ब्रिटनच्या राजघराण्यात भूकंप! एपस्टीन फाइल्स प्रकरणात प्रिन्स अँड्र्यूला अटक

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

ब्रिटनच्या राजघराण्यातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिवंगत राणी एलिझाबेथ यांचे पुत्र आणि किंग चार्ल्स यांचे धाकटे बंधू प्रिन्स अँड्र्यू (Prince Andrew) यांना अटक करण्यात आली आहे. कुप्रसिद्ध जेफ्री एपस्टीन प्रकरणाशी संबंधित नवीन फाइल्स समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली असून, यामुळे संपूर्ण ब्रिटनमध्ये खळबळ उडाली आहे.

अमेरिकेतील लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी जेफ्री एपस्टीन याच्याशी असलेल्या संबंधांमुळे प्रिन्स अँड्र्यू गेल्या अनेक वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात होते. नुकत्याच उघड झालेल्या नवीन कागदपत्रांमध्ये प्रिन्स अँड्र्यू यांच्या विरोधात ठोस पुरावे मिळाल्याचा दावा केला जात आहे. या पुराव्यांच्या आधारे तपास यंत्रणांनी ही मोठी कारवाई केली आहे.

प्रिन्स अँड्र्यू यांच्या अटकेनंतर किंग चार्ल्स यांनी कठोर पाऊल उचलले आहे. राजघराण्याची प्रतिमा जपण्यासाठी त्यांनी प्रिन्स अँड्र्यू यांचे सर्व शाही अधिकार आणि लष्करी मानमरातब यापूर्वीच काढून घेतले होते. आता अटकेच्या कारवाईनंतर राजघराण्याने या प्रकरणापासून स्वतःला पूर्णपणे दूर ठेवले असून, “कायदा आपले काम करेल,” अशी भूमिका घेतल्याचे समजते.

प्रिन्स अँड्र्यू यांना सध्या कोठडीत ठेवण्यात आले असून, त्यांची चौकशी केली जात आहे. येत्या काही दिवसांत त्यांना न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे लंडनच्या बकिंगहॅम पॅलेसमध्ये तणावाचे वातावरण असून किंग चार्ल्स यांनी तातडीची बैठक बोलावल्याची चर्चा आहे.

Comments are closed.