पृथ्वी शॉसाठी ऋतुराज गायकवाडची हृदयस्पर्शी कृती! CSKचा कर्णधार धोनीच्या वाटेवर
मुंबईचा संघ सोडल्यानंतर पृथ्वी शॉ (prithvi Shaw) रणजी ट्रॉफी 2025 मध्ये महाराष्ट्र संघाकडून खेळताना दिसत आहे. चंदीगडविरुद्धच्या सामन्यात शॉनं जबरदस्त कामगिरी केली. त्यानं अप्रतिम फलंदाजी करत दुहेरी शतक झळकावलं आणि आपल्या तडाखेबाज खेळानं सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
महाराष्ट्राकडून खेळणाऱ्या ऋतुराज गायकवाडचाही (Ruturaj gaikwad) फॉर्म उत्तम राहिला. त्यानं दोन्ही डावांत दमदार फलंदाजी केली. याच कामगिरीमुळे संघाच्या विजयानंतर त्याची ‘मॅन ऑफ द मॅच’ म्हणून निवड झाली. पण त्यानंतर ऋतुराजने जे केलं, त्यामुळे सोशल मीडियावर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
जेव्हा ऋतुराजला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार मिळाला, तेव्हा त्याने तो एकट्याने स्वीकारण्यास नकार दिला. त्याने दुहेरी शतक झळकावणाऱ्या पृथ्वी शॉला बोलावलं आणि तो पुरस्कार त्याच्यासोबत शेअर केला. ऋतुराजचा हा सुंदर आणि मनाचा मोठेपणा पाहून चाहते खुश झाले आणि त्यांनी त्याची तुलना एम.एस. धोनीशी केली.
ऋतुराज सध्या चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार आहे आणि धोनीसोबत त्याचं उत्तम नातं आहे. धोनीच्या मार्गदर्शनाखाली ऋतुराजने अनेक हंगाम सीएसकेसाठी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यामुळेच धोनीने त्याची पुढील कर्णधार म्हणून निवड केली.
चंदीगडविरुद्धच्या सामन्यात ऋतुराजने पहिल्या डावात 116 धावांची शानदार खेळी केली, तर दुसऱ्या डावातही तो उत्तम लयीत दिसला आणि 35 चेंडूंवर 36 धावा ठोकल्या.
पृथ्वी शॉने मात्र दुसऱ्या डावात कमाल केली. त्याने फक्त 156 चेंडूंवर 222 धावांची धडाकेबाज खेळी केली. या डावात शॉने 29 चौकार आणि 5 षटकार लगावले. रणजी ट्रॉफीच्या इतिहासातलं हे दुसरं सर्वात वेगवान दुहेरी शतक ठरलं. शॉने आपली डबल सेंच्युरी केवळ 141 चेंडूंवर पूर्ण केली आणि मैदानाच्या चारही बाजूंना अप्रतिम फटके खेळले.
त्याच्या या जबरदस्त खेळीमुळे महाराष्ट्र संघाने दुसऱ्या डावात 3 बाद 359 धावा असा मजबूत स्कोअर उभारला. मात्र पहिल्या डावात शॉ फक्त 8 धावांवर बाद झाला होता.
Comments are closed.