रशियाचा युक्रेनवर पुन्हा ड्रोनहल्ला; हिंदुस्थानी औषध कंपनीचा प्रकल्प उद्ध्वस्त; एकाचा मृत्यू
रशिया-युक्रेनमधील संघर्ष अद्याप सुरूच असून आज पुन्हा एकदा रशियाने युक्रेनवर ड्रोनहल्ले केले आहेत. यामध्ये कीव्ह, निप्रो, खारकीव्ह, डोनेत्स्क, सुमी आणि झापोरिझिया या प्रदेशांना लक्ष्य करण्यात आले. दरम्यान, सुमीमधील एका हिंदुस्थानी औषध निर्मिती कंपनीचा प्रकल्प पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. त्यात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे युक्रेनमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
रशिया आणि युक्रेनमधील संघर्षाला चार वर्षे पूर्ण झाली, मात्र अद्याप कोणताही तोडगा निघाला नसल्याने युद्ध संपलेले नाही. या चार वर्षांच्या कालावधीत हे दोन्ही देश एकमेकांच्या शहरांवर सातत्याने हवाई हल्ले करत आहेत. रशियाने रविवारी पहाटे युक्रेनवर १३५ ‘स्ट्राइक ड्रोन्स’ डागले. त्यांपैकी ५० हून अधिक ड्रोन ‘जेट-पावर्ड’ चालणारे होते. हल्ल्यात रशियन सैन्याने कीव्हमधील ‘नॉर्दर्न ब्रिज’वरही पुन्हा एकदा हल्ला केला. सुदैवाने या ठिकाणी कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र सुमीमध्ये औषध निर्मिती कंपनीवर झालेल्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू आणि निप्रोमध्ये कम्युनिकेशन्स कंपनीवर झालेल्या हल्ल्यात सहा जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर युक्रेननेही प्रत्युत्तर देणार असल्याचा इशारा युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी ‘एक्स’च्या माध्यमातून दिला आहे.
प्रत्युत्तर देण्याचा इशारा
रशियाने या आठवड्यात युक्रेनविरुद्ध १,९०० हून अधिक स्ट्राइक ड्रोन्स, १,७०० हवाई बॉम्ब आणि २५ क्षेपणास्त्रांचा वापर केला. या हल्ल्यांमध्ये रशियाने नेहमीप्रमाणेच सामान्य निवासी इमारती आणि महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा असलेल्या ठिकाणांना मुख्य टार्गेट केले आहे. या हल्ल्यामुळे काही भागांत वीजपुरवठा खंडित झाला असून मदत पथके हल्ल्याच्या ठिकाणी कार्यरत झाल्याचे झेलेन्स्की यांनी सांगितले.
Comments are closed.