पेट्रोल, डिझेल, गॅस बंद होणार! अफवेने काल रात्रीपासून नांदेडात पेट्रोल पंपावर व गॅस एजन्सीवर रांगाच रांगा, प्रशासन सुस्त
चार दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत आखाती देशातील युध्दाच्या पार्श्वभूमीवर देशात कोरोनासारखी लॉकडॉऊनची परिस्थिती निर्माण होवू शकते, असे भाषण केल्याने गेल्या दोन दिवसापासून शहर आणि जिल्ह्यात अफवा पसरल्या आणि पेट्रोल, डिझेल आणि गॅससाठी लोकांनी रांगाच रांगा लावल्या. काही पेट्रोलपंप रात्रीच बंद पडले. प्रशासनाची व पुरवठा विभागाची कचुराई व सतर्कता न बाळगळल्याने नांदेडकर मात्र त्रस्त झाले आहेत.
चार दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखाती देशातील युध्दाच्या पार्श्वभूमीवर देशात कोरोनासारखी परिस्थिती पुन्हा उदभवू शकते, तसेच लॉकडॉऊनची शक्यता नाकारता येत नाही असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर गेल्या दोन दिवसापासून नांदेड शहर आणि जिल्ह्यात पसरलेल्या अफवा व पेट्रोल, डिझेल वाटप बंद होणार अशा सामाजिक माध्यमावरील पोष्टमुळे नांदेडकरांची चांगलीच धावपळ उडाली. काल दुपारपासून ते आज सायंकाळपर्यंत सर्वच पेट्रोल पंपावर व गॅसच्या दुकानावर भर उन्हात रांगाच रांगा दिसून आल्या. काही पेट्रोल पंप चालकांनी होणारी गर्दी, वाहन चालकांत होणारे वाद लक्षात घेवून काल सायंकाळी अनेक पेट्रोल पंप बंद केले. त्यामुळे अजूनच या अफवेला चालना मिळाली. आज सकाळी सात वाजल्यापासून शहरातील पावडेवाडी, छत्रपती चौक, एसटी महामंडळ चौक, पोलीस कॉलनी, आयटीआय, वजिराबाद, स्टेशन रोड, जुनामोंढा, कौठा, सिडको आदी भागातील 22 ते 25 पेट्रोल पंपावर प्रचंड रांगा दिसून आल्या. तसेच छत्रपती चौक, मोर चौक, महावीर चौक, आनंदनगर, आयटीआय, सिडको, आदी भागातील गॅसच्या दुकानावर दुपारपर्यंत लोक रांगा लावून होते. अचानक उदभवलेल्या परिस्थितीमुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. स्वतः जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, उपजिल्हाधिकारी सचिन खल्लाळ, तहसीलदार संजय वारकड यांनी शहरात विविध पेट्रोल पंपांना भेटी देवून वाहन धारकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मात्र या रांगा सायंकाळपर्यंत थांबू शकल्या नाही. पॅनिक झालेल्या नागरिकांनी पेट्रोलचा अतिरिक्त साठा तसेच सर्व गाड्यांमध्ये पेट्रोल, डिझेल फुल करुन घेतले. गॅसच्या संदर्भात तीच परिस्थिती निर्माण झाली. त्यातच 25 दिवस होवूनही नंबर लागत नसल्याने चिडलेल्या ग्राहकांनी दुकानावरच वादावादी सुरु केली. यामुळे सगळाच गोंधळ निर्माण झाला. काही ठिकाणी पोलिसांना बंदोबस्तही द्यावा लागला. एकीकडे रामनवमीच्या मिरवणुकीच्या बंदोबस्ताचा ताण असताना या अफवेमुळे पोलिसांचीही तारांबळ उडाली. पुरवठा विभाग मात्र केवळ आवाहन करुन मोकळे झाले.
दरम्यान जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी जनतेला आवाहन केले आहे की, जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल व गॅसचा मुबलक साठा उपलब्ध असून, कुणीही साठेबाजी करु नये, पेट्रोल व डिझेलसाठी आता रेशनिंगची पध्दत अवलंबिली जाणार असून, दोनशे ते तिनशे रुपयांचे पेट्रोल प्रत्येक ग्राहकांना दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. जनतेने पॅनिक न होता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. मात्र जिल्ह्यातील भाजपचे लोकप्रतिनिधी यावर मूग गिळून गप्प असून, शिंदे गटाच्या शहरातील दोन्ही आमदारांनी याबाबत बघ्याची भूमिका घेतल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. जिल्ह्यातील मुखेड, देगलूर, भोकर, धर्माबाद, बिलोली, किनवट आदी भागातही हिच परिस्थिती निर्माण झाली असून, जिल्ह्यात त्यामुळे वाहन धारक संतप्त झाले आहेत. प्रशासनाकडून कुठलीही कठोर अंमलबजावणी होत नसल्याने ग्राहक चिडल्याचे दिसून आले.
Comments are closed.