रशियाचा युक्रेनवर हल्ला, 749 ड्रोन्स आणि 20 क्षेपणास्त्रांचा भयानक मारा

रशिया आणि युक्रेनमधील रक्तरंजित संघर्ष आणखी चिघळला आहे. रशियाने शस्त्रसंधीची शक्यता फेटाळली असून रविवारी रात्रभर युक्रेनवर हल्ले केले. रशियन सैन्याने तब्बल 749 ड्रोन्स आणि 20 क्षेपणास्त्रांद्वारे युक्रेनच्या विविध भागांना लक्ष्य केले. तर युव्रेनच्या हवाई संरक्षण प्रणालीने रशियाचे 277 ड्रोन आणि 19 क्षेपणास्त्र हवेतच नष्ट केली. परंतु, काही भागात प्रचंड नुकसान झाले असून अद्याप जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
रशियाने 10 ठिकाणांना लक्ष्य केल्याचा दावा युव्रेनच्या हवाई दलाने केला आहे. युद्ध सुरू झाल्यापासूनचा हा सर्वात मोठा हल्ला असल्याचा दावा रिव्हने शहराचे मेयर ओलेक्सांडर ट्रेटयाक यांनी केला आहे. या हल्ल्यानंतर नाटोतील सहकारी देश पोलंडने आपली जेट्स युक्रेनच्या सीमेवर उडवली. दुसरीकडे युक्रेनच्या ऑपरेशन स्पायडरवेबला उत्तर म्हणून हा हल्ला करण्यात आल्याचा दावा रशियाने केला आहे. युक्रेनने 1 जून रोजी रशियाच्या चार प्रमुख हवाई तळांवर ड्रोन्स डागले होते. या हल्ल्यात रशियाचे 7 अब्ज डॉलरचे नुकसान झाले. या हल्ल्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी चोख प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला होता.
एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप
रशिया आणि युक्रेनदरम्यान शस्त्रसंधीची चर्चा थांबलेली आहे. दोन्ही देशांत मारल्या गेलेल्या सैनिकांचे मृतदेह आणि युद्धकैद्यांना परत पाठवण्यावरून वाद सुरू आहे. युक्रेन 12 हजार मृतदेह आणि कैद्यांची अदला-बदली करण्यासाठी जाणूनबुजून विलंब करत आहे, असा रशियाचा आरोप आहे; तर रशियाने 1 हजारांहून अधिक कैद्यांची नावे पाठवली नसल्याचा युक्रेनचा आरोप आहे.
युक्रेनच्या पूर्व निप्रॉपेट्रोस क्षेत्रावर रशियाचा कब्जा
रशियाचे सैनिक युव्रेनमध्ये घुसले असून पूर्व निप्रॉपेट्रोस क्षेत्रावर त्यांनी कब्जा मिळवल्याचे वृत्त आहे. युद्धाच्या दृष्टीने रशियाचे हे पाऊल अत्यंत गंभीर वळण घेऊ शकते असे म्हटले जात आहे. मोठय़ा प्रमाणावर रणगाडे या ठिकाणी पोहोचल्याचा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे.
रशियाचा हल्ला बदला नसून विनाश करण्यासाठी – झेलेन्स्की
युक्रेनच्या हल्ल्याचा बदला घेतल्याचे रशियाने म्हटले आहे. परंतु, रशियाने रविवारी रात्रभर केलेले हल्ले बदला नसून युक्रेनचा विनाश करण्याच्या दृष्टीने केलेले हल्ले असल्याचा दावा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी केला आहे.
Comments are closed.