रशियाने दिली तेल पुरवठ्याची गॅरंटी; हिंदुस्थानने अमेरिकेला केले महत्त्वाचे आवाहन
आखाती देशात सुरू असलेले युद्ध आणि वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानने अमेरिकेला रशियाकडून तेल खरेदीवर देऊ केलेली सवलत वाढवण्याचे आवाहन केले आहे. हिंदुस्थानने अमेरिकेला सांगितले आहे की, सध्याच्या परिस्थितीत ऊर्जा पुरवठा कायम ठेवणे महत्त्वाचे आहे. तेल बाजारातील अस्थिरतेचा हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेवर आणि नागरिकांवर थेट परिणाम होऊ शकतो.
अमेरिकेने मार्चमध्ये प्रथमच हिंदुस्थान आणि इतर देशांना रशियन तेल खरेदी करण्यासाठी विशेष सूट दिली होती. ही सूट नंतर १६ मे २०२६ पर्यंत वाढवण्यात आली. या सवलतीमुळे हिंदुस्थानला रशियाकडून सवलतीच्या दरात मोठ्या प्रमाणात कच्चे तेल खरेदी करता आले. आता रशियाने तेल आणि नैसर्गिक वायू पुरवण्याची हमी हिंदुस्थानला दिली आहे. त्यानंतर हिंदुस्थानने सवलत वाढवण्याची मागणी अमेरिकेसमोर ठेवली आहे.
युक्रेन युद्धानंतर रशियावर आर्थिक दबाव वाढवण्यासाठी रशियाकडून होणारी तेल खरेदी कमी करण्याकरिता अमेरिकेने हिंदुस्थानवर सातत्याने दबाव आणला आहे. मात्र, इराण युद्ध आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तणावामुळे आता जागतिक तेल पुरवठ्यात व्यत्यय येत असून हिंदुस्थानची चिंता वाढली आहे.
‘इकॉनॉमिक टाइम्स’मधील एका वृत्तानुसार, भारतीय अधिकाऱ्यांनी अमेरिकेला सांगितले आहे की, तेल बाजारातील सततच्या अशांततेचे गंभीर सामाजिक आणि आर्थिक परिणाम होऊ शकतात. विशेषतः हिंदुस्थानसारख्या देशात जिथे १.४ अब्ज लोकांच्या ऊर्जेची गरज प्रचंड आहे आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या तुटवड्यासारख्या समस्या आधीच भेडसावत आहेत. अमेरिकेच्या ट्रेझरी डिपार्टमेंटकडूनही या आवाहनाला कोणताही अधिकृत प्रतिसाद आलेला नाही.
नवी दिल्लीत ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहण्यापूर्वी आरटी इंडिया या वृत्तवाहिनीशी बोलताना रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह म्हणाले की, हिंदुस्थानच्या ऊर्जाविषयक हितांचे पूर्णपणे संरक्षण केले जाईल, हे रशिया सुनिश्चित करेल. ते म्हणाले, मी हमी देतो की रशियन ऊर्जा पुरवठ्याशी संबंधित हिंदुस्थानच्या हितांवर कोणताही परिणाम होणार नाही.
हिंदुस्थानने मे महिन्यात विक्रमी पातळीवर रशियन तेलाची आयात केली. ‘इकॉनॉमिक टाइम्स’ने ‘क्लॅपर’ या डेटा फर्मचा हवाला देत वृत्त दिले आहे की, हिंदुस्थानने मे महिन्यात दररोज अंदाजे २३ लाख बॅरल रशियन तेल आयात केले. संपूर्ण महिन्याची सरासरी दररोज सुमारे १९ लाख बॅरल असू शकते, असा अंदाज आहे, जी अजूनही एक लक्षणीय संख्या मानली जाते. तज्ज्ञांच्या मते, जर आखाती संघर्ष असाच लांबत राहिला, तर हिंदुस्थान स्वस्त रशियन तेलावरील आपले अवलंबित्व आणखी वाढवू शकतो. त्यामुळे देशांतर्गत इंधनाच्या किमती नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
Comments are closed.