2025 संपण्यापूर्वी ‘रोहित-विराट’ 3 दिवसांत 2 सामने खेळणार, जाणून घ्या पूर्ण वेळापत्रक

भारतीय क्रिकेटमधील दिग्गज खेळाडूंचा जलवा यंदा विजय हजारे ट्रॉफीमध्ये पाहायला मिळणार आहे. विशेषतः माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या पुनरागमनाची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. टी20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर हे दोन्ही अनुभवी खेळाडू सध्या फक्त एकदिवसीय क्रिकेटवर लक्ष केंद्रित करत आहेत. त्यामुळे घरगुती क्रिकेटमध्ये त्यांचा सहभाग हा चाहत्यांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे.

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्यापूर्वी रणजी ट्रॉफी खेळली होती. आता हे दोघेही थेट एकदिवसीय स्वरूपातील विजय हजारे ट्रॉफीत खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. विशेष बाब म्हणजे या स्पर्धेत रोहित आणि विराट सलग तीन दिवसांत दोन सामने खेळताना दिसणार आहेत. त्यामुळे चाहत्यांना आपल्या आवडत्या खेळाडूंना जास्तीत जास्त वेळ मैदानात पाहण्याची संधी मिळणार आहे.

बीसीसीआयने अलीकडेच स्पष्ट निर्देश दिले होते की, जे आंतरराष्ट्रीय सामने खेळत नाहीत, अशा खेळाडूंनी घरगुती क्रिकेटमध्ये सहभाग घ्यावा. किमान दोन सामने आपल्या राज्य संघाकडून खेळणे बंधनकारक करण्यात आले होते. याच निर्देशांनुसार रोहित शर्मा मुंबई संघाकडून, तर विराट कोहली दिल्ली संघाकडून विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळणार आहेत.

विजय हजारे ट्रॉफीची सुरुवात 24 डिसेंबरपासून होणार असून, पहिल्याच दिवशी चाहत्यांसाठी ‘सुपर बोनान्झा’ असणार आहे. कारण रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेही एकाच दिवशी मैदानात उतरणार आहेत. रोहित शर्मा मुंबईकडून सिक्कमविरुद्ध जयपूरमध्ये खेळणार आहे, तर विराट कोहली दिल्ली संघाकडून आंध्र प्रदेशविरुद्ध बेंगळुरूमध्ये सामना खेळेल. हे दोन्ही सामने सकाळी 9 वाजता सुरू होतील.

यानंतर 26 डिसेंबर रोजीही हे दोन्ही स्टार खेळाडू पुन्हा मैदानात दिसतील. दिल्लीचा सामना गुजरातविरुद्ध बेंगळुरूमध्ये होईल, तर मुंबई उत्तराखंडविरुद्ध जयपूरमध्ये खेळणार आहे. हे सामने देखील सकाळी 9 वाजता सुरू होतील.

Comments are closed.