रोहित-विराटला जबरदस्ती केले निवृत्त? माजी खेळाडूने केले धक्कादायक विधान

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील कामगिरी निराशाजनक झाली होती. त्यानंतर दोघांनाही रणजी ट्रॉफीचे सामने खेळण्यास सांगण्यात आले. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत हे दोन्ही खेळाडू नक्कीच खेळतील असे वाटत होते. मात्र, या मालिकेपूर्वीच दोघांनी निवृत्तीचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय वादात राहिला आणि अनेकांना असे वाटले की त्यांना जबरदस्तीने निवृत्त करण्यात आले आहे. आता गौतम गंभीरचे सहकारी आणि माजी केकेआर (KKR) खेळाडू रॉबिन उथप्पा यांनी त्यांच्या निवृत्तीवर खळबळजनक विधान केले आहे.

रॉबिन उथप्पाने आपल्या यूट्यूब चॅनेलवर रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या अचानक कसोट क्रिकेटला अलविदा करण्यावर भाष्य केले. कोहली-रोहित स्वतःच्या इच्छेने निवृत्त झाले आहेत असे उथप्पाला वाटत नाही. तो म्हणाला, ‘मला माहित नाही की त्यांना जबरदस्तीने हटवण्यात आले का, पण हे स्पष्टपणे स्वतःहून घेतलेला निवृत्तीचा निर्णय वाटला नाही. सत्य काय आहे, ते स्वतःच योग्य वेळी याबद्दल सांगतील. मात्र, मला त्यांची ही निवृत्ती नैसर्गिक वाटली नाही.’

रॉबिन उथप्पाने सांगितले की, त्यावेळी रोहित शर्माचा फॉर्म चांगला नव्हता, पण ‘हिटमॅन’ जोरदार पुनरागमन करेल असा त्याला विश्वास होता. उथप्पा म्हणाला, ‘ऑस्ट्रेलियात जेव्हा रोहित शर्मा धावा करत नव्हता, तेव्हा मला असे वाटले की त्याने सहा महिन्यांचा ब्रेक घ्यावा आणि आपल्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करावे. तो परत आल्यावर धावा करणार नाही, याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नव्हती.’

क्रिकेटमध्ये इतके यश मिळवूनही रोहित-विराटमध्ये अजूनही धावांची भूक कायम असल्याचे पाहून रॉबिन उथप्पा आनंदी दिसला. तो म्हणाला, ‘रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या डोळ्यांत तुम्ही ती भूक पाहू शकता, जी खरोखरच कौतुकास्पद गोष्ट आहे. त्यांनी खूप चांगली कामगिरी केली आहे आणि त्यांना पुढेही खेळताना पाहणे छान वाटते. त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बरेच काही साध्य केले आहे.’

Comments are closed.