काम करेल.
दिलीप वेंगसकर म्हणले, “मी काही भविष्यवक्ता नाही. 2027 च्या विश्वचषकासाठी अजून बराच पल्ला गाठायचा आहे. त्याच्या फॉर्म आणि फिटनेसवर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील. आत्ताच काही अंदाज बांधणे योग्य ठरणार नाही. मात्र, कर्णधार आणि खेळाडू म्हणून त्याची गुणवत्ता निर्विवाद आहे. लोक उगाच त्याच्या निवृत्तीच्या चर्चा का करत आहेत, हेच कळत नाही, त्याच्या तोलामोलाच्या खेळाडूला स्वतःच्या भविष्यासंदर्भात निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार असायला हवा. सध्याच्या घडीला तो मैदानावर ज्या पद्धतीने खेळतोय, ते निश्चितच प्रेरणादायी आहे. एकदिवसीय सामन्यांत त्याने तीन द्विशतके ठोकली आहेत, याहून अधिक काय बोलावे?”
न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यापूर्वी रोहित शर्माच्या बॅटने फारशी चमक दाखवली नव्हती, पण जेव्हा सर्वांत महत्त्वाचा सामना आला, तेव्हा त्याने जबाबदारी स्वीकारली आणि संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला. आता आयपीएल 2025 मध्ये ‘हिटमॅन’ काय कमाल करतो, आणि त्यानंतर तो आपली पुढील रणनीती कशी आखतो, हे पाहणे खरेच रोचक ठरेल!
Comments are closed.