रोहित-विराटच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी! विजय हजारे ट्रॉफीच्या सामन्यांचे होणार नाही थेट प्रक्षेपण
विजय हजारे ट्रॉफी 2025-26 सध्या प्रचंड चर्चेत आहे, कारण विराट (Virat Kohli) कोहली 15 वर्षांनंतर आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) 7 वर्षांनंतर या स्पर्धेत खेळणार आहेत. बुधवारी, 24 डिसेंबरला स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी हे दोन्ही दिग्गज मैदानात उतरतील. दिल्लीचा सामना आंध्र प्रदेशशी, तर मुंबईचा सामना सिक्कीमशी होणार आहे. मात्र, हे सामने पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे.
रिपोर्ट्सनुसार, दिल्ली आणि मुंबईच्या साखळी फेरीतील (Group Stage) सामन्यांचे टीव्हीवर थेट प्रक्षेपण केले जाणार नाही. यामुळे रोहित आणि विराटची फटकेबाजी चाहत्यांना घरबसल्या पाहता येणार नाही.
दिल्ली विरुद्ध आंध्र हा सामना बेंगळुरू येथील ‘बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये होणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव या ठिकाणी चाहत्यांना प्रवेश दिला जाणार नाही.
हा सामना आधी चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार होता, परंतु आरसीबीच्या ‘व्हिक्ट्री परेड’ दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीमुळे या सामन्याचे ठिकाण बदलण्यात आले आहे.
मुंबई विरुद्ध सिक्कीम हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर होणार आहे.
दिलासादायक बाब म्हणजे, या सामन्यासाठी चाहत्यांना स्टेडियममध्ये जाऊन रोहित शर्माला खेळताना पाहता येईल.
रोहित आणि विराट आपापल्या संघांसाठी फक्त पहिले दोनच सामने खेळण्याची शक्यता आहे. हे दोन्ही दिग्गज आता फक्त वनडे फॉरमॅटमध्ये भारतासाठी खेळतात. 11 जानेवारीपासून न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेच्या तयारीसाठी ते या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
Comments are closed.