'मास्टर ब्लास्टर' बीसीसीआयचं अध्यक्षपद स्वीकारणार? SRT टीमनं केला मोठा खुलासा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष रॉजर बिनी यांनी 70 वर्षांची वयोमर्यादा पूर्ण झाल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला. बीसीसीआयच्या संविधानानुसार कोणत्याही अधिकाऱ्याला 70 वर्षांपेक्षा जास्त वय झाल्यावर पदावर राहण्याची परवानगी नाही.

बिनींच्या राजीनाम्यानंतर टीम इंडियाचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरला बीसीसीआय प्रमुखपदाची जबाबदारी मिळणार अशी चर्चा रंगली होती. मात्र आता SRT (सचिन रमेश तेंडूलकर) स्पोर्ट्स मॅनेजमेंटकडून या चर्चेला पूर्णविराम देण्यात आला आहे.

SRT स्पोर्ट्स मॅनेजमेंटचे अधिकृत वक्तव्य

सचिन रमेश तेंडुलकर (SRT) स्पोर्ट्स मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडकडून जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे,
“आमच्या निदर्शनास आले आहे की सचिन तेंडुलकरचे नाव भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदासाठी विचाराधीन असल्याच्या काही अफवा पसरवल्या जात आहेत. आम्ही स्पष्ट करू इच्छितो की असे काहीही झालेले नाही. सर्व संबंधित पक्षांनी या निराधार चर्चांकडे दुर्लक्ष करावे.”

28 सप्टेंबरला होणार बीसीसीआय निवडणूक

बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा 28 सप्टेंबर रोजी होणार आहे. यात नवा बीसीसीआय प्रमुख तसेच आयपीएल अध्यक्ष निवडला जाण्याची शक्यता आहे. आयपीएल अध्यक्ष अरुण कुमार धूमल यांचा सहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत असून, ते “कूल-ऑफ पिरीयड”वर जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सचिव देवजीत सैकिया, संयुक्त सचिव रोहन गौंस देसाई आणि कोषाध्यक्ष प्रभतेज सिंह भाटी आपल्या पदांवर कायम राहतील अशी अपेक्षा आहे. उपाध्यक्ष राजीव शुक्ला हे देखील बीसीसीआयशी काही ना काही स्वरूपात जोडलेले राहतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

सचिन तेंडुलकरची गणना जगातील महान फलंदाजांमध्ये होते. कसोटी व वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतकं झळकावणारा तो एकमेव फलंदाज आहेत. कसोटीत त्याच्या नावावर 15,921 धावा तर वनडेत 18,426 धावा नोंद आहेत.

Comments are closed.