कर्णधारपद गेल्यावर रोहितची प्रतिक्रिया; मुंबईतील मंचावर गंभीरला डावलण्याचा सूचक इशारा
भारतीय क्रिकेट संघाची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेसाठी घोषणा करण्यात आली असून, रोहित शर्मा आणि विराट कोहली या वरिष्ठ खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे. मात्र, सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे कर्णधारपदात झालेला मोठा बदल. बीसीसीआयने रोहित शर्माची कर्णधारपदावरून उचलबांगडी करून शुभमन गिलकडे नेतृत्व सोपवले आहे. हा निर्णय घेताना बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापनाने 2027 च्या विश्वचषकाची तयारी या कारणास्तव दिली असली, तरी क्रिकेट वर्तुळात या निर्णयावर मोठ्या प्रमाणावर चर्चा आणि टीका सुरू झाली आहे.
गौतम गंभीरकडे नुकताच प्रशिक्षकपदाचा कार्यभार सोपवण्यात आला असून, त्यानेच गिलकडे नेतृत्वाची जबाबदारी दिली. रोहित शर्माने याआधी चांगली कामगिरी करताना दोन मोठ्या स्पर्धांमध्ये भारताला विजेतेपद मिळवून दिले होते. त्यामुळे त्याला कर्णधारपदावरून बाजूला काढणे काहींना खटकले. बीसीसीआयच्या या निर्णयामुळे रोहित आणि गंभीर यांच्यातील संबंध ताणले गेले असल्याचीही चर्चा रंगू लागली आहे.
या पार्श्वभूमीवर, मुंबईत पार पडलेल्या सीएट क्रिकेट रेटिंग पुरस्कार सोहळ्यात रोहित शर्माच्या भाषणामुळे नव्या वादाला तोंड फुटले. रोहितने आपल्या भाषणात ट्वेन्टी-20 विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमधील विजयाचे श्रेय थेट माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांना दिले. मात्र, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळी गौतम गंभीर प्रशिक्षक होता. तरीसुद्धा त्याचा उल्लेख न करता रोहितने द्रविडचे नाव घेतल्याने हे गौतम गंभीरला डावलण्याचा मुद्दाम प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.
या घडामोडींमुळे रोहित शर्मा आणि गौतम गंभीर यांच्यातील मतभेद अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय संघातील नेतृत्वबदल, खेळाडूंमधील राजकारण आणि यशाचे श्रेय कुणाला द्यायचे या मुद्द्यांवरून पुन्हा एकदा वाद उफाळण्याची चिन्हे दिसत आहेत. संघबांधणीच्या नावाखाली घेतलेल्या निर्णयांमुळे संघात अंतर्गत वाद निर्माण होणार नाही याची काळजी बीसीसीआयला आता घ्यावी लागणार आहे.
Comments are closed.