“अजितदादांच्या अपघातात उगाच थातूरमातूर रिपोर्ट नको, तपासात काळंबेरं झाल्यास…”, ब्लॅकबॉक्सचा उल्लेख करत रोहित पवारांचा इशारा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अजितदादांच्या अपघाताबाबत किंवा घातपाताबद्दल योग्य ती चौकशी होणे गरजेचे आहे. तपास योग्य पद्धतीने होत नसेल, त्याच्यामध्ये काळेबेरे झाले तर सरकारला महागात पडू शकते, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दिली. महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले, यावेळी विधिमंडळाच्या आवारात ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना एक पत्र आणि पुराव्यांसह एक विस्तृत अहवालही देणार असल्याचे रोहित पवार म्हणाले.

आमदार अमोल मिटकरी यांनी अजितदादांच्या विमान सुसाईड बॉम्बर पायलट होते का याबाबत चौकशीची मागणी केली आहे. याबाबत विचारले असता रोहित पवार म्हणाले की, याबाबत मी विस्तृत सादरीकरण केले असून पायलटचा मुद्दा महत्त्वाचा आहे. याबाबत शंका घेण्यास वाव आहे. त्यामुळे तपास पारदर्शक होणे गरजेचे आहे. याचा तपास सीआयडीकडे देण्यात आलेला आहे. पम गेल्या महिन्याभरात सीआयडीने काय केले? तपासाची सद्य स्थिती काय आहे? दोन्ही विमानतळावरील सीसीटीव्ही ताब्यात घेतले का? दोन प्रमुख वैमानिक होते त्यांना अचानक का बदलण्यात आले? दादा गाडीने जाणार होते, ते का रद्द झाले? याची चौकशी करणे गरजेचे आहे.

ते पुढे म्हणाले की, सत्तेतील काही लोकांचे आणि व्हीएसआर कंपनीचे संबंध होते आणि तपास कसा चुकीच्या पद्धतीने चालू आहे याचा सर्व पुरावे आमच्याकडे आहेत. दोन दिवसात प्रायमरी रिपोर्ट येणार आहे. थातूरमातूर रिपोर्ट न देता खोलात जाऊन चौकशी केली तर तपास योग्य दिशेने जात असल्याचे समजू. उगाचच काही द्यायचे म्हणून दिले तर मराठी माणूस काय असतो आणि महाराष्ट्र काय असतो हे मात्र केंद्र सरकारला दाखवावे लागेल.

काही लोक तपास सीबीआयकडे देण्याबाबत बोलत आहेत. पण सीबीआयकडे 7075 केसेस पेंडिंग आहेत. त्यातील 2660 केसेस अशा आहेत ज्याचा तपास 10 वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे अजितदादांचा विषय बर्फात किंवा फ्रिजमध्ये जायला नको. 10-10 वर्ष सीबीआय काही करू शकत नसेल, तर हा विषयही सीबीआयकडे देणार असेल तर त्याला दोन महिने किंवा तीन महिने कालमर्यादा लावावी लागेल, असेही रोहित पवार म्हणाले.

सादरीकरणातून आतापर्यंत जी माहिती दिली ती कदाचित 20-30 टक्के आहे, 70 टक्के माहिती आम्ही मागे ठेवलेली आहे. त्यामुळे तपास योग्य पद्धतीने होत नसेल, त्याच्यामध्ये काळेबेरे झाले तर सरकारला महागात पडू शकते. आम्हाला राजकारण करायचे नाही, पण जो प्रायमरी रिपोर्ट दोन दिवसात येतोय तो योग्य पद्धतीचा असावा. ब्लॅकबॉक्सचा फोटोही आमच्याकडे आलेला आहे. तो कसा आहे, तो किती जळाला आहे याची विस्तृत माहितीही आमच्याकडे आहे, असेही रोहित पवार यावेळी म्हणाले.

Comments are closed.