रोहित शर्मा वर्ल्ड कपच्या योजनांबाहेर; ज्याने अद्याप वनडे पदार्पण केले नाही, तो खेळाडू घेणार त्याची जागा
रोहित शर्माकडून अलीकडेच भारतीय वनडे संघाचे नेतृत्व काढून घेतले गेले असून त्याच्या जागी शुबमन गिलला वनडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. कसोटी आणि टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला रोहित आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यात केवळ फलंदाज म्हणून खेळताना दिसणार आहे. स्टार फलंदाज विराट कोहलीदेखील 19 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत चमक दाखवणार आहे. दोघेही मार्च 2025 नंतर पुन्हा भारतीय जर्सीत दिसतील. मात्र, एका अहवालाने क्रिकेटविश्वात खळबळ उडवली आहे.
'द टेलिग्राफ’च्या अहवालानुसार, बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले आहे की रोहित आणि विराट दोघेही “त्यांच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर” आहेत. दोघेही येत्या काही महिन्यांत निवृत्तीची घोषणा करू शकतात किंवा वनडे संघातून बाहेर होऊ शकतात. सध्या रोहित 38 वर्षांचा आहे, तर कोहली नोव्हेंबरमध्ये 37 वर्षांचा होईल. अहवालानुसार निवड समिती अभिषेक शर्मा, तिलक वर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांच्या प्रगतीने खूप प्रभावित झाली आहे आणि लवकरच या तिघांना वनडे संघात संधी दिली जाऊ शकते. विशेष म्हणजे, 25 वर्षीय अभिषेक शर्माला रोहितचा संभाव्य उत्तराधिकारी मानले जात आहे, कारण रोहितप्रमाणेच तोही ओपनिंग करतो.
अभिषेकने अद्याप भारतासाठी वनडे पदार्पण केलेले नाही. मात्र, त्याने 24 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आक्रमक फलंदाजी करत दमदार छाप सोडली आहे. अलीकडेच झालेल्या आशिया कप 2025 स्पर्धेत त्याने 7 सामन्यांत सर्वाधिक 314 धावा केल्या असून त्याचा स्ट्राइक रेट तब्बल 200.00 इतका आहे. पॉवरप्लेच्या पहिल्या सहा षटकांत तो गोलंदाजांची अक्षरशः धुलाई करतो, ज्यामुळे प्रतिस्पर्धी संघावर ताण येतो.
एका सूत्राच्या मते, “अभिषेक टी20 मध्ये पॉवरप्लेच्या सहा षटकांत जबरदस्त प्रदर्शन करतो. कल्पना करा, जर त्याला वनडेमध्ये 10 षटके खेळण्याची संधी मिळाली आणि तो टिकला, तर काय कमाल घडेल! तो रोहितपेक्षा अधिक प्रभावी ठरू शकतो आणि भारताला झपाट्याने सुरुवात करून देऊ शकतो.”
Comments are closed.