आता RSS चे कार्यकर्ते होणार भाजप मंत्र्यांचे PA, भाजप आणि संघात समन्वय राखण्यासाठी निर्णय

महायुतीतली भाजपच्या मंत्र्यांचे पीए हे थेट संघाचे कार्यकर्ते असणार आहेत. भाजपची मातृसंघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेला राज्याच्या निर्णयांवर आपल्या विचारसरणीची छाप पाडायची आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपच्या मंत्र्यांचे सर्व पीए हे थेट संघाच्या मुशीत घडलेले असतील. त्यामुळे संघ आणि भाजपमध्येही योग्य समन्वय साधता येईल.

गेल्या आठवड्यात भाजप आणि संघाच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पक्ष आणि सरकारच्या मुख्य समन्वयकपदी सुधीर देऊळगावकर यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. देऊळगावकर हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे पीए असून गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ते समन्वयक होते.

जेव्हा जेव्हा भाजपचं सरकार येतं तेव्हा संघातल्या कार्यकर्त्यांना सरकारमध्ये सामील करून घेण्याची प्रथा होती. आता अधिकृतरित्या पहिल्यांदाच अशा प्रकारे संघाच्या कार्यकर्त्यांना सरकारमध्ये सामील करून घेतले जाणार आहे. कुठल्याही मंत्र्यांच्या कार्यालयात दोन कर्मचाऱ्यांना नियुक्त करता येईल, असा नियम होता. पण आता संघाच्या कार्यकर्त्यांना सामावून घेण्यासाठी दोन ऐवजी चार कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्याचा नियम करण्यात आला आहे.

सर्व मंत्र्यांचे खासगी सचिवही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरवणार, असा निर्णय गेल्याच आठवड्यात घेण्यात आला होता. हे सचिव संघाचे कार्यकर्ते असून त्यांनी सरकारच्या विविध भागांत काम केल्याचा त्यांना अनुभव आहे.

या निर्णयामुळे पक्ष आणि सरकारमध्ये समन्वय निर्माण होईल अशी प्रतिक्रिया देऊळगावकर यांनी दिली. तसेच या निर्णयामुळे पक्षाचे कार्यकर्ते आणि लोकांमध्ये या सरकारबद्दल आपलेपणाची भावना निर्माण होईल, असेही देऊळगावकर म्हणाले. भाजपचे मंत्री पक्ष कार्यालयात जनता दरबार भरवतात. ज्या कार्यकर्त्यांना मंत्रालयात प्रवेश मिळत नाही त्यांना या जनता दरबारात आपलं म्हणणं मांडता येईल, असेही देऊळगावकर म्हणाले.

Comments are closed.