रोखठोक – हा एपस्टिन कोणाचा कोण? भारतासाठी जणू महात्माच!

भारताच्या राजकारणात चारित्र्यहनन व चिखलफेकीचे पर्व सुरू झाले त्याला सर्वस्वी मोदी-शहांचा भाजप जबाबदार आहे. राहुल गांधी यांनी लोकसभेत चीनच्या घुसखोरीवर प्रश्न उपस्थित केले. पुरावा म्हणून माजी लष्करप्रमुखांचे पुस्तक दाखवले तेव्हा भाजपकडून नेहरू व इंदिरा गांधींचे चारित्र्यहनन सुरू झाले. मग मानवी तस्कर, बाल यौन शोषणातला गुन्हेगार जेफ्री एपस्टिन तुमचा कोण? याचा खुलासा भाजपने द्यावा.

महाराष्ट्राचे आणि देशाचे राजकारण आज कोणत्या वळणावर आहे याचा अंदाज कोणीही देऊ शकत नाही.

एकमेकांचे चारित्र्यहनन, चिखलफेक व अफवांचा प्रसार या त्रिसूत्रीवर राजकारणाचा तंबू उभा आहे. जेफ्री एपस्टिनच्या भुताने सध्या भारतात आणि देशातील अनेक भागांत धुमाकूळ घातला आहे. लहान मुलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या व ही मुले श्रीमंतांच्या ऐयाशीसाठी पुरवणाऱ्या जेफ्री एपस्टिनमुळे मानवतेची लक्तरे निघाली. बिल गेट्सपासून अनिल अंबानी व प्रे. ट्रम्प, केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांची नावे या प्रकरणात आली. बिल गेट्स यांच्या पत्नीने या प्रकरणामुळे नवऱ्याशी घटस्फोट घेतला. लहान मुलांशी अमानवी कृत्यांत सहभागी असलेल्या व्यक्तीबरोबर संसार करणे कठीण आहे, असे जाहीर करून तिने गेट्स यांच्याशी काडीमोड घेतला, ते महात्मा बिल गेट्स चार दिवसांपूर्वी भारताच्या दौऱ्यावर आले. आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी हैदराबादेत त्यांचे स्वागत केले. हे चित्र शिसारी आणणारे आहे. कुणाल कामरा, सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदेंवर विडंबनात्मक काव्य केले म्हणून महाराष्ट्र विधानसभेच्या हक्कभंग समितीने या दोघांवर कारवाई केली. कुणाल कामरा यांच्या स्टुडिओवर शिंदे यांच्या लोकांनी हल्ला केला, पण एपस्टिन फाईल्स प्रकरणात भारतातील उद्योगपती व नेत्यांची नावे आली तरी केंद्रीय मंत्री हरदीप पुरींसह अनेक जण त्यांच्या सत्तेच्या खुर्चीवर चिकटून आहेत यास काय म्हणावे?

एपस्टिन प्रकरणाने जागतिक समाज रचनेला सुरुंग लागला, पण काही देशांनी या प्रकरणी सामाजिक व नैतिक भान जपले. बिल गेट्सचे भारतात स्वागत सुरू असताना इटलीच्या पोलादी महिला पंतप्रधान जार्जिया मेलोनी यांनी एक निर्णय घेतला. बिल गेट्सच्या ‘लॅब’मध्ये तयार होणाऱ्या सर्व उत्पादनांवर इटलीत बंदी घालण्यात आली. इटली हा जगातील पहिला देश आहे, ज्याने ‘आर्टिफिशल’ आणि ‘सिंथेटिक’ पदार्थांवर बंदी घातली. त्यामुळे बिल गेट्सच्या लॅबला येणाऱ्या काळात 100 बिलियन डॉलर्सच्या उत्पन्नास मुकावे लागेल. एपस्टिन फाईल्समध्ये वारंवार नाव आले म्हणून अमेरिकेतील जनतेने प्रे. ट्रम्प यांच्याविरुद्ध आंदोलन सुरू केले. अत्यंत महान ‘नैतिकता’ दाखवली ती ‘द ग्रेट ब्रिटन’ने. ब्रिटनमध्ये किंग चार्ल्स यांचा भाऊ प्रिन्स अ‍ॅण्ड्रयू यांना अटक करण्यात आली आहे. एपस्टिन प्रकरणातील एक पीडित व्हर्जिनिया गिफ्रेने आरोप केला की, 2001मध्ये ती 17 वर्षांची असताना प्रिन्स अ‍ॅण्ड्रयू यांनी तिचे लैंगिक शोषण केले होते. ब्रिटनकडून, इटलीकडून आपण काय धडे घ्यावेत? आमच्या राज्यकर्त्यांनी चिंतन करायला हवे.

सैतानी करार

भारताने अमेरिकेबरोबर जो सैतानी व्यापार करार केला व भारतातील शेतकऱ्यांचे हित प्रे. ट्रम्प यांच्या पायाशी गहाण टाकले त्यामागे एपस्टिन फाईल्समध्ये दडलेली भारतीयांची रहस्ये हे कारण आहे काय? मोदी पंतप्रधान झाल्यावर हरदीप पुरी व एपस्टिन यांच्यातले संपर्क आणि संवाद वाढले. सरकारी धोरणांवर एपस्टिनशी चर्चा झाल्या. पुरी व एपस्टिन यांच्यात किमान 60 वेळा पत्रसंवाद व नऊ भेटी झाल्या. 5 जून ते 10 ऑक्टोबर 2014 पर्यंत पुरी एपस्टिनला नऊ वेळा भेटले. एका मानवी तस्कराला, लैंगिक शेषणातला जो आरोपी आहे अशा व्यक्तीस पुरी कोणासाठी भेटत होते हे रहस्य उलगडू नये म्हणून प्रे. ट्रम्प यांच्या अटीशर्तींवर भारताने अमेरिकेशी व्यापार करार केला व इकडे श्री. मोदी गेटवे ऑफ इंडियावर फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन यांच्यासोबत ‘इव्हेंट’ करीत होते. भारत-फ्रान्समध्ये 21 करार झाल्याचे ढोल मोदी व त्यांचा भाजप पिटत आहे, पण प्रे. ट्रम्प यांच्या बरोबर झालेल्या एका ‘व्यापार करारा’ने भारतीय शेतकऱ्यांचे हक्क आणि स्वातंत्र्य उद्ध्वस्त झाले. त्यावर पंतप्रधान बोलत नाहीत.

कोण हा एपस्टिन?

भारतीय ‘मीडिया’ने एपस्टिन प्रकरणावर संपूर्ण बहिष्कार टाकला आहे ही लाजिरवाणी गोष्ट आहे. श्री. राहुल गांधी यांनी संसदेत माजी लष्करप्रमुख नरवणे यांच्या पुस्तकातील मजकुरासंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले. चिनी सैन्य रणगाड्यांसह भारतीय हद्दीपर्यंत पोहोचत असताना भारताचे राजकीय नेतृत्व कोणताही निर्णय घ्यायच्या स्थितीत नव्हते. “तुमचे तुम्ही बघा” हा पंतप्रधानांचा लष्कराला संदेश होता. या मुद्द्यावर राहुल गांधींना बोलूच दिले नाही. गांधींनी निर्माण केलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी भर संसदेत भाजपचे खासदार दुबे हे नेहरू व इंदिरा गांधींचे चारित्र्यहनन करत राहिले ते मोदी-शहांच्या संमतीने. नेहरू आणि इंदिरा गांधींची बदनामी करणे, चारित्र्यहनन करणे हा भाजपवाल्यांचा धंदा बनला आहे. आमच्या सार्वजनिक जीवनात सत्याच्या आणि इतिहासाच्या नावावरही एक भ्रष्टाचार चालतो. सध्या नेहरू घराण्याची अप्रतिष्ठा करण्याची शर्यत लागली आहे. नेहरूंविरुद्धचा माल खपवण्यासाठी भाजपने जी मोहीम उघडली ती एक दिवस त्यांच्यावरच उलटेल. ‘कश्मीर फाईल्स’, ‘ताश्कंद फाईल्स’, ‘केरला फाईल्स’ या चित्रपटांचे मार्केटिंग स्वतः पंतप्रधान मोदी यांनी केले. एक दिवस ‘हॉलीवूड’वाले ‘एपस्टिन फाईल्स’वर चित्रपट बनवतील व नेहरूंची बदनामी करणाऱ्यांची त्यात प्रकरणे असतील. भारतातील काही वजनदार नेत्यांची प्रकरणे या फाईलमध्ये आहेत असे वारंवार सांगितले, पण प्रे. ट्रम्प यांच्या पायाशी भारताचे स्वातंत्र्य गहाण टाकणारा ‘व्यापार करार’ झाला व ही सहा प्रकरणे असलेली हजारो कागदपत्रे गायब झाली. अमेरिकेच्या इँघ् म्हणजे केंद्रीय तपास यंत्रणेचे प्रमुखही एक ‘पटेल’ आहेत. त्यांनी या सर्व घडामोडीत महत्त्वाची भूमिका बजावली असे उघड बोलले जाते. जेफ्री एपस्टिन ही फक्त गुन्हेगारी कथा नाही. उद्योगपती, राजकारणी, प्रशासनातील बडे अधिकारी यांची काळी बाजू जगासमोर आणणारी ‘लाखो पानांची डायरी’ आहे. राजकीय दलाली, राजकीय नेटवर्किंग यासाठी एका घृणास्पद व्यक्तीची मदत सर्वच थरांतील प्रतिष्ठित म्हणून मिरवणारे लोक घेतात. ‘व्हाईट हाऊस’मध्ये एपस्टिनचे ‘नेटवर्क’ होते व प्रे. ट्रम्प यांना भेटण्यासाठी हे नेटवर्क भारतीय राजकारण्यांनी वापरले. एपस्टिनसारख्या घृणास्पद गुन्हेगाराशी ‘संवाद’ करण्याची गरज मोदींचे खास केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांना का पडली? संपूर्ण अमेरिकेचे प्रशासन धाराशायी पडले होते म्हणून भारतीय नेत्यांना एपस्टिनच्या घराचे उंबरठे झिजवावे लागले का? या फाईलमध्ये ट्रम्प यांचे नाव इतक्या वेळा आले आहे की, बायबलमध्ये ख्रिस्तांचे नावही इतके आले नाही. ट्रम्प व एपस्टिन समाजाचे व जगाचे गुन्हेगार आहेत. या दोन्ही गुन्हेगारांशी ‘डील’ करून आपण भारतीय स्वातंत्र्य अमेरिकेच्या पायाशी गहाण टाकले. तरीही धर्मांध बनवलेला संपूर्ण समाज लोळागोळा होऊन निपचित पडला आहे. असे का? याचे उत्तर श्री. शरद पोंक्षे यांनी छान दिले. ते म्हणतात, “मला एकाने विचारले की, तुम्ही पेट्रोल-डिझेलच्या भावाबद्दल कधीच बोलत नाहीत? मी त्यांना म्हटले की, माझे पेट्रोल उद्या 200, डिझेल 300 रुपयांवर गेले तर मी एकवेळ चालत जाईन, पण हिंदू म्हणून चालत जाईन. पेट्रोल-डिझेल, भाज्या महाग झाल्या तरी चालतील. मी एकच वेळ जेवेन, एकाच कपड्यात राहीन, पण हिंदू म्हणूनच शेवटपर्यंत राहायला आवडेल.”

हे असे विचार सर्वसामान्य झाल्यावर जेफ्री एपस्टिनला उद्याच्या प्रजासत्ताक दिनी पद्मविभूषणाने सन्मानित केले तरी आश्चर्य वाटणार नाही. देश कोणत्या वळणावर उभा आहे?

ट्विटर – @rautsanjay61

Gmail- [email protected]

Comments are closed.