SA20: सीएसकेचा नवा हिरो; अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर सुपर किंग्सची बाजी

दक्षिण आफ्रिकेत सध्या SA20 2025 स्पर्धेची धूम सुरू आहे. 27 डिसेंबर रोजी या हंगामातील दुसरा सामना जोबर्ग सुपर किंग्स आणि प्रिटोरिया कॅपिटल्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात जोबर्गकडून खेळणाऱ्या अकील हुसैनने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागांत प्रभावी कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या IPL मिनी ऑक्शनमध्ये चेन्नई सुपर किंग्सने अकील हुसैनला 2 कोटी रुपयांना विकत घेतले होते.

सामन्यात जोबर्ग सुपर किंग्सला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली. संघाने 20 षटकांत 6 विकेट्स गमावत 168 धावांचा भक्कम स्कोर उभारला. मधल्या फळीत राइली रूसोने 48 धावांची संयमी खेळी केली, तर वियान मुल्डरने 43 धावांचे योगदान दिले. मात्र, डावाच्या शेवटी अकील हुसैनने दाखवलेली आक्रमकता निर्णायक ठरली. हुसैनने अवघ्या 10 चेंडूंमध्ये 22 धावा ठोकल्या. या खेळीत त्याने एक चौकार आणि दोन षटकार लगावत धावगतीला वेग दिला, ज्यामुळे जोबर्गला सन्मानजनक आणि आव्हानात्मक स्कोर गाठता आला.

गोलंदाजीतही अकील हुसैनने आपली उपयुक्तता सिद्ध केली. त्याने 3 षटकांत केवळ 19 धावा देत एक महत्त्वाची विकेट घेतली. त्याचबरोबर रिचर्ड ग्लीसनने 2 विकेट्स, तर डुआन जॅनसेनने शानदार गोलंदाजी करत 4 विकेट्स पटकावल्या. याशिवाय वियान मुल्डर आणि जॉनको स्मित यांनी प्रत्येकी एक विकेट घेत प्रिटोरियाच्या फलंदाजीवर अंकुश ठेवला.

169 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना प्रिटोरिया कॅपिटल्सची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली नाही. ब्रायस पियरसनने 30 चेंडूंमध्ये 41 धावांची झुंजार खेळी केली, तर विल स्मीडने 34 धावा केल्या. मात्र, इतर फलंदाज अपयशी ठरल्याने प्रिटोरियाचा डाव 20 षटकांत 9 विकेट्स गमावत केवळ 146 धावांपर्यंतच मर्यादित राहिला.

Comments are closed.