घर आणि हिंदुस्थानी माझे कुटुंबच
आयुष्यात कुटुंब या घटकाला खूप महत्त्व आहे, आपल्या चांगल्या क्षणी, अडचणीच्या प्रसंगी कोणतीही अपेक्षा न ठेवता तुमच्याबरोबर तुमचे कुटुंबच असते. क्रिकेट खेळत असताना घर, ड्रेसिंग रूम आणि करोडो हिंदुस्थानी हे माझे कुटुंबच होते, अशी भावना भारतरत्न सचिन तेंडुलकर याने रविवारी व्यक्त केली. चितळे बंधू मिठाईवाले यांच्या व्यवसायाला 75 वर्षे झाल्याच्या निमित्ताने कृतज्ञता सोहळय़ाचे आयोजन कर्वे नगर येथील पंडित फार्म्स येथे करण्यात आले होते. यावेळी माधव, श्रीकृष्ण, संजय, केदार व इंद्रनील चितळे उपस्थित होते. चित्रकार कपिल भीमकर यांनी काढलेले चित्र देऊन सचिनचा सत्कार करण्यात आला. यावेळी बासरीवादक अमर ओक, कवी वैभव जोशी आणि पंडित आनंद भाटे यांनी विशेष कार्यक्रम सादर केला. आवड, नेतृत्वक्षमता आणि कामाप्रति असणारी वचनबद्धता असली की, कामामध्ये यश मिळते. चितळे बंधूंनी हे गुण जपत आपले कुटुंब एकत्र ठेवून व्यवसाय वाढवला. आज त्यांच्याबरोबर आपण जोडले गेल्याचा आनंद असल्याची भावना सचिनने व्यक्त केली.
Comments are closed.