रोखठोक – कैलास-मानसरोवर, बिघडले स्वर्गाचे दार…
कैलास-मानसरोवराकडे स्वर्गप्राप्तीसाठी निघालेल्या अनेक हिंदूंना दुर्दैवी मरण आले. नेपाळ-तिबेटमार्गे ते कैलासाला निघाले. पाण्याचा एक अजस्त्र लोट आला व सगळ्यांना पृथ्वीच्याच पोटात घेऊन गेला. कैलासावर भगवान शंकर आहेत. कैलास हे स्वर्गप्राप्तीचे द्वार आहे. स्वर्गाचे दार कसे बिघडले?
नेपाळ-तिबेट मार्गाने कैलास-मानसरोवराकडे निघालेल्या शेकडो श्रद्धाळूंचा दुर्दैवी अंत झाला आहे. भारतातून अनेक हिंदूंची पथके तेथे निघाली ती तिबेट सीमेवरील इमिग्रेशन सेंटरवरील पाण्याच्या तडाख्याने वाहून गेली. मुंबई-ठाण्यातील यात्रेकरू त्यात आहेत. या सगळ्यांचे अस्तित्वच संपले आहे व भारतातील त्यांचे नातेवाईक आक्रोश करीत आहेत. त्या बेपत्ता नातेवाईकांना शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. तिबेटच्या मार्गाने एक पाण्याचा अजस्र लोट उसळत आला व त्यात हजारो ‘जीव’ कायमचे वाहून गेले. नेपाळची पूर्ण ‘तबाही’ झाली आहे. एकेकाळच्या या हिंदू राष्ट्रातले देव, त्यांची मंदिरे हजारो भक्तांसह वाहून गेली. नेपाळच्या भूमीवरील धार्मिक शक्तिपीठे हे रौद्ररूप थांबवू शकली नाहीत. कैलासावर भगवान शंकराचे वास्तव्य आहे ही भावना आहे. त्या भगवान शंकराने पाण्याचे तांडव पाहिले, आपल्या भक्तांना गटांगळ्या खात वाहून जाताना पाहिले. भारतात मोदीछाप हिंदुत्वाचा ज्वर वाढला आहे. जे वाहून गेले त्यात काही अंधभक्त असू शकतात. कारण कैलासावर ईश्वराचा वास आहे व तेच स्वर्गाचे द्वार आहे असे आजही अनेकांना वाटते. ते सर्व लोक स्वर्गाच्या दारातूनच दुर्दैवाने गायब झाले.
पृथ्वीचा मानदंड
कैलास-मानसरोवराची ओढ हिंदू मनास अनेक शतकांची आहे. पुराणे व संस्कृत काव्यांत या दोन्हींची सुंदर वर्णने केली आहेत. पृथ्वीचा मानदंड असेही कैलासला मानण्यात आले आहे. राजहंस पक्षी स्वर्गात आहे तसा तो मानसरोवरावर आहे. यामुळे या जागेचे आकर्षण अधिकच वाढले. शेकडो वर्षे या दोन्हींची यात्रा भाविक हिंदू करत आहेत, पण ही यात्रा सोपी नाही. भारतीयांना ज्या स्वर्ग शिखरावर पोहोचायचे आहे, त्याचा दरवाजा चीनच्या भूमीतून जातो. नेपाळ, तिबेट, चीन व कैलास-मानसरोवर असा हा खडतर प्रवास व मग स्वर्ग. चीनने बराच काळ हे स्वर्गाचे दरवाजे भारतीयांसाठी बंदच करून ठेवले. त्यामुळे अनेक वर्षे लोक स्वर्गसुखाला मुकले. 1962 च्या भारत-चीन युद्धानंतर हा रस्ता भारतीयांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला होता. एप्रिल 1981 मध्ये डा. सुब्रमण्यम स्वामी यांनी चीनचे तत्कालीन सर्वोच्च नेते डेंग शियाओपिंग यांची भेट घेतली व कैलास-मानसरोवरचा मार्ग चीनने भारतीयांसाठी उघडला पाहिजे हे पटवून दिले. डेंग यांनी स्वामी यांची मागणी मान्य केली व 1981 पासून कैलास-मानसरोवर यात्रा सुरू झाली. हा मार्ग खुला झाल्यावर यात्रेकरूंच्या पहिल्या पथकाचे नेतृत्व डा. स्वामी यांनी केले होते. हा मार्ग खडतर आहे. या मार्गावरून ट्रेकिंग करण्यासाठी निष्णात गिर्यारोहक लागतात.
डॉ. स्वामी प्रथम तुकडीचे नेतृत्व करत कैलास यात्रेला निघाले तेव्हा त्यांच्या मित्रांनी व हितशत्रूंनी रोखण्याचा प्रयत्न केला. या मार्गाने गेलेला माणूस परत येत नाही असे त्यांच्या बायको व दोन लहान मुलींना सांगितले. “कैलास मार्गावर मरणे हे पुण्य आहे” असे एका भाजप खासदाराने डॉ. स्वामी यांना चेष्टेने सांगितले तेव्हा स्वामी हसत हसत म्हणाले, “छान! कैलास मार्गावर मरणे पुण्य असेल तर मला आश्चर्य वाटते की, भाजप किंवा आरएसएसचा एकही नेता आजपर्यंत कैलास यात्रेला का गेला नाही? कदाचित तिथे मुस्लिम नाहीत आणि पाडण्यासाठी मशीदही नाही!” भाजप मुस्लिमविरोधी आहे, पण हिंदू नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी कैलासला राजकीयदृष्ट्या काहीच महत्त्व नाही. कदाचित त्यामुळेच भाजपचे लोक उरी, पुलवामा, पहलगाम येथील हल्ल्यांत मरण पावलेल्या हिंदूंसाठी आक्रोश करताना दिसले. तो राजकीय आक्रोश होता, पण कैलास-मानसरोवरचे यात्रेकरू वाहून गेले त्यावर फक्त नि:शब्द आहेत. पंतप्रधान मोदी ताश्कंदला, सरसंघचालक भागवत अमेरिकेला, तर अमित शहा ‘गायब’ आहेत.
युरोपियन कुतूहल
कैलासला तिबेटमार्गे पोहोचावे लागले. तिबेटमध्ये बौद्ध मंदिरे, गुंफा आहेत. लामांनी येथे बौद्ध धर्मास एक वेगळे आध्यात्मिक स्वरूप दिले असले तरी त्यांचा धर्म बौद्धच आहे. त्यामुळे जगभरातील बौद्ध तिबेटची यात्रा करतात. एव्हरेस्ट हे सर्वोच्च उंच शिखर, पण कैलास पर्वत हे हिंदूंनी नेहमीच पवित्र मानले. कैलासावर ‘महादेव’ आहे ही श्रद्धा त्यांची, पण कैलास, मानसरोवर आणि तिबेट यांचा भूगोल शास्त्राच्या दृष्टीतून शोध घेऊन शास्त्रीयदृष्ट्या नकाशे तयार करण्याचे व तिथे पोहोचण्याचा मार्ग शोधण्याचे कार्य युरोपियन लोकांनी केले. हिंदू व बौद्धांना धार्मिक ओढ होती, तर पाश्चात्त्यांना शास्त्रीय ज्ञानाची. अर्थात अगदी प्रथम जे युरोपियन तिबेटात गेले, तेदेखील धार्मिक ओढीपायी. त्यांना हिंदू किंवा बौद्ध धर्माची ओढ नव्हती, तर ख्रिस्ती धर्मपीठाचा शोध घेणे, ख्रिस्ती संस्कृती जगाच्या या छपरावर अस्तित्वात आहे काय? हे त्यांना पाहायचे होते. शक्य असल्यास तिबेटमध्येही ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणे हे त्यांचे उद्दिष्ट होते, पण नोंदी असे सांगतात की, पहिले जे लोक तिबेटात पोहोचले ते अकबरामुळे. अकबरास धर्म जिज्ञासा होती. तिबेटच्या पुढे-मागे काय दडले आहे ते त्याला समजून घ्यायचे होते. त्याने काही साधूंना आग्र्यात बोलावले व कैलास, मानसरोवर, हिमालयातील तीर्थक्षेत्र यासंबंधी माहिती करून घेतली. अकबरालाही कैलास, मानसरोवर याबाबत जिज्ञासा निर्माण झाली. त्यानेही 1603 मध्ये एक अभ्यास मंडळ तिबेटकडे पाठवले, पण ते पथक तेथे पोहोचण्यात अयशस्वी ठरले. याचा अर्थ कैलासावर फक्त हिंदूच धडक देत नव्हते, तर ख्रिश्चन, इस्लाम, बौद्धही आपला मार्ग शोधत होते. 1715 मध्ये लडाखमार्गे इप्पोतिती देसिदेरी हा तरुण इटालियन मिशनरी तिबेटात पोहोचला. त्याचा प्रवास कमालीचा खडतर होता. त्या प्रवासात त्याला एक तार्तार राणी आपल्या लवाजम्यासह ल्हासाकडे जात असताना दिसली. तिने उदार अंत:करणाने आपल्या काफिल्यात देसिदेरीला सामील करून घेतले. प्रचंड थंडीने तो गारठू नये यासाठी खास उबदार पोशाख करून दिला. हा काफिला मजल दरमजल करीत मानसरोवरापाशी आला. तेथे छावणी पडली. या मुक्कामात सिंधू व सतलज या नद्यांच्या उगमाचा शोध त्यास लागला. कैलास-मानसरोवराचा रस्ता व शिखर गाठण्यासाठी धैर्य, काटकपणा, चिकाटी, हालअपेष्टा सोसण्याची, कोणत्याही संकटाला तोंड देण्याची तयारी तेव्हाही लागत होती. उपासमारीला, रोगराईला तोंड द्यावे लागे. अनेकदा टोळीवाल्यांचे हल्ले होत व त्यात यात्रेकरूंचे प्राण जात. प्राणवायूचा तुडवडा होताच. तेव्हा आजच्या प्रमाणे सोबत नेण्यासाठी प्राणवायूची छोटी सिलिंडर्स नव्हती. आज कैलासावर पोहोचण्यासाठी अनेक सुविधा निर्माण झाल्या आहेत, पण निसर्ग खवळला की होत्याचे नव्हते होते. तसेच आता सर्व घडले.
खडतर प्रवास
कैलास-मानसरोवराच्या यात्रेनंतर मनुष्य अमर होतो ही दंतकथा आहे. तेथे गेल्यावर स्वर्गप्राप्ती होते. कैलास हाच स्वर्गाचा दरवाजा आहे. जे तेथे पोहोचले ते स्वर्गाच्या प्रवासाला निघाले. ईशा फाऊंडेशन या आध्यात्मिक संस्थेतर्फे 80 जण या वेळी कैलास-मानसरोवर यात्रेला गेले. त्यातील 77 जण परत आले नाहीत. मुंबई-ठाणे वगैरे भागातील आणखी 30-35 जण स्वर्गाचा शोध घ्यायला कैलासला गेले. तेही आले नाहीत. जग्गी वासुदेव यांनी म्हणे त्यांच्या भक्तांना सांगितले होते की, “कैलास-मानसरोवर यात्रा करा. मी तुम्हाला अमरत्व प्राप्त करून देईन. कधीच मृत्यू येणार नाही याची खात्री देतो.”
एक अजस्र पाण्याचा लोट तिबेटमार्गे आला व अमरत्व चिखलात तडफडत वाहून गेले.
जे मरण पावले, त्यांचे नातेवाईक मृतदेहाच्या शोधासाठी आक्रोश करीत आहेत.
अमरत्व म्हणजे काय, ते तिबेटच्या दाराजवळ दिसले.
कैलास हे स्वर्गाचे दार…
त्या दारातून मोक्ष प्राप्त होतो.
स्वर्गाचे दार जणू साफ बिघडले!
ट्विटर – @rautsanjay61
Gmail- rautsanjay61@gmail.com01
Comments are closed.