सामना प्रभाव – रिक्षाचालकांचे परवाने तपासणार; मीरा-भाईंदरमध्ये बोगसगिरी टाळण्यासाठी परिवहन मंत्र्यांचे आदेश
रिक्षांचे लायसन्स तसेच बॅच मिळवण्यासाठी जन्मतारखेचे बनावट दाखले दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर परिवहन विभाग खडबडून जागा झाला आहे. मीरा-भाईंदरमधील सर्व रिक्षाचाल कांचे परवाने व आवश्यक असलेली कागदपत्रे सखोल तपासण्याचे आदेश परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. गेल्या दहा वर्षांतील परवान्यांची तपासणी केली जाणार असून त्याचा सविस्तर अहवाल १ मेपर्यंत सादर करण्यात येणार आहे.
रिक्षांच्या लायसन्स, बॅचसाठी महानगरपालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागाने जन्मतारखेचे बनावट दाखले दिल्याचा भंडाफोड माहिती अधिकारात झाला होता. याबाबतचे वृत्त २७ मार्च रोजी दैनिक ‘सामना’मध्ये प्रसिद्ध झाले. त्याची गंभीर दखल परिवहन खात्याने घेतली असून मीरा-भाईंदरमधील सर्व रिक्षाचालकांचे परवाने आता पुन्हा नव्याने तपासले जाणार आहेत. त्यामुळे बनवाबनवी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार असून महिनाभराचा कॅम्प आयोजित करण्यात येणार आहे. त्यात प्रत्येक रिक्षाचालकाची कागदपत्रे बारकाईने तपासावीत, असे आदेश परिवहनमंत्र्यांनी दिले आहेत.
त्यांच्यावर काय कारवाई करणार?
रिक्षांची लायसन्स, बॅच तसेच परमिट मिळवण्यासाठी १५ वर्षे अधिवासाचा पुरावा आवश्यक असतो. तो मिळवण्याकरिता जन्मतारखेबरोबरच अन्य कागदपत्रेही जोडावी लागतात. मीरा-भाईंदरमधील सहाजणांनी सादर केलेल्या जन्मदाखल्यांमध्ये २६७६ या एकाच क्रमांकाचा उल्लेख आढळला होता. ही बनावट प्रमाणपत्रे देणाऱ्यांवर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments are closed.