दुर्गम दापूरमाळमध्ये आली विकासाची गंगा, सामना च्या बातमीनंतर प्रशासन फास्ट ट्रॅकवर

शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम असलेल्या दापूरमाळ या गावाला 75 वर्षांनंतर न्याय मिळाला आहे. दैनिक ‘सामना’ने या गावची व्यथा छायाचित्रासह प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासन कमालीचे फास्ट ट्रॅकवर आले असून या गावाला आता पक्के रस्ते, घरकुले, शुद्ध पाणी आणि नवी शाळा मिळणार आहे. या विकासकामांचा नारळ आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूरचे गटविकास अधिकारी बी. राठोड यांच्या हस्ते वाढवण्यात आला.

दापूरमाळ हे गाव गेली 75 वर्षे सरकार दरबारी दुर्लक्षित अवस्थेत होते. आरोग्य, शिक्षण, वीज, रस्ता यांसह अनेक मूलभूत सुविधा आणि विकासापासून हे गाव कोसो दूर होते. दापूरमाळच्या शाळेची अवस्था अक्षरशः कोंडवाड्यासारखी होती. भिंतींना तडे, तुटलेले पत्रे, छत कोसळू नये म्हणून लावलेला टेकू अशा अवस्थेत विद्यार्थी जीव मुठीत धरून शिक्षण घेत होते. दापूरमाळ गावात दोन पाड्यांत 42 कुटुंबे राहतात. स्वातंत्र्याचा अमृतकाळ सुरू होऊनही या गावात जायला साधा रस्ता नसल्याने रुग्णांना डोलीतून रुग्णालय गाठावे लागते.

दैनिक ‘सामना’च्या 22जुलैच्या अंकात या गावची सचित्र व्यथा मांडण्यात आली होती. ही बातमी वाचून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी 23 जुलै रोजी दापूरमाळ गावाला भेट दिली. त्यांनी संपूर्ण पाडा चालत पिंजून काढला. येथील गावकरी आणि विद्यार्थ्यांचे जिणे पाहून रोहन घुगेही हेलावले आणि त्यांनी गावकऱ्यांना विकासाचे वचन देत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तत्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार गावातील विविध विकासकामांचा आराखडा तयार करण्यात आला. अनेक वर्षांच्या मागणीनंतर दापूरमाळच्या विकासकामांना गती मिळणार असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे व उत्साहाचे वातावरण आहे. यावेळी अजनूपचे सरपंच शांताराम भगत, उपसरपंच अजय कथोरे, सर्व पंचायत सदस्य, भाऊ खोरगडे, विस्तार अधिकारी बी. एस. जाधव, ग्रामपंचायत अधिकारी मंगल परमार, एम. आर. ई. जी. एस. सहाय्यक कार्यक्रम अधिकारी अनंता घल पे, वनविभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

या कामांचा श्रीगणेशा झाला

वनविभागाच्या सहकार्याने दापूरमाळपर्यंत पाच किलोमीटरचा रस्ता तयार करणार
एकूण 33 मंजूर घरकुलांसाठी बांधकाम साहित्य पुरवणार, त्यासाठी सीएसआर निधीतून विशेष सहाय्य करण्यात येणार
अजनूप गावातून दोन टप्प्यांत लिफ्टिंगद्वारे पाणीपुरवठा योजनेची अंमलबजावणी करणार
शाळा व अंगणवाडीचे बांधकाम करण्याकरिता साहित्याची पूर्ण वाहतूक करून जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीच्या इमारतीचे बांधकाम तत्काळ सुरू करणार

Comments are closed.