'द हंड्रेड'मध्ये रोहित शर्मा! एमआय लंडनसाठी 40 चेंडूंत निकोलन पूरन आणि सॅम करन यांची विक्रमी खेळी
इंग्लंडविरुद्धची वनडे मालिका संपल्यानंतर भारताचा अनुभवी सलामीवीर रोहित शर्मा मायदेशात परतला नाही. तो इंग्लंडमध्येच असून त्याने ‘द हंड्रेड 2026’ लीगमध्ये आपली उपस्थिती दर्शवली. तो 21 जुलै रोजी खेळल्या गेलेल्या उद्घाटन सामन्यात एमआय लंडनला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचला. सनरायझर्स लीड्सविरुद्धच्या सामन्यात त्या सामन्यात लंडनने विजय मिळवला. यामध्ये कर्णधार सॅम करन आणि निकोलन पूरन यांनी विक्रमी खेळी केली.
रोहित हा सामना एमआय लंडनच्या मालक नीता अंबानी यांच्यासोबत बसून पाहताना दिसला. त्याचे व्हिडिओही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.
एमआय लंडन विरुद्ध सनरायझर्स लीड्स सामना ओव्हलवर खेळला गेला. तेथिल रोहितचे व्हिडिओ एमआय लंडनने सोशल मीडियावर शेअर केले आहे. त्याला स्टेडियमबाहेर पाहताच चाहत्यांचा जल्लोष दिसला. त्याच्यासोबत सेल्फी आणि फोटो काढण्यासाठी चाहते उत्सुक दिसले.
सामन्याची स्थिती
या सामन्यात एमआय लंडनने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सनरायझर्स लीड्सने 99 चेंडूंत 10 विकेट्स गमावत 143 धावा केल्या. यामध्ये लंडनकडून प्रभावी कामगिरी स्थानिक गोलंदाज रिचर्ड ग्लीसनने केली. त्याने 19 चेंडूत 25 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. करनने दोन विकेट्स घेतल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना पूरन-करनचे वादळ
एमआय लंडनला 100 चेंडूंत 144 धावांचे लक्ष्य होते. लंडनची सुरूवात चांगली झाली नाही. पहिल्या 8 चेंडूंतच त्यांनी दोन विकेट्स गमावल्या होत्या. विल जॅक्स (2) आणि जेसन रॉय (0) लवकरच बाद झाले. काही क्षणानंतर जेम्स विन्सही (17) बाद झाला. त्यानंतर पूरन आणि करन यांनी डाव सांभाळला.
पूरनने 22 चेंडूंत 5 चौकार आणि तेवढेच षटकार मारत नाबाद 58 धावा केल्या. करनही 39 चेंडूंत 60 धावा करत नाबाद राहिला. यादरम्यान त्याने 5 चौकार आणि 3 षटकार मारले. याबरोबर दोघांनी एमआय लंडनसाठी चौथ्या विकेटची सर्वोच्च भागीदारी नोंदवली. दोघांनी 40 चेंडूंत 93 धावांची भागीदारी केली.
पूरन आणि करनच्या जबरदस्त खेळीमुळे एमआय लंडनने अवघ्या 84 चेंडूंमध्येच लक्ष्य पार केले. त्यांनी केवळ 3 विकेट्स गमावत 144 धावा केल्या. पूरनने स्फोटक फलंदाजीआधी क्षेत्ररक्षणातही विशेष कामगिरी केली. त्याने दोन उत्तम झेल घेतले. तसेच एक धावबाद करण्यात मदत केली. त्यामुळे तो ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरला.
एमआय लंडनचा पुढील सामना 25 जुलैला वेल्श फायरविरुद्ध आहे. (Rohit Sharma in ‘The Hundred 2026 support for MI London Nicholas Pooran and Sam Curran record-breaking innings vs Sunrisers Leeds)
Comments are closed.