IND vs AUS: वनडे क्रिकेटमध्ये मिचेल स्टार्कने कितीदा रोहितला केलं बाद? पाहा वनडे रेकॉर्ड

टीम इंडिया (Team india) सध्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर आहे. येथे दोन्ही संघांमध्ये 3 वनडे आणि 5 टी20 सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेचा पहिला सामना 19 ऑक्टोबर, रविवारी पर्थच्या ऑप्टस स्टेडियमवर होणार आहे. शुबमन गिलच्या (Shubman gill) कर्णधारपदाखाली माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीही (Rohit Sharma & Virat Kohli) बर्‍याच काळानंतर टीम इंडियाकडून खेळताना दिसणार आहेत.

चाहत्यांच्या नजरा विशेषत: रोहित शर्मावर असणार आहेत. सलामीला रोहितची फलंदाजी खूप महत्त्वाची ठरणार आहे. कारण ओपनिंगमध्ये आक्रमक फलंदाजी करून प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांना दडपणात आणणे, हा रोहितचा ओळखीचा खेळाचा अंदाज आहे. पण यावेळी हिटमॅनचा सामना ऑस्ट्रेलियाच्या धोकादायक वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कशी (Mitchell Starc) होणार आहे.

रोहित शर्मा बर्‍याच काळानंतर भारताकडून खेळताना दिसणार आहे. टी20 आणि कसोटी क्रिकेटमधून हिटमॅन आधीच निवृत्त झाला आहे, आता तो वनडेमध्ये फक्त फलंदाज म्हणून खेळणार आहे. त्यामुळे त्याच्या आक्रमक फलंदाजीची झलक पुन्हा पाहायला मिळू शकते. पण मिचेल स्टार्कसमोर हे काम सोपे नाही.

वनडे क्रिकेटमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये नेहमीच टक्कर पाहायला मिळते. मिचेल स्टार्क नवीन चेंडूने उत्कृष्ट स्विंग करतो आणि सुरुवातीच्या षटकांत विकेट घेण्यात तो पारंगत आहे. तर दुसरीकडे, रोहित त्याच्या तुफानी फलंदाजीसाठी ओळखला जातो, मग समोर कोणताही गोलंदाज असो.

आत्तापर्यंत रोहित शर्माने मिचेल स्टार्कविरुद्ध वनडेमध्ये 13 डाव खेळले आहेत. या काळात हिटमॅनने एकूण 157 धावा केल्या आहेत. त्याची फलंदाजी सरासरी 52.33 इतकी आहे. स्टार्कविरुद्ध रोहितने वनडेमध्ये 7 षटकारही ठोकले आहेत. दुसरीकडे, मिचेल स्टार्कने रोहितला या 13 डावांत 3 वेळा बाद केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मैदानावर दोघांमध्ये जबरदस्त टक्कर पाहायला मिळणार आहे.

Comments are closed.