Video: रोहित शर्माचा बसमधून उतरताना तोल गेला अन् पाय घसरुन पडला; क्षणभर सगळ्यांची धाकधूक…
तिरुवनंतपुरम येथे वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने 8 गडी राखून शानदार विजय मिळवला. मैदानावरील भारतीय संघाची कामगिरी प्रभावी असली, तरी सामन्यानंतर सोशल मीडियावर समोर आलेल्या एका व्हिडिओमुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये रोहित शर्मा संघाच्या बसमधून खाली उतरताना अचानक घसरताना दिसत आहे. रविवारी रात्री वेस्ट इंडिजवर विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ हॉटेलवर पोहोचला, तेव्हाचे हे दृश्य असल्याचे सांगितले जात आहे.
व्हिडिओमध्ये बसच्या पायऱ्या उतरताना रोहितचा पाय घसरून त्याचा तोल गेल्याचे दिसते. ते पाहून लगेच, तिथे उपस्थित असलेले पोलीस अधिकारी आणि संघाचे सपोर्ट स्टाफ त्याला सावरण्यासाठी त्वरित धावून आले. या अचानक घडलेल्या घटनेमुळे खेळाडू आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती.
रोहित शर्माला झालेली दुखापत किंवा घटनेचे गांभीर्य याबद्दल अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन आलेले नाही; त्यामुळे केवळ व्हायरल व्हिडिओच्या आधारे त्याच्या दुखापतीबाबत कोणताही निष्कर्ष काढता येणार नाही. तरीही, हे दृश्य पाहिल्यानंतर ‘हिटमॅन’चे चाहते सोशल मीडियावर त्याच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत आहेत आणि त्याला कोणतीही दुखापत झाली नसावी, अशी प्रार्थना करत आहेत.
सामन्याचा विचार करता, भारतीय संघाने मैदानावर वर्चस्व गाजवले. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने भारतासमोर 296 धावांचे लक्ष्य ठेवले. या लक्षाचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी भारताला आक्रमक सुरुवात करून दिली आणि सहापेक्षा जास्त धावगतीने पहिल्या विकेटसाठी 74 धावा जोडल्या. रोहित शर्माने या डावात आक्रमक फलंदाजी करत 25 चेंडूंत 32 धावा केल्या.
रोहितने दिलेल्या भक्कम सुरुवातीचा विराट कोहली आणि शुबमन गिल यांनी पुरेपूर फायदा घेतला. दोघांनीही शानदार फलंदाजी केली आणि वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना कोणतीही संधी दिली नाही. भारताने अवघ्या 42 षटकांत 296 धावांचे लक्ष्य सहज गाठले आणि तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
Comments are closed.