ठाणे खाडी किनारा मार्गाचे नियमबाह्य कंत्राट रद्द करा! सत्ताधारी-विरोधकांच्या एकमुखी मागणीमुळे शिंदे गटाची कोंडी

ठाण्यामधील घोडबंदर मार्गाला समांतर उभारण्यात येणाऱ्या खाडी किनारा मार्गासाठी नियमबाह्य कंत्राट देण्यात आले आहे. या प्रकल्पाचा खर्च तिपटीने वाढला असून हे कंत्राट रद्द करावे आणि त्याची एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी सत्ताधारी सदस्यांसह विरोधी पक्षाने विधान परिषदेत केली. त्यामुळे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणारे सत्ताधारी आणि विरोधक हे शिंदे गटाविरोधात एकत्र आल्याचे चित्र सभागृहात पाहायला मिळाले.
विधान परिषदेत तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून भाजप आमदार प्रसाद लाड यांनी ठाणे खाडी किनारा मार्गासाठी आवश्यक परवानग्या हाती येण्याआधीच एमएमआरडीएने 2 हजार 700 कोटींचे कंत्राट आचारसंहिता लागू होण्याआधीच दिल्याचा आरोप केला. त्याला उत्तर देताना पर्यावरणमंत्री शंभूराज देसाई यांनी ठाणे येथील बाळकुम ते गायमुख या 13.45 किमी लांबी आणि 3 हजार 364.62 कोटी किमतीच्या खाडी किनारा मार्ग प्रकल्पाचे काम एमएमआरडीए प्राधिकरणामार्फत हाती घेण्यात आल्याचे सांगितले.
ठाणे पालिकेने 2021 मध्ये पर्यावरण विभागाच्या मान्यतेसाठी ढोबळ अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. त्यानुसार प्रकल्पाची किंमत 1 हजार 316.18 कोटी इतकी रक्कम अंदाजित होती. मात्र, एमएमआरडीएने 2024 मध्ये केलेल्या सविस्तर अहवालानुसार प्रकल्पाची 3 हजार 364.62 कोटी इतकी किंमत झाली. प्राधिकरणाची मान्यता मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया राबवण्यात आल्याचे मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले.
सर्वपक्षीयांची एसआयटी मागणी
नवयुव कंत्राटदार हा सरकारचा जावई आहे. या कंत्राटदाराने आधीच्या एका कंत्राटात खोटी बँक गॅरंटी दाखवली, असा आरोप झाला होता. खाडी किनारा मार्गाचे हे कंत्राट मोठय़ा प्रमाणात नियम डावलून वाढवण्यात आलेले आहे. यात पारदर्शकता नाही. याची एसआयटी चौकशी केली जावी, अशी सर्वपक्षीयांचीही मागणी आहे. या कंत्राटदाराकडून 10 ते 20 टक्के आगाऊ टक्केवारी घेऊन काम दिले गेलेले नसेल तर याची एसआयटी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना सदस्य सचिन अहिर यांनी केली. मात्र, एसआयटीची आवश्यकता नाही. पाहिजे असेल तर या कंत्राटाची आणखी सविस्तर माहिती आम्ही सादर करू, असे शंभुराज देसाई यांनी सांगितले. त्यावर सर्व सदस्यांनी गदारोळ घातला. दरम्यान, सभापती राम शिंदे यांनी याबाबत माझ्या दालनात बैठक घ्या, असे निर्देश दिले.
Comments are closed.