MI vs GT सामन्यापूर्वी रोहितने सिराजला दिली विश्वचषकाची खास रिंग! पाहा VIDEO
यंदाच्या आयपीएल हंगामातील 56वा सामना मंगळवारी (6 मे) वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यासाठी हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स आणि शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सचा संघ मैदानात उतरेल. सामन्यापूर्वी रोहित शर्माने (Rohit Sharma) मोहम्मद सिराजला (Mohammed Siraj) एक खास टी20 विश्वचषक (T20 World Cup) रिंग भेट दिली.
गेल्या वर्षी टी20 विश्वचषकासाठी 15 जणांच्या संघातील सर्व भारतीय खेळाडूंना देण्यात आलेली ही खास रिंग. बार्बाडोसमध्ये झालेल्या फायनल सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता. या रिंगमध्ये संबंधित खेळाडूंचे नाव आणि जर्सी क्रमांक आहे ज्यावर अशोक चक्र बसवले आहे.
विजयानंतर, संपूर्ण भारतीय संघ मुंबईत एका खुल्या बसमधून परेड करत वानखेडे स्टेडियमकडे जात होता जिथे बीसीसीआयने एका शानदार समारंभात खेळाडूंचे स्वागत केले. या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या बीसीसीआय नमन पुरस्कारांदरम्यान, 2024च्या टी20 विश्वचषक विजेत्या संघातील खेळाडूंना कस्टमाइज्ड अंगठ्या देण्यात आल्या. वैयक्तिक कारणांमुळे सिराज पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहू शकला नव्हता.
बीसीसीआयने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये रोहित म्हणाला, “हे मोहम्मद सिराजसाठी आहे,” पुढे रोहित म्हणाला, “आम्हाला समारंभात तुझी आठवण आली. तू आमच्या टी20 मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली. म्हणून मी तुला अभिमानाने एक अतिशय खास अंगठी देत आहे जी आपल्या सर्वांसाठी बनवण्यात आली होती. दुर्दैवाने सिराज तिथे नव्हता म्हणून मी त्याला सादर करू इच्छितो.” शेवटी मोहम्मद सिराजने “चॅम्पियन” असे म्हणत अंगठी दाखवली.
Comments are closed.