रोहितच्या पूल शॉटवर ऑस्ट्रेलियन्स क्रिकेटपटू बरसले

रोहित शर्मा चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावांतही 3 धावांवर बाद झाल्याने त्याच्यावर सर्व स्तरातून टीकेची झोड उठू लागली आहे. ऑस्ट्रेलियन्ससह इंग्लंडच्या आजी-माजी क्रेकेटपटूंनी रोहितच्या शॉट सिलेक्शन आणि आळशीपणावर सडकून टीका केली आहे.

रोहित शर्माला ‘पूल शॉटचा राजा’ म्हणून ओळखले जाते. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात हाच पूल शॉट रोहितचा कर्दनकाळ ठरला.

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉण्टिंग म्हणाला, रोहित सर्वोत्तम पूल शॉट खेळू शकतो. जबरदस्त गोलंदाजीचा सामना करताना चांगले निर्णय घ्यावे लागतील. रोहितने आळशीपणाने, आक्रस्ताळेपणे शॉटची निवड केल्याने त्याला बाद व्हावे लागले. त्याने स्वतःची विकेट टिकवून खेळायला हवे होते. जर तुम्हाला ऑस्ट्रेलियन हल्ल्यात टिकायचे असेल तर तुम्हाला चांगले निर्णय घ्यावे लागतील.

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू डॅरेन लेहमननेही रोहितचा समाचार घेतलाय. तो म्हणाला, जर तुम्ही शॉट निवडला असेल तर तो पूर्णपणे खेळला पाहिजे. रोहित हा उच्च दर्जाचा खेळाडू आहे, मात्र त्याने शेवटच्या क्षणी शॉट खेळण्याचा निर्णय टाळला आणि त्याचा फटका त्याला बसला.

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन म्हणाला, आळशीपणे शॉटची निवड केल्यानेच रोहित बाद झाला. ही खरोखरच एक मोठी चूक आहे. त्याला वेग आणि उसळत्या चेंडूची सवय नाही. हिंदुस्थानच्या कर्णधारासाठी ही दुःखद स्थिती आहे.

Comments are closed.