रोखठोक – घटनेचे ‘शिवधनुष्य’ मोडले!

पंतप्रधान मोदी बारा वर्षे सत्तेला चिकटून बसले. बारा वर्षांत त्यांनी बाराशे भानगडी केल्या आहेत. तिकडे इंग्लंडमध्ये नैतिकतेच्या मुद्द्यावर दहा वर्षांत सहा पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला. सत्ता टिकविण्यासाठी खासदारांना विकत घेण्याचा प्रयत्न यापैकी एकाही पंतप्रधानाने केला नाही.

कलियुगच खोटे आहे. तसे नसते तर जनक राजाने म्हणजे अमित शहाने ‘मशाल’ चिन्हावर निवडून आलेले सहा खासदार कमळाबाईच्या कडेवर दिले नसते. त्यासाठी 50-50 कोटी रुपये देण्यात आले हेसुद्धा लपून राहिलेले नाही. शिवसेनेचे सहा खासदार फुटले ते फक्त पैशांसाठी. धाराशीवचे ओम निंबाळकर यांना पैशांची नितांत गरज असावी. त्यामुळे विकास निधीच्या सबबीखाली ते पळाले. इतर खासदारांनी निधीचेच रडगाणे गायले. यावर उमरग्यातले शंभर शेतकरी एकत्र आले व त्यांनी निंबाळकरांना प्रस्ताव दिला, “असा पळपुटेपणा करू नका. आम्ही शंभर शेतकरी आमची किडनी विकतो व तुम्हाला 80-85 कोटी रुपये गोळा करून देतो, पण शिवसेना सोडून मतदारांचा विश्वासघात करू नका.” हे झाले उमरग्याचे.

शिर्डीतील जनतेने तर तेथील पळपुटे खासदार भाऊ वाकचौरे यांची पैशांची निकड भागवण्यासाठी साईबाबांच्या दारात भीक मागण्याचा उपक्रम सुरू केला. हे लोण आता गद्दार खासदारांच्या सर्वच मतदारसंघांत पोहोचेल व 50 कोटींना विकले गेलेल्यांना बाहेर फिरणे मुश्कील होईल.

निधी कोणासाठी?

विकास निधी हवा आहे व तो सगळ्याच आमदारांना हवा आहे, पण मुख्यमंत्री फडणवीस-उपमुख्यमंत्री शिंदे हे विरोधी आमदारांना निधी द्यायला तयार नाहीत. ओम निंबाळकर यांनी पक्षांतर केले व उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लगेच त्यांना 18 कोटींचा निधी मंजूर केला. हा भ्रष्टाचार आहे. तुम्ही विरोधी बाकावर असाल व सरकारला प्रश्न विचारणार असाल तर तुमच्या मतदारसंघाचा विकास होणार नाही. देशातल्या नव्या लोकशाही व्यवस्थेचे हे भयंकर स्वरूप आहे. अनेक राजकीय पक्ष (Multi party) असलेल्या संसदीय लोकशाहीची ही हत्या आहे. विकास निधी ही एखाद्या पक्षाची किंवा व्यक्तीची निजामी नसते. जनतेच्या कराच्या पैशांतून हा निधी उभा राहतो. हा कर विरोधी बाकावरील आमदारांना मतदान करणारे लोकही देतात, पण त्यांना विकास निधीपासून वंचित ठेवले जाते. न्यायालय, निवडणूक आयोग, कॅगसारख्या संवैधानिक संस्था हे प्रकरण गांभीर्याने घेत नाहीत. जनतेचा हा पैसा सरळ सरळ आमदार-खासदार फोडण्यासाठी, त्यांना विकत घेण्यासाठी वापरला जातो.

घटनेचे दहावे कलम

भाऊ वाकचौरे, नागेश आष्टीकर, ओम निंबाळकर, संजय देशमुख, संजय दिना पाटील, संजय जाधव हे फुटले. घटनेच्या दहाव्या शेड्यूलमध्ये पक्षांतरविरोधी कायद्याची व्याख्या आहे. त्यात पक्षफुटीला, स्वतंत्र गटास मान्यता नाही. तरीही शिंदे यांचा फुटलेला गट आज सत्तेत मजा करत आहे. आता सहा खासदार फुटले. त्यांनी आपण स्वतंत्र गट असल्याचे लोकसभा अध्यक्षांना जाऊन सांगितले. तृणमूल काँग्रेसमधून 60 आमदार व 22 खासदार फुटले. त्यांनीही आपला वेगळा गट स्थापन केला व तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून श्रीमती ममता बॅनर्जी यांनाच हाकलून दिले ते कोणत्या नियम-कायद्यानुसार? भारतीय घटनेत ज्या प्रक्रियेची तरतूद नाही त्याचे संरक्षण घेऊन अमित शहा व त्यांचे लोक पक्षफोड्यांना आणि चोरांना संरक्षण देत आहेत. राज्यसभा निवडणुका खुल्या पद्धतीने होतात. ओडिशात बिजू जनता दल व काँग्रेसच्या काही आमदारांनी उघडपणे पक्षाचा आदेश डावलून भाजपला मतदान केले. दोन्ही पक्षांचे प्रतोद ओडिशा विधानसभा अध्यक्षांकडे या आमदारांच्या बडतर्फीचे अपील घेऊन गेले, पण विधानसभा अध्यक्षांनी ते फेटाळले. म्हणजे पक्षांतरविरोधी कायदा भाजपने गटारातच फेकून दिला. ममता बॅनर्जी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या हयातीत त्यांचे पक्ष चोरांच्या हातात सोपवले. देशात कोणताही कायदा, नियम राहिलेला नाही. इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादली व स्वातंत्र्याचा खून केला असे यापुढे भाजपने बोलू नये. ते तर लोकशाही व भारतीय घटनेचा रोज खून करत आहेत. पक्षांतरविरोधी कायद्याचा प्राण असलेला ‘दहावा अनुच्छेद’ तर त्यांनी हाल हाल करून खतम केला.

चार्टर्ड विमान प्रवास

फुटलेले व विकत गेलेले सर्व खासदार आता ‘चार्टर्ड’ विमानाने फिरतात. निर्लज्जपणे या श्रीमंती प्रवासाची छायाचित्रे ते प्रसिद्ध करतात व मतदारांच्या जखमेवर मीठ चोळतात. संजय जाधव हे परभणीचे खासदार. ते स्वतःला वारकरी समजतात. ते इतके कडवट शाकाहारी की, ज्या हॉटेलात किंवा घरात मांसाहार शिजतो, बंडू जाधव तेथे पाणीसुद्धा पीत नव्हते हे मी स्वतः पाहिले आहे, पण फुटल्यावर त्यांचा ‘चार्टर्ड’ प्रवास सुरू झाला. त्या विमानातल्या आलिशान डायनिंग टेबलवर बसून हेच जाधव ग्लासातून रहस्यमय रंगीत पाणी पीत आहेत आणि बहुधा तोंडात काजू-बदाम टाकत आहेत. (व्हिडीओ उपलब्ध आहे.) विमानात ‘व्हेज-नानव्हेज’ एकाच ठिकाणी ठेवलेले असते. पन्नास कोटींनी त्यांचे जगच बदलून गेले. नवेकोरे बंडू जाधव लोकांनी पाहिले. चार्टर्ड विमाने त्यांच्या दिमतीला आली. हा सर्व कोट्यवधींचा खर्च कोण करत आहे?

मंदिर लुटीचा पैसा

मुंबईतले एक भाजप कार्यकर्ते भेटले. ते म्हणाले, आम्ही वर्षानुवर्षे काम करतोय, पण आजही सतरंज्या उचलतोय. राजकारणात बेइमानांना महत्त्व मिळतेय व कोट्यवधींचा पैसाही त्यांना दिला जातोय. कसलं हिंदुत्व घेऊन बसलात? अयोध्येतील राममंदिरातला लुटलेला, चोरलेला पैसा राजकारणात वापरला जातोय व त्याच मंदिराच्या पैशांनी आमदार-खासदार विकत घेतले जात आहेत. रामाचे राज्य हे आज हरामाचे राज्य बनले आहे. नरेंद्र मोदी हे बारा वर्षे पंतप्रधानपदाच्या खुर्चीला चिकटून बसले आहेत. या काळात त्यांनी बाराशे भानगडी केल्या. इंग्लंडमध्ये दहा वर्षांत सहा पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला तो नैतिकता व असत्याच्या मुद्द्यांवर. आता सध्याचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी राजीनामा दिला. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या नेतृत्वाखालील लेबर पार्टीने 650 पैकी 403 जागा जिंकून बहुमताचा विक्रम प्रस्थापित केला, पण स्टार्मर यांनी जनतेला दिलेली वचने पाळली नाहीत म्हणून लेबर पार्टीच्याच शंभरावर खासदारांनी स्टार्मर यांच्याविरुद्ध बंड केले. स्टार्मर यांनी केलेल्या काही नियुक्त्या व धोरणे यामुळे त्यांच्याच पक्षात असंतोष वाढला. स्टार्मर यांनी सत्ता टिकवण्यासाठी भारताप्रमाणे खासदारांना विकत घेतले नाही. विरोध करणाऱ्यांच्या मागे तपास यंत्रणा लावल्या नाहीत, पैशांचा वापर केला नाही, पैसा कमी पडला म्हणून चर्चच्या तिजोरीवर डल्ला मारला नाही. हीच इंग्रजांची संसदीय लोकशाही आहे. याच लोकशाहीचा वारसा सोडून इंग्रज भारतातून गेले. आपण त्या लोकशाहीचे आणि संसदेचे हे काय करून ठेवले? अत्यंत बकवास, भ्रष्ट, क्रूर राज्यव्यवस्थेस आपण ‘रामराज्य’ म्हणत आहोत, पण याच व्यवस्थेने भारतीय घटनेचे शिवधनुष्य मोडले.

मोडलेल्या शिवधनुष्याचे आता काय करायचे?

ट्विटर – @rautsanjay61

Gmail- rautsanjay61@gmail.com01

Comments are closed.