Iran – मोजतबा खामेनी इराणचे नवे सर्वोच्च नेते, ट्रम्प यांचा विरोध झुगारला

मोजतबा खामेनी! हे नाव आहे इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्याचे. अयातुल्ला खामेनी हे इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यात मारले गेल्यानंतर इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या पदावर कुणाची निवडण होणार याकडे सगळ्यांचे लक्षं लागले होते. तो सस्पेंस आता संपला असून अयातुल्ला अली खामेनी यांच्या जागी मोजतबा खामेनी यांची निवड करण्यात आली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा विरोध झुगारून इराणने सोमवारी मोजतबा खामेनी यांची त्यांचे वडील अली खामेनी यांच्या जागी ‘सर्वोच्च नेते’ (Supreme Leader) म्हणून निवड केली आहे. अमेरिका आणि इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धाला एक आठवडा पूर्ण होत असतानाच, इराणच्या सत्तेवर कट्टरपंथीयांची पकड अजूनही मजबूत असल्याचे या निर्णयावरून स्पष्ट होत आहे.

मोजतबा खामेनी हे मध्यम श्रेणीतील धर्मगुरू असले, तरी इराणच्या सुरक्षा दलांवर त्यांचा मोठा प्रभाव आहे. तसेच त्यांच्या वडिलांच्या अधिपत्याखाली असलेल्या अवाढव्य व्यावसायिक जाळ्यावरही त्यांचे नियंत्रण आहे. ८८ धर्मगुरूंचा समावेश असलेल्या ‘अॅसेंब्ली ऑफ एक्सपर्ट्स’ कडून होणाऱ्या या निवडीत मोजतबा यांचे नाव सुरुवातीपासूनच आघाडीवर होते. अली खामेनी यांच्यानंतर नवीन नेता निवडण्याची जबाबदारी याच मंडळाकडे असते.

तेहरानच्या वेळेनुसार मध्यरात्रीनंतर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात असेंब्लीने म्हटले की, ‘बहुमताने दिलेल्या निर्णयानुसार, असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्सने अयातुल्ला सय्यद मोजतबा हुसेनी खामेनी यांची इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या पवित्र व्यवस्थेचे तिसरे सर्वोच्च नेते म्हणून नियुक्ती केली आहे.’ या नियुक्तीमुळे मोजतबा यांना इराणच्या सर्व सरकारी आणि धोरणात्मक बाबींमध्ये अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार प्राप्त झाले आहेत.

मोजतबा यांच्या या नियुक्तीमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प संतापण्याची शक्यता आहे. रविवारी ‘एबीसी न्यूज’शी बोलताना ट्रम्प यांनी म्हटले होते की, या निवडीमध्ये वॉशिंग्टनचा (अमेरिका) सहभाग असायला हवा. ‘जर त्यांनी आमची मंजुरी घेतली नाही, तर ते फार काळ टिकणार नाहीत’, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला होता. दुसरीकडे, अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच इस्रायलनेही इशारा दिला होता की, जो कोणी नवा नेता निवडला जाईल, त्याला लक्ष्य केले जाईल.

आता मोजतबा यांची निवड झाल्यानंतर इस्रायल अमेरिकेच्या हल्ल्यांच्या संदर्भात काय भूमिका घेणार याकडे जगाचे लक्षं लागले आहे.

Comments are closed.