IND vs AFG: वनडे क्रिकेटमध्ये रोहितकडे गांगुली-द्रविड यांना मागे टाकण्याची संधी! जॅक कॅलिसचा रेकॉर्ड मोडण्यावरही नजर

भारतीय संघ (Indian cricket team) सध्या घरच्या मैदानावर अफगाणिस्तानविरुद्ध खेळत आहे. नुकत्याच झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात भारताने केवळ तीन दिवसांत डावाने आणि 300 धावांनी दणदणीत विजय मिळवला. आता दोन्ही संघांमध्ये 13 जूनपासून तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू होत असून, पहिला सामना धर्मशाला येथे खेळला जाणार आहे. या मालिकेतील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे माजी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma). रोहित तब्बल 5 महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतणार आहे. त्याने आपला शेवटचा सामना या वर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. या मालिकेत रोहितकडे काही मोठे विक्रम नोंदवण्याची संधी आहे, विशेषतः ‘फिफ्टी प्लस’ (50 हून अधिक धावांच्या) खेळींच्या बाबतीत तो राहुल द्रविड (Rahul Dravid and Saurav Ganguly) आणि सौरव गांगुली यांना मागे सोडू शकतो.

रोहित शर्मा या मालिकेत खेळणार की नाही, याबाबत शंका होती. मात्र, फिटनेस टेस्ट पास केल्यानंतर आता तो या मालिकेत खेळताना दिसणार आहे. सध्या वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक ‘फिफ्टी प्लस’ खेळींच्या यादीत रोहित शर्मा आणि सौरव गांगुली संयुक्तपणे 8 व्या क्रमांकावर आहेत. रोहितने एक अर्धशतक किंवा शतक झळकावताच तो गांगुलीला मागे टाकून द्रविडची बरोबरी करेल आणि दुसरी ‘फिफ्टी प्लस’ खेळी करत तो द्रविडलाही मागे टाकेल.

आतापर्यंत रोहितने 282 वनडे सामन्यांच्या 274 डावांत 33 शतके आणि 61 अर्धशतकांसह एकूण 94 वेळा 50 हून अधिक धावा केल्या आहेत.

वनडेत सर्वाधिक ‘फिफ्टी प्लस’ खेळी करणारे खेळाडू

सचिन तेंडुलकर (भारत) – 145
विराट कोहली (भारत) – १३१
कुमार संगकारा (श्रीलंका) – 118
रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) – 112
जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका) – 103
सनथ जयसूर्या (श्रीलंका) – 96
महेला जयवर्धने (श्रीलंका) – 96
राहुल द्रविड (भारत) – 95
सौरव गांगुली (भारत) – ९४
रोहित शर्मा (भारत) – ९४

सर्वाधिक वनडे धावांच्या यादीत रोहित शर्मा सध्या 9 व्या क्रमांकावर आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या या मालिकेत केवळ 3 धावा करताच रोहित जॅक कॅलिसला मागे टाकून 8 व्या क्रमांकावर पोहोचेल. रोहितच्या नावावर सध्या 11577 वनडे धावा आहेत. तसेच, जर तो या मालिकेत 163 धावा करण्यात यशस्वी ठरला, तर तो 7 व्या क्रमांकावर पोहोचेल. सध्या 7 व्या क्रमांकावर पाकिस्तानचे माजी कर्णधार इंजमाम उल हक (11739 धावा) आहेत.

Comments are closed.