रोहित- विराटबद्दल रोहित शर्माच्या प्रशिक्षकांनी केला हा मोठा दावा! जाणून घ्या नेमकं काय म्हणाले?
भारतीय संघाचे दिग्गज खेळाडू रोहित शर्मा (Rohit Sharma & Virat Kohli) आणि विराट कोहली सध्या ज्या फॉर्मात आहेत, ते पाहून त्यांचे चाहते भारावून गेले आहेत. रोहितचे बालपणीचे प्रशिक्षक दिनेश लाड (Dinesh Laad) यांनी एक मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, हे दोन्ही खेळाडू 2027 चा एकदिवसीय वर्ल्ड कप केवळ खेळणारच नाहीत, तर तो जिंकूनही दाखवतील.
प्रशिक्षक दिनेश लाड म्हणाले, रोहित आणि विराट ज्या पद्धतीने खेळत आहेत, ते पाहता मला 100% खात्री आहे की 2027 च्या वर्ल्ड कपमध्ये ट्रॉफी त्यांच्या हातात असेल. मी याची पूर्ण गॅरंटी देतो.
रोहित शर्माने अलीकडेच विजय हजारे ट्रॉफीमध्ये सिक्कीमविरुद्ध खेळताना 94 चेंडूंत 155 धावा ठोकल्या. या खेळीत त्याने 9 षटकार आणि 18 चौकार मारले.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने 8, 73 आणि नाबाद 121 धावा केल्या होत्या., तसेच दक्षिण आफ्रिका विरुद्ध मालिकेत 57, 14 आणि 75 धावा केल्या होत्या. रोहितने आपल्या फलंदाजीने हे सिद्ध केले आहे की त्याचे वय झाले असले तरी त्याची धाटणी अद्याप कायम आहे.
37 वर्षांच्या विराटनेही सलग शतके झळकावून टीकाकारांना गप्प केले आहे. पहिल्या सामन्यात 135, दुसऱ्या सामन्यात 102 आणि तिसऱ्या सामन्यात नाबाद 65 धावा केल्या आहेत. विजय हजारे ट्रॉफी दिल्लीकडून खेळताना त्याने 24 डिसेंबरला आंध्रविरुद्ध 131 धावा, तर 26 डिसेंबरला गुजरातविरुद्ध 77 धावांची खेळी केली.
रोहित आणि विराट या दोघांनीही टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता हे दोन्ही दिग्गज फक्त वनडे (ODI) फॉरमॅटवर लक्ष केंद्रित करत आहेत. त्यांच्या सध्याच्या फॉर्ममुळे भारतीय चाहत्यांच्या 2027 च्या वर्ल्ड कपच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
Comments are closed.