दुबईत टीम इंडियाला खरच फायदा? रोहित शर्माने दिले खणखणीत उत्तर!

पाकिस्तान यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करत आहे, पण भारतीय क्रिकेट संघ त्यांचे सामने दुबईमध्ये खेळत आहे. सुरक्षेच्या कारणास्तव बीसीसीआयने टीम इंडियाला पाकिस्तानमध्ये पाठवण्यास नकार दिला होता, त्यानंतर पीसीबीने भारताचे सामने दुबईमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. आता सर्व लीग सामने जिंकून भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे, परंतु यामुळे काही माजी दिग्गजांना त्रास होत आहे. त्यांना वाटते की भारताला फायदा होत आहे, कारण ते त्यांचे सर्व सामने एकाच ठिकाणी खेळत आहेत. आता कर्णधार रोहित शर्माने अशा गोष्टींना चोख उत्तर दिले आहे.

भारतीय संघाने पहिले दोन सामने जिंकून उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले होते. प्रथम भारताने बांग्लादेशला हरवले आणि त्यानंतर पाकिस्तानला नमवले. यानंतर, संघाने शेवटच्या साखळी सामन्यात न्यूझीलंडला पराभूत केले आणि गटात अव्वल स्थान मिळवले. म्हणूनच उपांत्य फेरीत त्यांचा सामना दुसऱ्या गटातील दुसऱ्या क्रमांकाच्या संघाशी म्हणजेच ऑस्ट्रेलियाशी होईल. हा सामना उद्या 4 मार्च रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्याच्या एक दिवस आधी, कर्णधार रोहित शर्माने माध्यमांशी संवाद साधला. ज्यात विविध गोष्टी बोलत असलेल्या लोकांनाही उत्तर दिले. रोहित शर्मा म्हणाला की दुबई हे त्याचे होमग्राउंड नाही. तेथील खेळपट्ट्यांनी त्याच्या संघासमोर वेगवेगळे आव्हान उभे केले आहे.

रोहित शर्मा म्हणाला की, दुबईमध्ये प्रत्येक सामन्यात वेगवेगळ्या प्रकारची आव्हाने समोर येतात. भारतीय संघाने येथे आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत, ज्यात प्रत्येक वेळी संघाला भिन्न प्रकारची खेळपट्टी मिळाली आहे. त्याने स्पष्ट केले की या मैदानावर चार-पाच खेळपट्ट्या तयार करण्यात आल्या आहेत, पण उपांत्य सामना नेमक्या कोणत्या खेळपट्टीवर खेळला जाईल, हे अजून ठरलेले नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजांना चेंडू स्विंग होत असल्याचे दिसले, मात्र पहिल्या दोन सामन्यांमध्ये तशी परिस्थिती नव्हती. त्यामुळे प्रत्येक सामन्यासाठी नवीन रणनीती आखावी लागत आहे. प्रत्येक वेळेस वेगळ्या प्रकारच्या खेळपट्टीशी जुळवून घ्यावे लागत आहे.

भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळत असल्याने उपांत्य फेरीचा सामना त्यांच्यासाठी सोपा नसेल. जेव्हा जेव्हा आयसीसी स्पर्धा असते तेव्हा कांगारू संघ वेगळ्या पद्धतीने खेळतो. यावेळीही असेच काहीसे दिसून येत आहे. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकातही टीम इंडियाने सलग सर्व सामने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला होता, परंतु फायनलमध्ये त्यांना ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला. याआधीही, ऑस्ट्रेलियन संघ आयसीसी स्पर्धांच्या बाद फेरीत भारताला त्रास देत आला आहे. यावेळी कोणता संघ बाजी मारणार हे पाहणे रंजक राहील.

हेही वाचा-

ऑस्ट्रेलियाला मोठा झटका – भारताविरुद्धच्या सामन्याआधी स्टार सलामीवीर फलंदाज स्पर्धेबाहेर!
दुबईत पावसाचा इशारा! भारत-ऑस्ट्रेलिया उपांत्य सामना रद्द होण्याची शक्यता?
केकेआरचं नेतृत्व मिळाल्यानंतर रहाणे भावुक! म्हणाला, “ही माझ्यासाठी सन्मानाची….

Comments are closed.