भाषणांनी पोट भरत नाही आणि जाहिरातींनी कुपोषण मिटत नाही; हे सरकारच्या कधी लक्षात येणार? रोहित पवारांचा सवाल

एका बाजूला देशाला ‘महासत्ता’ बनवण्याची स्वप्ने दाखवून सत्ता मिळवली जाते, तर दुसऱ्या बाजूला देशातील प्रत्येक दहाव्या व्यक्तीला भुकेचा सामना करावा लागत आहे. देशातील पाच वर्षांखालील 29 टक्के बालकांची वाढ कुपोषणामुळे खुंटली असून 122 देशांच्या जागतिक भूक निर्देशांकात हिंदुस्थान 100 व्या क्रमांकावर असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला.

देशातील 79 कोटी लोकांना मोफत रेशन दिले जात असल्याचे सांगत केंद्र सरकार स्वतःची पाठ थोपटून घेत आहे. आता हा अभिमानाचा विषय आहे की लज्जास्पद, हेच सरकारला कळत नाही. पण तरीही देशात लोक उपाशी आहेत, अशी टीका रोहित पवार यांनी केली. तसेच भाषणांनी पोट भरत नाही आणि जाहिरातींनी कुपोषण मिटत नाही, हे सरकारच्या कधी लक्षात येणार? ‘विकसित भारत’च्या ढोल-ताशांमध्ये देशातील 10 टक्के लोकांच्या पोटातील भूक सरकारला कधी दिसणार? असा सवालही त्यांनी केला.

जात-धर्माच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन सरकारने जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे. ‘मन की बात’पेक्षा ‘जन की बात’ ऐकून सरकार माणुसकीच्या दृष्टिकोनातून भूक आणि कुपोषणाच्या समस्येचा विचार करणार आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित करत रोहित पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

दरम्यान, जागतिक भूक निर्देशांक २०२६ मधील आकडेवारीनुसार, हिंदुस्थानचा भूक निर्देशांक गुणांक 24.1 असून 122 देशांच्या यादीत हिंदुस्थान 100 व्या क्रमांकावर आहे. हिंदुस्थानातील परिस्थिती चिंताजनक असल्याचे या आकडेवारीवरून दिसते. देशातील कुपोषण, बालकांची खुंटलेली वाढ आणि अन्नसुरक्षेचे प्रश्न अद्याप गंभीर असल्याचे या अहवालातील आकडेवारी अधोरेखित करते.

Comments are closed.