रोखठोक – भारतात कोल्ह्यांची वरात
हुकूमशाहीविरोधात जनता रस्त्यावर उतरली. यापुढेही उतरत राहील, पण देशातील विचारवंत, बुद्धिजीवी वगैरे कोठे आहेत? ते कोल्ह्यांच्या वरातीत बॅण्ड वाजवीत आहेत. हुकूमशहा हा जन्मत:च डरपोक असतो, पण अशा हुकूमशहाची निर्मिती कोण करतो?
भारतात हुकूमशाहीचा काळ 12 वर्षांपूर्वी सुरू झाला, पण हुकूमशाहीविरोधात जनता आता निर्भयपणे रस्त्यावर उतरली आहे. न्यायालये, निवडणूक आयोग, राष्ट्रपती भवन यांसारख्या संवैधानिक संस्थांवर ताबा मिळवून गुजरातचे दोन व्यापारी आधी सत्तेवर आले व नंतर हुकूमशहा बनले. सोमवारी दुपारनंतर निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात लाखोंच्या संख्येने जनता दिल्लीच्या रस्त्यावर उतरली तेव्हा मोदी-शहा भूमिगत झाले. त्याच वेळी दिल्ली पोलिसांनी यापुढे ‘जंतर मंतर’वर आंदोलन करण्यास मनाईहुकूम बजावला. हे भय आहे. यावर प्रसिद्ध लेखक आणि व्यंगकार हरिशंकर परसाई म्हणतात, “हुकूमशहा हा मुळात एक डरपोक माणूस असतो. पाच गाढवेही एकत्र गवत खात असतील तरीही हुकूमशहाला अशी भीती वाटते की, ही गाढवेही आपल्याविरुद्ध कटकारस्थान करत असतील. या एकत्र आलेल्या गाढवांमुळे आपली सत्ता उलथवली जाईल.” मोदी-शहांनी याच भीतीतून ‘जंतर मंतर’ला टाळे ठोकले आहे. कारण सोमवारी किमान चार लाख लोक मोदी-शहांच्या विरुद्ध दिल्लीतील रस्त्यावर उतरले. हुकूमशहा हा घाबरटच असतो. दिल्लीतील रस्त्यांवर अडथळे निर्माण करणे, आंदोलकांवर गुन्हे दाखल करणे, आंदोलकांवर आरोप करणे ही भीतीचीच लक्षणे आहेत. हरिशंकर यावर सांगतात, “भीतीने थरथरणारा हुकूमशहा आपल्या भोवती उंच आणि पोलादी भिंती उभ्या करतो. जेव्हा त्या हुकूमशहाला कळते की, लोक आता आपल्या भूलथापांवर विश्वास ठेवायला तयार नाहीत, असत्य हे सत्य असे मानायला तयार नाहीत, तेव्हा तो शहर आणि राज्य सशस्त्र पोलिसांनी भरून टाकतो. पुजाऱ्यांना, घंटा बडवणाऱ्यांना, बेरोजगारांना प्रचारक बनवतो आणि प्रश्न विचारणाऱ्या प्रत्येक नागरिकाला देशद्रोही घोषित करतो.” भारतात तेच चित्र आहे. दिशाहीन, बेरोजगार, निराश, नकारात्मक विचारांनी ग्रासलेल्या तरुणांना विध्वंसक, धर्मरक्षक बनवले जाते. त्याच धर्मरक्षकांची झुंड हुकूमशहाची संरक्षक बनते. व्यापारी वृत्तीचे सत्तापिपासू आणि धर्मांध विचारसरणीचे लोक या झुंडींचा वापर करतात. नेपोलियन, हिटलर आणि मुसोलिनी यांनी अशाच जमावाचा उपयोग करून आपल्या सिंहासनाला मजबुती दिली. धर्म हा सज्जनांना डरपोक बनवतो आणि पाप्यांना निर्भय बनवतो. कारण पाप्यांना हुकूमशहाचे समर्थन आहे.
कोल्ह्यांची वरात
भारतात लोकशाही मारली जात असताना येथील विचारवंत, लेखक वगैरे मंडळी कोठे आहेत हा प्रश्न नेहमीच विचारला गेला.
“या देशातील बुद्धिजीवी सिंह आहेत, परंतु ते कोल्ह्यांच्या वरातीत बॅण्ड वाजवत आहेत,” असे त्यावर परसाईंचे उत्तर आहे. मोदींच्या मंत्रिमंडळातील अनेक जुनेजाणते, शहाणे लोकही गप्प आहेत. का? त्याचे उत्तर पुढील छोट्या कथेत आहे.
स्टॅलिनच्या मृत्यूनंतर रशियाने सुटकेचा नि:श्वास सोडला. त्यानंतरच्या पक्षाच्या सभेत निकिता ख्रुश्चेव्ह यांनी स्टॅलिनच्या अतिरेकी हुकूमशाही कारभारावर कठोर टीका केली “स्टॅलिनने लाखो लोकांना मारले. विरोधकांना खतम केले. तुरुंगात डांबले. त्याने भीतीचे राज्य निर्माण केले.”
त्या सभेत कम्युनिस्ट पक्षाचा एक कार्यकर्ता उभा राहिला व त्याने विचारले, “साहेब, तुम्ही स्टॅलिनसोबत इतकी वर्षे होता, तेव्हा का नाही बोलण्याची हिंमत दाखवलीत?”
ख्रुश्चेव्हने त्या आवाजाच्या दिशेने पाहिले व म्हणाला, “छान, उभे रहा, मला तुमचा चेहरा पाहू द्या.” पण कोणीच उभे राहत नाही. मग ख्रुश्चेव्ह म्हणतो, “आता समजले ना? मीदेखील त्याच भीतीच्या छायेखाली होतो. तुझ्याप्रमाणे बोलायला उभा राहिलो असतो तर मी जिवंत राहिलो नसतो.”
हुकूमशाहीत भीती हेच शस्त्र असते व ते शस्त्र खोलवर घाव घालते. हुकूमशहा हा सुरुवातीला लोकप्रियच असतो. तो लोकशाहीतूनच घडतो. त्याच्या लोकशाहीतील सर्वात मोठा दोष कोणता, तर त्याच्या व्यवस्थेत गुणवत्तेला मान्यता मिळत नाही. लोकप्रियतेला मिळते. त्यातून चमचे, अंधभक्त निर्माण होतात. ओशो म्हणतात, “हुकूमशहा बाहेरून येत नाही. तो भीती आणि जबाबदारी टाळण्यातून जन्म घेतो.”
नितीन गडकरी, शिवराजसिंह चौहान, राजनाथ सिंह, मोहन भागवत, चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार अशांनी लोकशाही वाचविण्याची जबाबदारी टाळली आहे हे इतिहासात नोंदले जाईल.
राज्य कसे टिकेल?
हुकूमशाहीचा उल्लेख भक्कम आणि पोलादी नेतृत्व असा केला जातो. ते योग्य नाही. लोक म्हणतात, “हिटलर वाईट होता. वेडा होता.” होय, पण त्याच्या वेडेपणास जन्म कोणी दिला? नेतान्याहूने गाझा पट्टीत हजारो मुलांची हत्या केली. त्या नेतान्याहूला पाठिंबा देणारे श्रीमान मोदी आहेत. इराणच्या मुलींच्या शाळेवर बाम्ब टाकणारे प्रे. ट्रम्प व नेतान्याहू मोदींचे मित्र आहेत. हिटलरने छळछावण्या तयार केल्या. कॅम्प तयार केले. स्टॅलिनने संपूर्ण रशियाला ‘कॅम्प’ बनवले. इतके मोठे ‘कॅम्प’ की, लोकांना कळलेच नाही की, ते तुरुंगात आहेत. स्टॅलिन क्रूर होता, पण त्याला क्रूर बनवणारे लोकही क्रूर होते. भीतीमुळे ते क्रूरतेचे भजन करत राहिले. जोपर्यंत लोक भीतीत जगतात तोपर्यंत ‘पोलादी’ हुकूमशहा निर्माण होत जातात.
एकदा एका हुकूमशहाने विचारले, “माझे राज्य कसे टिकेल?” त्याच्या सल्लागाराने सांगितले, “लोकांना भीती दाखवत रहा.” हुकूमशहा म्हणाला, “भीती दाखवली तरी लोक बोलतात.”
सल्लागार म्हणाला, “त्यांच्या मुलांची डोकी भडकवा. त्यांना धर्माची अफू द्या. आपल्याच आई-बापाविरुद्ध उभे करा.”
हुकूमशहा म्हणाला, “तेही करून बघितले. तरीही लोक आता स्वप्नात बोलतात.”
सल्लागार म्हणाला, “जनतेला हुकूम द्या की, स्वप्ने पाहू नका.”
हुकूमशहा हसला आणि म्हणाला, “हे शक्य आहे का?”
सल्लागार म्हणाला, “का शक्य नाही? लोक स्वत: विचार करायला घाबरत असतील तर हे शक्य आहे. त्यांना स्वप्ने पडणार नाहीत. समाज निद्रिस्त होईल.”
…आणि ही गोष्ट खरोखर घडली. रशियात, चीनमध्ये, युगांडात व भारतासारख्या देशात!
श्रद्धा कशी?
1975 ते 1979 हा आणीबाणीचा काळ होता. या काळावर हरिशंकर परसाई यांनी विडंबनात्मक लिखाण केले.
‘विकलांग श्रद्धेचा काळ’ असा त्यांचा एक निबंध आहे. त्यात त्यांनी अंधभक्तीवर कोरडे ओढले आहेत.
1976 मध्ये परसाई यांचा पाय एका अपघातात तुटला. ते इस्पितळात दाखल झाले. पाय प्लॅस्टरमध्ये होता व टांगून ठेवला. त्यामुळे त्यांना बेडवरच पडून राहावे लागे. या काळात लोक येत व त्यांना चरणस्पर्श करीत. चरणस्पर्श करणाऱ्यांची गर्दी वाढू लागली. परसाई विचारात पडले, “अरे बापरे! ही श्रद्धा अचानक कशी निर्माण झाली? मी तर अलीकडे कसलेच महान कार्य केले नाही. दाढी वाढवली नाही. भगवी वस्त्रे परिधान केली नाहीत. जटा वाढवल्या नाहीत. फक्त एक ‘टांग’ तुटली आहे म्हणजे लोकांना वाटते की, मी आता विकलांग, दयनीय झालो आहे. त्यामुळे त्या विकलांग पायाला नमस्कार करावे.” ते पुढे म्हणतात, “माझ्या मोडक्या पायांतून वेदनेप्रमाणेच श्रद्धा निर्माण झाली काय? तसे असेल तर ही विकलांग श्रद्धा आहे. मला माहीत आहे, सध्या देशात जे वातावरण निर्माण झाले आहे त्यात श्रद्धेची ‘टांग’ तुटली आहे. म्हणून मला ही विकलांग श्रद्धा प्रत्येक जण देत आहे.”
हरिशंकर पुढे म्हणतात ते महत्त्वाचे, “देशात आता शुद्ध श्रद्धेचे युग नाही. श्रद्धा जुन्या वर्तमानपत्राप्रमाणे रद्दीत विकत आहे. हवेप्रमाणे विश्वास गटांगळय़ा खात आहे. नेते, संस्था, न्यायालय, बुद्धिजीवी… आता कशावरही विश्वास राहिलेला नाही. नेतृत्व नग्न होत आहे आणि काही नेते तर अंडरवेअरमध्येच वावरत आहेत. ते निर्लज्ज आहेत.”
हरिशंकर अंधश्रद्धाळूंना शेवटी सांगतात,
“ही चरणस्पर्श करण्याची वेळ नाही. लाथ मारण्याची वेळ आहे. मारा एक लाथ आणि बना क्रांतिकारी!”
पण कोल्ह्यांच्या वरातीत बॅण्ड वाजवणाऱ्यांना हे कोण सांगणार?
ट्विटर – @rautsanjay61
Gmail- [email protected]
Comments are closed.