SA20: सनरायझर्स ईस्टर्न केपचा दबदबा कायम, प्रिटोरिया कॅपिटल्सवर मात करत तिसऱ्यांदा जेतेपद
दक्षिण आफ्रिकेतील लोकप्रिय टी20 लीग SA20 च्या चौथ्या मोसमाचा अंतिम सामना रविवारी (25 जानेवारी) रंगला. या सामन्यात सनरायझर्स ईस्टर्न केपने दमदार कामगिरी करत प्रिटोरिया कॅपिटल्सचा 6 विकेट्सनी पराभव केला आणि तिसऱ्यांदा SA20चे जेतेपद पटकावले. मार्को यानसेनच्या भेदक गोलंदाजीनंतर मॅथ्यू ब्रीट्झके आणि कर्णधार ट्रिस्टन स्टब्स यांच्या नाबाद अर्धशतकांच्या जोरावर सनरायझर्सने कठीण परिस्थितीतून सावरत हा ऐतिहासिक विजय मिळवला.
प्रिटोरिया कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 7 विकेट्स गमावत 158 धावा केल्या. डेवाॅल्ड ब्रेविसने शानदार फलंदाजी करत 56 चेंडूत 8 चौकार आणि 7 षटकारांसह 101 धावांची झंझावाती खेळी केली. त्याला ब्राइस पार्सन्सची (30) चांगली साथ मिळाली. या दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी झाली. मात्र, अखेरच्या षटकांत सनरायझर्सच्या गोलंदाजांनी अचूक मारा करत प्रिटोरियाला मोठी धावसंख्या उभारू दिली नाही.
सनरायझर्सकडून मार्को यानसेनने केवळ 10 धावा देत 3 विकेट्स घेतल्या, तर एनरिच नोर्कियाने 19 धावांत 1 विकेट घेतली. या दोघांनी मिळून प्रिटोरियाच्या फलंदाजांवर मोठा दबाव निर्माण केला.
159 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या सनरायझर्सची सुरुवात खराब झाली. संघाने अवघ्या 48 धावांत 4 विकेट्स गमावल्या. मात्र त्यानंतर मॅथ्यू ब्रीट्झके आणि कर्णधार ट्रिस्टन स्टब्स यांनी डाव सावरला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 114 धावांची नाबाद भागीदारी करत सामन्याचा चेहरामोहरा बदलला.
ब्रीट्झकेने 49 चेंडूत 68 धावांची संयमी पण आक्रमक खेळी केली, तर स्टब्सने 41 चेंडूत 63 धावा ठोकल्या. अखेरच्या षटकांत दोघांनीही मोठे फटके खेचत संघाला 19.2 षटकांतच विजय मिळवून दिला.
या विजयासह सनरायझर्स ईस्टर्न केपने चार मोसमांत तिसऱ्यांदा SA20चे विजेतेपद पटकावले असून, या लीगमधील सर्वात यशस्वी संघ म्हणून आपली ओळख अधिक भक्कम केली आहे. सलग चौथ्यांदा अंतिम फेरी गाठणाऱ्या सनरायझर्सने पुन्हा एकदा दबावात सर्वोत्तम कामगिरी कशी करावी, हे दाखवून दिले.
Comments are closed.