दापोलीत करवाढीचा निर्णय सत्ताधाऱ्यांनी गुंडाळला; शिवसेनेच्या दणक्याचा परिणाम

दापोली नगर पंचायतीच्या विशेष सभेत करवाढीचा विषय चांगलाच गाजला. पाणीपट्टीसह विविध कर वाढविण्याचा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनी मांडताच शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नगरसेवकांनी त्याला कडाडून विरोध केला. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात शिवसेनेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे अखेर सत्ताधाऱ्यांना नमते घ्यावे लागले. शिवसेनेच्या प्रखर विरोधामुळे सत्ताधाऱ्यांना करवाढीचा प्रसत्वा गुंडाळावा लागला.
दापोली नगरपंचायत विशेष सभा पार पडली. या सभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या नगरसेविका आणि माजी नगराध्यक्षा ममता मोरे तसेच नगरसेवक संदीप चव्हाण यांनी करवाढीला ठाम विरोध करत सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले. नागरिकांना मूलभूत सुविधा देता येत नसतील, तर करवाढ लादण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? नागरिकांना सोयी सुविधा मिळत नसल्याने आधीच शहरातील नागरिक त्रस्त आहेत. मनमानी करत दरवाढ लादली, तर आम्ही नागरिकांना घेऊन रस्त्यावर उतरू, असा इशारा शिवसेनेच्या नगरसेवकांनी दिल्यावर सभागृहात तणाव निर्माण झाला.
शिवसेना नगरसेवकांच्या आक्रमक भूमिकेमुळे सत्ताधाऱ्यांना माघार घ्यावी लागली आणि करवाढीचा निर्णय पुढे ढकलण्यात आला. आचारसंहिता लागू असताना असा प्रस्ताव का मांडला, असा सवालही संदीप चव्हाण यांनी उपस्थित करून सत्ताधाऱ्यांना घेरले. सभेला सत्ताधारी १४ नगरसेवक उपस्थित होते त्यांना शिवसेनेचचे संदिप चव्हाण तसेच ममता मोरे या नगरसेवकांनी प्रश्नांची सरबत्ती करत त्यांना भंडावून सोडले. शिवसेना नगरसेवकांच्या आक्रमक भुमिकेमुळे सत्ताधाऱ्यांचे संख्याबळ असतानाही सत्ताधारी कर वाढीचा निर्णय घेण्यास अपयशी ठरले. त्यामुळे समाजहिताची भुमिका घेणाऱ्या शिवसेना नगरसेवकांना नागरिकांची सहानुभूती मिळतेय तर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात शहरातील नाक्या नाक्यावर नाराजी व्यक्त होत आहे.
सत्ताधाऱ्यांनी आर्थिक विषयाचे योग्य नियोजन केले तर वाढीव करवाढ रोखता येईल,आम्ही सत्तेत असताना याचे योग्य नियोजन केले होते.त्यामुळे सगळ्या घटकांना योग्य न्याय देता आला. त्यामुळे आमच्या काळात वाढीव करवाढ करण्याचा प्रश्न आला नाही. नगर पंचायतीचे उत्पन्न सोर्स वाढविण्यासाठी शासनाकडे मागणी करा सत्ता तुमची असताना लोकांच्या मानेवर करवाढीचे जोखड कशाला ?
– ममता मोरे , माजी नगराध्यक्ष दापोली नगर पंचायत दापोली

Comments are closed.