वयाच्या 39व्या वर्षीही हिटमॅन सज्ज! विश्वचषकाच्या तयारीसाठी उचलले मोठे पाऊल!
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज रोहित शर्मा पुन्हा एकदा देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळताना दिसू शकतो. वृत्तानुसार, रोहित 14 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफी 2026-27 मध्ये मुंबईकडून खेळणार आहे. आगामी स्पर्धेत मुंबईचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आपण उपलब्ध असल्याची माहिती रोहितने मुंबई क्रिकेट असोसिएशनला (MCA) दिली आहे. 13 ते 19 डिसेंबरदरम्यान श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेनंतर रोहित मुंबईच्या संघात सहभागी होईल. यापूर्वीही त्याने 2025-26 च्या हंगामात मुंबईच्या संघाचे प्रतिनिधित्व केले होते.
वृत्तानुसार, रोहित शर्माने मुंबई क्रिकेट असोसिएशनला कळवले आहे की, तो 14 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या 2026-27 विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळण्यास तयार आहे. मात्र, तो स्पर्धेतील किती सामन्यांसाठी उपलब्ध असेल, याची माहिती नंतर देणार आहे.
भारतीय संघाला डिसेंबरमध्ये श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची मायदेशातील वनडे मालिका खेळायची आहे. ही मालिका 13 ते 19 डिसेंबरदरम्यान होणार आहे. तर विजय हजारे ट्रॉफीचा साखळी टप्पा 14 ते 29 डिसेंबरपर्यंत खेळवला जाईल. त्यानंतर 2 ते 8 जानेवारीदरम्यान बाद फेरीचे सामने होतील.
मुंबईचा संघ विजय हजारे ट्रॉफीमधील पहिला सामना 14 डिसेंबरला सर्व्हिसेसविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर मुंबईचा सामना जम्मू-काश्मीर आणि झारखंडशी होणार आहे.
भारत-श्रीलंका वनडे मालिका आणि विजय हजारे ट्रॉफीच्या सुरुवातीच्या सामन्यांच्या तारखा एकमेकांशी जुळत आहेत. त्यामुळे रोहित 21 डिसेंबरला सौराष्ट्रविरुद्ध होणाऱ्या मुंबईच्या चौथ्या सामन्यापासून संघात सहभागी होऊ शकतो. त्यानंतर साखळी फेरीतील शेवटच्या 10 दिवसांत त्याला आपल्या स्थानिक संघासाठी खेळण्याची संधी मिळेल. कारण 3 जानेवारीपासून भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू होणार आहे.
39 वर्षीय रोहित शर्मासाठी आगामी विजय हजारे ट्रॉफी महत्त्वाची ठरू शकते. कारण 2027 च्या वनडे विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला मर्यादित वनडे सामने खेळायला मिळणार आहेत. त्यामुळे 50 षटकांच्या क्रिकेटमध्ये सातत्याने सराव करणे आणि सामन्याचा फिटनेस टिकवून ठेवणे रोहितसाठी आवश्यक असेल.
Comments are closed.