रोखठोक – नेहरू द्वेषाचे मूळ

`ऑपरेशन सिंदूर’वर संसदेत चर्चा झाली. पंतप्रधानांपासून गृहमंत्री, संरक्षणमंत्री वगैरेंनी `पहलगाम’ हल्ल्यास पुन्हा पंडित नेहरूंनाच दोषी ठरवले. मृत्यूनंतर साठ वर्षांनंतरही नेहरू मोदी व त्यांच्या भाजपला जगू देत नाहीत, झोपू देत नाहीत. नेहरू मोदींच्या छाताडावर बसले आहेत. इतका नेहरू द्वेष का?

भारतीय जनता पक्ष आणि त्याची विचारधारा ही स्वातंत्र्यानंतर उदयास आली. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात संघ विचाराचे लोक नव्हते व भाजप जन्मास आला नव्हता. त्यामुळे महात्मा गांधी, पंडित नेहरू यांच्याविषयी आजच्या मोदी भाजपमध्ये द्वेष दिसत आहे. संसदेत पहलगाम हल्ला, `ऑपरेशन सिंदूर’वर चर्चा झाली, पण चर्चेत काय दिसले? पंतप्रधान मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री शहा, विदेश मंत्री जयशंकर, भाजपचे अध्यक्ष नड्डा या सगळय़ा `महान’ नेत्यांनी पहलगाम हल्ल्याचे खापर पं. नेहरूंवर फोडले. ही त्यांची वैचारिक दिवाळखोरी आहे. भारत-पाक युद्धात चीन पाकिस्तानच्या बाजूने उभा राहिला. हेसुद्धा पंडित नेहरूंमुळेच झाले, असे श्री. मोदी, जयशंकरसारखे लोक संसदेत सांगत राहिले. नेहरू यांचे निधन होऊन 60 वर्षे होऊन गेली. नेहरूंनंतर अटल बिहारी वाजपेयी, मोरारजी देसाई, व्ही.पी. सिंग व आता तब्बल 11 वर्षे मोदी हे देशावर राज्य करीत आहेत. नेहरूंच्या चुका दुरुस्त करण्यासाठी हे महान लोक अपयशी का ठरले? मोदी यांना ज्ञान-विज्ञानाचा तिटकारा आहे. पैसे, खोटेपणा आणि अत्युच्च दर्जाची बनियेगिरी या सामर्थ्यावर ते पंतप्रधान झाले. स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेले व देशाच्या सामाजिक, राजकीय चळवळीत योगदान नसलेले ते पहिले पंतप्रधान आहेत. नेहरूंच्या तुलनेत मोदी-शहा वगैरे लोक धूलिकणांच्या क्षमतेचे नाहीत. नेहरूंचे नाव वारंवार घेऊन आपले गुन्हे आणि अपयश झाकणे हे योग्य नाही, पण मोदींकडे दुसरा पर्याय नाही. मोदी यांनी काय केले? नेहरूंची उंची झाकण्यासाठी अहमदाबादेत सरदार पटेल यांचा अतिभव्य पुतळा उभा केला, पण तो पुतळाही गळू लागला व शेवटी झाकून ठेवावा लागला (सरदार पटेलांनाही मोदींचे राजकारण रुचले नाही). `आापरेशन सिंदूर’च्या चर्चेत मी राज्यसभेत सरदार पटेल आणि नेहरूंचा विशेष संदर्भ दिला. भारतीय जनता पक्षाच्या `ट्रेझरी’ बाकावरील लोकांना पं. नेहरू जगू देत नाहीत आणि झोपू देत नाहीत. सरदार पटेल यांच्या आठवणीनेही ते व्याकूळ होतात. काँग्रेसच्या माझ्या सहकाऱ्यांनी काय करायचे? काँग्रेसने एक ऐतिहासिक चूक केली आहे ती म्हणजे सरदार पटेल यांना पंतप्रधान न करण्याची. सरदार पटेल यांनी सर्वप्रथम राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालून कठोर कारवाई केली होती. सरदार साहेब खरेच पंतप्रधानपदी बसले असते तर त्यांनी संघावर कायमची बंदी घातलीच असती व आजचा भाजप जो सत्तेवर बसलेला दिसतोय, तो उखडून तेव्हाच फेकला असता. तुम्ही इथे दिसलाच नसता, पण पटेल अकाली गेले व लोकशाहीवादी नेहरूंनी संघावरील बंदी उठवून जीवदान दिले. नेहरू हे `लिबरल’ होते. विचारांची लढाई विचाराने लढणारे होते. भाजप नेहरूंच्या चुका रोज काढतो. त्यासाठी बहुधा त्यांनी स्वतंत्र मंत्रालय स्थापन केल्याचे दिसते. पण नेहरूंची एकच घोडचूक देशाला महाग पडत आहे ती म्हणजे संघावरील बंदी उठवण्याची. मोदी, शहांसारख्या लोकांनी ज्याप्रकारे धर्मांध राजकारणाचा उच्छाद व गलिच्छ राजकारणाची सुरुवात केली त्यास आजचा संघ जबाबदार आहे.

आंतरराष्ट्रीय दृष्टी!

मोदी वगैरे लोकांना कोणतीच विचारसरणी नाही. ते एक अशिक्षित, गावंढळ व पुढे पुढे करण्यात आनंद मानणारे नेतृत्व आहे. त्यांना इतिहासाचे भान नाही. नेहरू हे विज्ञानवादी होते. स्वातंत्र्यानंतरचे नेहरूंचे कार्य सगळय़ांनाच माहीत आहे; पण स्वातंत्र्याच्या चळवळीतले नेहरूंचे महत्त्वाचे योगदान म्हणजे काँग्रेसला त्यांनी आंतरराष्ट्रीय दृष्टी दिली. नेहरूंनी भारताच्या स्वातंत्र्य लढय़ाला जो आंतरराष्ट्रीय संदर्भ निर्माण केला, त्यामुळेच स्वातंत्र्यानंतर नेहरू, टिटो आणि नासर यांनी निर्माण केलेली गटनिरपेक्षतेची चळवळ आंतरराष्ट्रीय राजकारणात प्रभावी ठरली. सत्य, अहिंसा, हिंदू-मुस्लिम ऐक्य, खादी, नई तालीम, ग्रामोद्योग, हरिजनोद्धार यांसारख्या महात्मा गांधींच्या अनेक कल्पना स्वातंत्र्यानंतर लोप पावत गेल्या व लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, आत्मनिर्भरता, नियोजन व गटनिरपेक्षता या नेहरूंच्या सहा कल्पना प्रभावी ठरल्या. आर्थिक समता आणि सामाजिक न्याय नसेल तर राजकीय स्वातंत्र्याला अर्थ नाही ही विचारसरणी नेहरूंमुळेच काँग्रेसमध्ये तयार झाली. स्वातंत्र्य म्हणजे केवळ गोऱ्या अधिकाऱ्यांच्या जागी हिंदी अधिकारी आणणे असे होत नाही, असे प्रतिपादन प्रथम नेहरूंनीच केले. नियोजनाशिवाय समाजवाद आणता येणार नाही हे त्यांनी ओळखले होते. त्यांच्या आग्रहामुळेच काँग्रेसने 1938मध्येच सुभाषचंद्र बोस यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय नियोजन समिती नेमली आणि नियोजनाचा आराखडा तयार केला. मोदी, शहांच्या भाजपला हा इतिहास समजणे अवघड आहे.

इतिहास

आजचा भाजप पंडित नेहरूंवर सातत्याने हल्ले करत आहे. हे हल्ले करण्याचे स्वातंत्र्य त्यांना पंडित नेहरूंमुळेच मिळाले. सरदार पटेल, सुभाषचंद्र बोस (मोदींचे सोयिस्कर हीरो) हे पंतप्रधान झाले असते तर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पाळेमुळे मुळापासून उखडली असती. त्यामुळे भाजप कधीच दिसला नसता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी भाजप मान्य करीत असेल तर एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे ती म्हणजे भाजप, संघ कधीच आधुनिकतेचा पुरस्कार करणारे नव्हते. हे आजच्या त्यांच्या कारवायांवरून दिसतं. व्यक्तिस्वातंत्र्याच्या मर्यादा आणि आर्थिक समानतेची आवश्यकता पंडित नेहरूंनी ओळखली तेवढी संघ विचाराच्या, हिंदू महासभेच्या लोकांनी ओळखली नव्हती. त्यामुळे भारतावर इंग्रजांचे राज्य आले काय, राहिले काय याबाबत त्यांना काहीच सोयरसुतक नव्हते. 1925मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली. त्यांनी स्वातंत्र्याच्या लढय़ात सहभाग घेतला, पण संघाने घेतला नाही. 1942च्या `भारत छोडो’ आंदोलनाच्या वेळी हेडगेवार यांनी मध्य प्रदेशच्या त्या वेळच्या इंग्रज राज्यपालाला “संघ या चळवळीत भाग घेणार नाही,” असे आश्वासन दिले. 1942च्या चळवळीत अटल बिहारी वाजपेयी यांनी भाग घेतला, परंतु “मी या चळवळीतून अंग काढून घेत आहे,” असे विधान माजिस्ट्रेटपुढे त्यांनी केले होते. संघातील काही तरुणांनी 1942च्या चळवळीत भाग घेण्याची इच्छा व्यक्त केली. यावर सरसंघचालक गोळवलकर गुरुजी भडकले व गुरुजींनी त्या स्वयंसेवकांना शिस्तभंगाची शिक्षा काय दिली तर त्यांना इंग्रजांच्या सैन्यात दाखल होण्याचे आदेश दिले. 1944ला पुण्यात अरण्येश्वर येथे भरलेल्या संघाच्या शिबिरात गोळवलकर गुरुजींनी कहर केला. 1942च्या `भारत छोडो’ चळवळीची थट्टा केली. ते म्हणाले की, “कसला `भारत छोडो’? एक वाऱ्याची झुळूक आली, दोन-चार झाडे पडली, यापेक्षा 1942मध्ये विशेष काही घडले नाही,” हा इतिहास आहे. पंडित नेहरूंचाही स्वातंत्र्य लढय़ाचा, त्यासाठी तुरुंगात जाण्याचा, राष्ट्राला स्वत:ची संपत्ती दान करण्याचा, भारताला आधुनिकतेकडे नेण्याचा इतिहास आहे. मोदी व त्यांचा भाजप नेहरूंचे चीनविषयक धोरण, तेव्हाचा कश्मीर प्रश्न यावर आजही धुरळा उडवीत आहेत. पण 11 वर्षांच्या सत्तेत मोदी व त्यांचे लोक जे `सुख’ भोगत आहेत ते जवाहरलाल नेहरूंमुळे!

नेहरूंचा द्वेष करणे सोपे आहे, पण नेहरू बनणे कठीण आहे. ईव्हीएम घोटाळा, पैशांचा वापर, मतदार यादीतला घोटाळा यामुळे मोदी-शहा बनणे सोपे आहे, पण नेहरू कुणालाच बनता येणार नाही. मोदीकृत भाजपचे हे दु:ख समजून घेतले पाहिजे.

ट्विटर – @Rautsanjay61

जीमेल- rautsanjay61@gmail.com

Comments are closed.