रोखठोक – बहकलेला भारत देश, रेड्याचे शिंग आणि मोदींचे गंगास्नान!
पंतप्रधान मोदी यांनी गंगास्नानाचा मुहूर्त काढला तो दिल्ली विधानसभा मतदानाच्या दिवशी. मतदान कोणतेही असो, मोदी कपाळी भस्म लावून कधी केदारनाथ गुंफेत, कन्याकुमारी, पशुपतीनाथ आणि गंगेतही उभे राहतात. राजकारणात धर्म आणण्याचा हा अतिरेक. महाराष्ट्रासाठी बळी दिलेल्या रेड्याचे शिंग आणि पंतप्रधानांचे राजकीय गंगास्नान देशाला कोठे घेऊन जाणार?
संसदेचे अधिवेशन सुरू असताना आणि दिल्लीतील विधानसभा निवडणुकीचा मतदानाचा दिवस असताना आपले प्रिय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी हे प्रयागतीर्थी कुंभमेळ्यात गंगास्नानास गेले. पंतप्रधानांनी गंगेत डुबकी मारली व हाती रुद्राक्षाची जपमाळ घेऊन ते जपजाप्य करीत राहिले. गंगेच्या किनारी आपल्या पंतप्रधानांचे हे धर्मरूप पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली. विधानसभा निवडणूक मतदानाचा मुहूर्त पंतप्रधानांनी साधला. पंतप्रधानांना गंगास्नानासाठी दुसऱ्या दिवशीही जाता आले असते, पण त्यांनी मतदानाचा दिवस निवडला. दिल्लीच्या मतदारांनी संध्याकाळी मतदान संपेपर्यंत आपले गंगास्नान पाहावे, त्यानुसार मतदान करावे हा श्री. मोदी यांचा इरादा होता. तो सफल झाला. याआधी प्रत्येक निवडणुकीच्या मतदानात मोदी असेच वागले. कधी कन्याकुमारी, पशुपतीनाथ तर कधी केदारनाथच्या गुहेत मोदी गेले व धर्माच्या आधारे मतदारांना प्रभावित करीत राहिले. राजकारणात नाही, तर मतदानाच्या प्रक्रियेत धर्माला घुसवून यंत्रणा हायजॅक करण्याचा हा प्रयत्न यशस्वी होतो तो निवडणूक आयोग धृतराष्ट्राच्या भूमिकेत शिरल्यामुळे. एक श्रद्धाळू नागरिक म्हणून मोदी यांना कुंभात जाऊन श्रद्धापूर्वक स्नान करण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण मोदी हे सर्व लवाजमा घेऊन देशाचे पंतप्रधान म्हणून गेले. मतदारांवर प्रभाव टाकण्याचा हा भ्रष्ट प्रकार आहे. निवडणूक आयोग जागा असता तर त्यांनी मोदींचे हे डुबकी नाट्य वृत्तवाहिन्यांवर त्याच दिवशी दाखवण्यावर बंदीच घातली असती; पण संवैधानिक संस्थांकडून या अशा निष्पक्ष वर्तनाची अपेक्षा करणे आता फोल आहे.
गांधींचा धर्म
भारत हा आजही गांधींचा देश म्हणूनच ओळखला जातो. गांधी हे कडवट हिंदूच होते. गांधींनी आपले हिंदुत्व लपवले नाही, पण गांधीजी परखडपणे सांगतात, “मी जर सत्ताधारी झालो तर धर्म व राज्यसत्ता हे वेगवेगळी राहतील. माझ्या धर्माला मी चिकटून राहीन. त्याकरिता मी प्राणत्यागही करीन, पण तो माझा व्यक्तिगत विषय आहे. तुमच्या-माझ्या धर्माची काळजी वाहणे हे राज्यसंस्थेचे काम नाही, तर ज्याचा त्याचा व्यक्तिगत विषय आहे. तुमचा धर्म कोणता, असे जर तुम्ही मला विचारलंत तर मी सांगेन, तुम्ही माझे जीवन पहा. मी राहतो कसा, बोलतो, खातो कसा, सामान्यपणे काय मानतो, हे तुम्ही बारकाईने पाहिलं पाहिजे. या सर्व गोष्टींची जी गोळाबेरीज माझ्यात आढळेल तोच माझा धर्म आहे. गांधी यांनी देशभरात रामाची अनेक मंदिरे बांधली. बिर्ला यांच्या मदतीने बांधली. मोदी व त्यांच्या लोकांनी एका राममंदिराचे 25 वर्षे राजकारण केले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अयोध्येच्या श्रीरामाने बहुमत दिले नाही तेव्हा रामाला सोडून ‘जय जगन्नाथ’चा नारा दिला. कारण ओडिशात भाजपला यश मिळाले. राजकारणात धर्म व पुन्हा धर्मातही राजकीय स्वार्थ हे सर्व मागच्या दहा वर्षांत वाढत गेले. धर्म ही अफूची गोळी आहेच. ती अफू भाजपने घराघरांत पोहोचवली. लोकांना धर्माने नादावले आहे. एक पर्यटन उद्योगातील प्रमुख व्यक्ती भेटली, “देशातील पर्यटन उद्योग संपत चालला आहे. भारतात पर्यटक येत नाहीत. ते श्रीलंका, मलेशिया, थायलंड, मॉरिशसला जात आहेत.” हे त्यांनी सांगितले. हे का घडत आहे? यावर ते सांगतात, “भारत आता धर्मातीत राज्य राहिलेले नाही. भारतात आता पर्यटक येत नाहीत, तर pilgrimage म्हणजे तीर्थयात्री येतात. ते धर्मशाळा, छोट्या लॉजेसमध्ये उतरतात. ते फार खर्च करत नाहीत व हे लोक प्रामुख्याने तीर्थस्थान, धार्मिक जागांना भेटी देतात. त्यामुळे पर्यटनस्थळांचे महत्त्व कमी झाले. सरकार पर्यटनस्थळांऐवजी तीर्थस्थळांवर जास्त खर्च करत आहे. लोकांनी सदैव जपजाप्य करत बसावे ही योजना आहे. दुसरे असे की, पर्यटकांशी आपल्याकडे व्यवहार नीट होत नाहीत. महिला पर्यटकांवर बलात्कार आणि विनयभंगाचे प्रकार वाढले आहेत.” धर्मकांडाचा अतिरेक घडल्यामुळे भारत स्वतःचा उद्योग, व्यापार, प्रतिष्ठा, संस्कृती गमावत आहे. निवडणूक आता धर्मावरच लढली जाते. त्यामुळे सत्तेचे अधिष्ठानही धर्म बनला. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपची सर्व कार्यालये एका रात्रीत ‘जय श्रीराम’ घोषणांनी रंगवली व संपूर्ण दिल्लीत तशा पताका लावल्या. निवडणुका जिंकण्याचा हा नवा मार्ग आहे.
नेहरूंचा यज्ञ
नरेंद्र मोदी हे स्वतःला हिंदूंचे धर्माचार्य मानत आहेत व आपण आहोत म्हणून सध्या हिंदू श्वास घेत आहे असे त्यांना वाटते. पंडित नेहरूंपासून पुढचे सर्व पंतप्रधान हे धर्माचे मारेकरी होते हा अपप्रचार सुरूच आहे, पण ते खरे नाही. मोदी हे कुंभमेळ्यात गंगास्नान करून आले. या काळात हिंदूंच्या आखाड्यांचे महत्त्व आहे. आखाड्यांना एकजूट करून एक आखाडा परिषद स्थापन करण्यासाठी तेव्हा पंडित नेहरूंनी पुढाकार घेतला हे सत्य सध्याचे नवहिंदुत्ववादी कधीच सांगणार नाहीत. 1962 साली भारत आणि चीनमध्ये युद्ध झाले. चीन युद्ध जिंकण्याच्या दिशेने कूच करीत होता. भारताचा पाडाव सुरू झाला. पंडित नेहरू हताश झाले. त्यांनी मंत्रिमंडळातील आपल्या निकटच्या सहकाऱ्यांना विचारले, “आता काय? धर्मच मदत करेल. कोणी असा महात्मा सांगा की, जो हे युद्ध थांबवू शकेल किंवा भारताची प्रतिष्ठा राखणारा निकाल देऊ शकेल.” मंत्रिमंडळात काही धार्मिक लोक होते. ते म्हणाले, “एक स्वामीजी आहेत. त्यांनी मनात आणलं तर युद्ध थांबवू शकतील. तेवढी दिव्यशक्ती त्यांच्यात आहे.” नेहरूंनी विचारले, तो महात्मा कोण आहे? तर उत्तर मिळाले राष्ट्रीय स्वामी दजिया, जे दक्षिण काशी मंदिर पीठाचे अनुयायी होते. कालीमातेचे निस्सिम भक्त होते. जवाहरलाल नेहरूंनी हरिद्वारच्या डिस्ट्रिक्ट मॅजिस्टेटला टेलिग्राम केला. डी.एम.ने स्वामीजी आणि पंडितजींचे बोलणे करून दिले. दोघांत चर्चा झाली. स्वामीजी म्हणाले, मी भारताच्या सुरक्षेसाठी यज्ञ करीन, पण माझी अट आहे. या यज्ञाचे यजमान तुम्हालाच व्हावे लागेल. पंडितजी म्हणाले, स्वामीजी, मला नक्कीच आनंद झाला असता, पण मला शांतीवार्ता बैठकीसाठी विदेशात जावं लागतंय. मी माझी मुलगी इंदिरेस पाठवतो. ती यजमान बनेल. मी पूर्णाहुतीच्या दिवशी यज्ञाच्या स्थळी पोहोचतो. ठरल्याप्रमाणे पूर्णाहुतीच्या दिवशी पंडितजी आले. यज्ञाची पूर्णाहुती झाली. तेव्हा चीनने युद्ध थांबवले व सीजफायरची घोषणा केली. युद्ध चीन जिंकत होते. तरीही चीनने युद्ध थांबवले. नाहीतर भारताचे अतोनात नुकसान झाले असते. कैलाशानंद गिरी हे निरंजन आखाड्याचे प्रमुख. त्यांनी हा प्रसंग सांगितला व तो सत्य आहे. राजकारणात धर्म हा एक आधार आहे, सर्वस्व नाही. मोदी यांनी धर्म व राजकारणाची इतकी सरमिसळ करून ठेवली की, देशाचा सुसंस्कृत चेहराच बदलून गेला.
सर्वच अंधश्रद्धा. प्रत्येक निवडणुकीत आता धर्म आणला जातो. श्रद्धापेक्षा अंधश्रद्धा पसरवून लोकांना भ्रमित केले जात आहे. खरा धर्म मानवतेत आहे हे आपण विसरून गेलो. देव तीर्थात नाही आणि मूर्तीत नाही. तो तुमच्यासमोर दरिद्री नारायणाच्या रूपाने प्रत्यक्ष उभा आहे. त्याचीच प्रेमाने सेवा करा असे सांगणारा एक संत गाडगेबाबांच्या रूपात येथे जन्मून गेला. त्याने अंधश्रद्धेवर प्रहार केला. त्याच महाराष्ट्राचे सरकार अंधश्रद्धेच्या मायाजालात अडकून पडले. मुख्यमंत्री फडणवीस हे ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन राहायला तयार नाहीत; कारण आधीच्या भाडेकरूने बंगल्यात काळी जादू केल्याची अफवा आहे. याआधीचे शासनप्रमुख सत्ता राखण्यासाठी आसामच्या कामाख्य मंदिरात जाऊन रेड्यांचे बळी देत होते व त्याच बळी दिलेल्या रेड्याची शिंगे त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी पुरली. का, तर नवा मुख्यमंत्री तेथे टिकू नये. पुरोगामी महाराष्ट्रात हे सर्व घडावे यासारखे दुर्दैव नाही व मुख्यमंत्र्यांनी यावर विश्वास ठेवून ‘वर्षा’वर जाण्याचे टाळावे हे त्याहून मोठे दुर्दैव. अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा हा अशावेळी काय करतो? भुते नाहीत व त्या पुरलेल्या शिंगाने कावळाही मरत नाही हे अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांनी परखडपणे सांगायला हवे. युद्धाचे व संघर्षाचे रणशिंग फुंकणारा महाराष्ट्र मृत रेड्याच्या शिंगांच्या मायाजालात अडकून पडला. ज्या देशाचे पंतप्रधानच अंधश्रद्धेचे वाहक बनले त्या देशात दुसरे काय घडणार!
ट्विटर – @Rautsanjay61
जीमेल- [email protected]
Comments are closed.