झेलेन्स्की म्हणाले, याहून अमानवी काहीच असू शकत नाही; ख्रिसमसच्या दिवशी रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला

युक्रेनियन आपत्कालीन सेवेने प्रदान केलेल्या या प्रतिमेमध्ये, बुधवार, 25 डिसेंबर, 2024 रोजी युक्रेनमधील डनिप्रॉपेट्रोव्स्क प्रदेशातील देशाच्या ऊर्जा प्रणालीवर रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर अग्निशामकांनी आग विझवली. AP/PTI(AP12_25_2024_000224A)

रशिया आणि युक्रेन यांच्यात रक्तरंजित संघर्ष सुरू असताना आज ख्रिसमसच्या दिवशीच रशियाने युक्रेनवर तब्बल 70 क्षेपणास्त्रे आणि 100हून अधिक ड्रोन्स डागून मोठा हल्ला केला. एकीकडे नाताळचा उत्साह असताना दुसरीकडे रशियाने अशा प्रकारे हल्ला करून अमानवी कृती केली असून रशियाने त्यांच्या ऊर्जेसंबंधी पायाभूत सुविधाच उद्ध्वस्त करून टाकल्याचा आरोप युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्डीमीर झेलेन्स्की यांनी केला आहे.

झेलेन्स्की यांनी एक्सवर एक निवेदन जारी केले आहे. जगभरात नाताळ सण साजरा केला असताना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी जाणीवपूर्वक युक्रेनच्या ऊर्जेसंबंधी पायाभूत सुविधांवर हल्ला केल्याचा आरोप झेलेन्स्की यांनी केला आहे. प्रत्येक मोठय़ा हल्ल्याच्या तयारीसाठी वेळ लागतो. तो कधीच उत्स्फूर्तपणे घेतलेला निर्णय नसतो. मात्र हा मुद्दाम घेतलेला निर्णय आहे. पुतिन यांनी जाणूनबुजून हल्ल्यासाठी ख्रिसमसची निवड केली. यापेक्षा अमानवी काय असू शकते, असे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.

बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचाही समावेश

रशियाने 70हून अधिक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे आणि शंभरहून अधिक ड्रोन यांचा समावेश आहे. लक्ष्य होते आमची ऊर्जा प्रणाली, असेही झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. ब्लॅक सी येथून रशियाने कालिब क्रूझ क्षेपणास्त्रे डागल्यानंतर युव्रेनमध्ये हवाई हल्ल्याचे सायरन वाजू लागले आणि सर्वत्र एकच गोंधळ उडाला.

सध्या रशियाकडून हवाई हल्ले वाढवले आहेत. तर पूर्वेकडील सैन्य पुढे ढकलले जात आहे. यादरम्यान बुधवारी पहाटे खार्किव शहरावर मोठय़ा प्रमाणावर क्षेपणास्त्रे डागण्यात आली.

Comments are closed.