VIDEO: ‘दु:खी होऊ नकोस, संधी मिळेल’! रोहित शर्माची भविष्यवाणी आणि संजू सॅमसनचा धमाका

आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ची सुरुवात ७ फेब्रुवारीला झाली. त्यादिवशी भारताचा सामना यूएसएशी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झाला. त्यावेळी भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माही मैदानावर उपस्थित होता. तो स्पर्धेचा ब्रॅंड एंबेसडर आहे. तेव्हा त्यालाही माहित होते की संजू सॅमसन अंतिम अकरामध्ये नसणार आणि पुढे त्याला खेळण्याची संधी मिळेल. रोहितने त्यावेळी म्हटलेले विधान संजूने खरे केले आहे.

संजू टी२० विश्वचषक २०२४चा ही भाग होता, मात्र त्याला स्पर्धेत एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याला २०२६च्या स्पर्धेसाठी संघाचा विकेटकीपर-सलामीवीर म्हणून निवडले गेले, मात्र त्याआधी झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेत त्याची कामगिरी निराशाजनक झाली आणि त्याची जागा ईशान किशनने घेतली. जेव्हा टी२० विश्वचषक २०२६च्या पहिल्या सामन्यात किशन अंतिम अकरामध्ये दिसला आणि तेव्हा संजू बाकावर राहिला.

किशनने उत्तम कामगिरी करत संजूची प्रतिक्षा आणखी वाढवली. त्या सामन्याआधी रोहित त्याच्याजवळ गेला आणि खांद्यावर हात ठेवत म्हणाला, “दु:खी होऊ नको, मोठी स्पर्धा असून तुलाही संधी मिळेल.” रोहित आणि संजूमधील हे संभाषण आयसीसीने उघड केले आहे. त्यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एका व्हिडिओ शेयर केला जो ७ फेब्रुवारीला शूट केला गेला होता.

या स्पर्धेत संजूला केवळ तीन सामने खेळायला मिळाले. त्याने नामिबियाविरुद्ध ८ चेंडूत २२ धावा केल्या होत्या. या स्पर्धेत भारताच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर संजूला पुन्हा संधी मिळाली. त्याने झिम्बाब्वे विरुद्धचा सुपर-८ सामन्यात १५ चेंडूत २४ धावा केल्या. आता त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सुपर-८ सामन्यात उल्लेखनीय खेळी करत त्या संधीचा पुरेपूर फायदा घेतला असून संघातील आपली जागाही निश्चित केली आहे.

संजूने वेस्ट इंडिजविरुद्ध फलंदाजीआधी विकेटकिपिंगही केली होती. यामुळे तो टी२० विश्वचषकात अर्धशतक करणारा भारताचा पहिला विकेटकीपर-फलंदाज बनला आहे. ज्या वानखेडे स्टेडियनवर संजूने बाकावर बसून प्रतिक्षा केली आता त्याच स्टेडियमवर तो मैदानात खेळताना दिसणार आहे.

या स्पर्धेत भारताचा उपांत्य फेरीचा सामना ५ मार्चला इंग्लंडविरुद्ध आहे. तो सामना वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

Comments are closed.