चौथ्या वनडेत टीम इंडियात मोठे बदल निश्चित! रोहित शर्मासोबत सलामीला फलंदाजी करण्याची कोणाला मिळणार संधी?
भारत आणि न्यूझीलंड (India & New Zealand) यांच्यातील 5 सामन्यांच्या वनडे मालिकेतील चौथा सामना शुक्रवार, 13 नोव्हेंबर रोजी माउंट माउंगानुई येथे खेळवला जाणार आहे. भारतीय संघ सध्या मालिकेत 2-0 ने आघाडीवर असून चौथा वनडे सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. मात्र, या सामन्यापूर्वी भारतीय संघात 3 मोठे बदल करण्यात आले आहेत.
कर्णधार शुबमन गिल, केएल राहुल आणि अंशुल कंबोज यांना आगामी दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या तयारीसाठी शेवटच्या दोन वनडे सामन्यांतून विश्रांती देण्यात आली आहे. दरम्यान, 26 वर्षीय वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारही (Gurnoor Brar) न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यातून बाहेर होण्याची शक्यता आहे.
रिपोर्ट्सनुसार,भारतीय संघ व्यवस्थापन न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या वनडे सामन्यापूर्वी गुरनूर ब्रारला संघातून मुक्त करण्याच्या विचारात आहे. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय माउंट माउंगानुई येथे होणाऱ्या चौथ्या वनडे सामन्यानंतर घेतला जाईल. सूत्रांच्या माहितीनुसार, सांगण्यात आले आहे की, संघ व्यवस्थापन गुरनूर ब्रारला वनडे संघातून मुक्त करण्याचा विचार करत आहे. शुक्रवारी टॉरंगा येथे होणाऱ्या चौथ्या सामन्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यानंतर ब्रार कसोटी संघासोबत जोडला जाऊ शकतो आणि आगामी कसोटी मालिकेच्या तयारीसाठी सराव करेल.
मात्र, न्यूझीलंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी जाहीर करण्यात आलेल्या 15 सदस्यीय भारतीय संघात त्याला स्थान मिळालेले नाही. गुरनूर ब्रारची उंची 6 फूट 5 इंच असून त्याच्या गोलंदाजीची शैली कसोटी क्रिकेटसाठी उपयुक्त मानली जाते. त्यामुळे संघ व्यवस्थापन त्याला कसोटी संघासोबत जोडून आगामी सामन्यांसाठी तयार करू इच्छित आहे. मात्र, अद्याप त्याला वनडे संघातून मुक्त करण्याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
दरम्यान, शुबमन गिल, केएल राहुल आणि अंशुल कंबोज हे हॅमिल्टन येथून थेट वेलिंग्टनला रवाना झाले आहेत. हे तिन्ही खेळाडू मालिकेतील सुरुवातीच्या 3 वनडे सामन्यांसाठीच भारतीय संघाचा भाग होते. विशेष म्हणजे, हे तिन्ही खेळाडू मागील सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्येही खेळले होते. त्यामुळे चौथ्या वनडे सामन्यात त्यांच्या जागी नव्या खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे.
आता संघ व्यवस्थापनासमोर सलामीची जोडी निवडण्याचे मोठे आव्हान असणार आहे. शुबमन गिल (Shubman gill) वनडे संघातून बाहेर झाल्यानंतर रोहित शर्मासोबत (Rohit Sharma) सलामीला कोण उतरणार, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. गिलच्या जागी ईशान किशन (Ishaan kishan & Ruturaj Gaikwad) किंवा ऋतुराज गायकवाड यापैकी एकाला रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करण्याची संधी मिळू शकते.
सलामीवीर म्हणून ईशान किशन हा एक मजबूत पर्याय मानला जात आहे. यापूर्वीही तो भारतीय संघाकडून सलामीवीर म्हणून खेळला आहे. विशेष म्हणजे, याच स्थानावर फलंदाजी करताना त्याने द्विशतकही झळकावले आहे. दुसरीकडे, ऋतुराज गायकवाडनेही आपल्या कारकिर्दीत प्रामुख्याने सलामीवीराची भूमिका बजावली आहे. मात्र, गेल्या काही काळात जेव्हा जेव्हा त्याला वनडे संघात संधी मिळाली, तेव्हा त्याला मधल्या फळीत फलंदाजी करावी लागली आहे. त्यामुळे यावेळीही संघ व्यवस्थापन त्याला मधल्या फळीत फलंदाजीसाठी पाठवू शकते.
Comments are closed.