धर्माच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती दिली

गुरु तेगबहादुरसिंग यांच्या 350 व्या प्राणसमर्पण दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अभिवादन

वृत्तसंस्था / कुरुक्षेत्र (हरियाणा)

भारताचे महान योद्धे आणि धर्मगुरु गुरु तेगबहादुरसिंग यांनी धर्माच्या रक्षणार्थ आपल्या प्राण समर्पित केले असून सत्याचे संरक्षण हे त्यांचे ध्येय होते, अशा भावोत्कट शब्दांमध्ये त्यांच्या 350 व्या ‘शहीद दिनी’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा गौरव केला आहे. या दिनानिमित्त हरियाणातल्या कुरुक्षेत्र येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात ते मंगळवारी भाषण करीत होते. गुरु तेगबहादुरसिंग यांनी जी परंपरा निर्माण केली, त्याच परंपरेचे पालन आम्ही करु, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तेगबहादुरसिंग हे शीख समाजाचे नववे धर्मगुरु होते.

तेगबहादुरसिंग यांच्या 350 व्या ‘शहीद दिना’निमित्त पंतप्रधान नरेंद मोदी यांना या कार्यक्रमात त्यांच्या सन्मानार्थ एक विशेष नाणे आणि एका डाक तिकिटाचे अनावरण केले. या कार्यक्रमाला हरियाणाचे मुख्यमंत्री नायाब सिंग सैनी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक सदस्य, तसेच इतर अनेक मान्यवर आणि सन्माननीय राजकीय नेतेही उपस्थित होते. जनतेचाही उत्स्फूर्त प्रतिसाद होता.

धर्मध्वज आरोहाचा उल्लेख

या कार्यक्रमातील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दुपारी अयोध्येत रामजन्मभूमीस्थानी झालेल्या धर्मध्वजारोहण कार्यक्रमाचाही उल्लेख केला. मंगळवारी दुपारी मी प्रभू रामचंद्रांच्या जन्मभूमीत होतो. त्यानंतर आता मी भगवान श्रीकृष्णांच्या कर्मभूमीत आहे. हा विलक्षण योगायोग आहे. 9 नोव्हेंबर 2029 या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने रामजन्मभूमीसंबंधीचा आपला ऐतिहासीक एकमुखी निर्णय दिला होता. त्यासंबंधीही एक हृद्य प्रसंग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भाषणात विशद केला. ज्या दिवशी रामजन्मभूमीचा निर्णय येणार होता, त्याचदिवशी ते पंजाबमधील डेरा बाबा नानक येथे कर्तारपूर मार्गिकेचे उद्घाटन करण्यासाठी गेले होते. भव्य राममंदिराच्या निर्माणकार्याचा मार्ग प्रशस्त होऊ दे आणि कोट्यावधी भाविकांचे ध्येय पूर्ण होऊ दे, अशी प्रार्थना त्यांनी डेरा बाबा नानक येथे केली होती. ती प्रार्थना फळाला आली, हा अविस्मरणीय प्रसंग त्यांनी स्पष्ट केला.

गुरु तेगबहादुरसिंग यांनी मृत्यूला न घाबरता सत्य आणि न्याय या दोन प्रमुख धर्मतत्वांचे संरक्षण केले. ते पराक्रमी योद्धा, धर्मतत्ववेत्ते, महान कवी आणि समाजक्रांतीकारक होते. त्यांच्यामुळे या देशातील धर्माचे रक्षण झाले. त्यांच्या बलिदानामुळे भारतात धर्मरक्षणासाठी पराक्रम गाजविण्याची एक महान परंपरा निर्माण झाली. तोच मार्ग आजही आपल्याला प्रेरित करणार आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

भगवान श्रीकृष्णाचा उपदेश शिरोधार्थ

भगवान श्रीकृष्ण यांनी याच कुरुक्षेत्राच्या भूमीवर महाभारतीय युद्धाच्या प्रसंगी एक महान संदेश साऱ्या मानवजातीला दिला होता. सत्य आणि न्याय यांचे संरक्षण करणे हाच महान धर्म आहे, असा तो संदेश आहे. तसेच ‘स्वधर्मे निधनम् श्रेय:’ असाही संदेश त्यांनी याच भूमीवरुन दिला होता. स्वत:च्या धर्मासाठी मरण पत्करण्यासाठीही प्रत्येकाने सज्ज राहिले पाहिजे, असा या संदेशाचा अर्थ आहे. गुरु तेगबहादुरसिंग यांनीही सत्य आणि न्याय यांच्यासाठी प्राणार्पण केले. त्यांच्या महान कार्याचे स्मरण आपण सर्वांनी सातत्याने ठेवले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

महाआरतीत सहभाग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुरुक्षेत्र येथील महाआरतीतही सहभाग घेतला. भगवान श्रीकृष्णांच्या स्मरणासाठी या आरती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जनतेचा मोठा प्रतिसाद लाभला होता. भारताच्या धर्म आणि सांस्कृतिक विश्वात भगवान श्रीकृष्णांचे योगदान प्रचंड आणि महत्वाचे आहे. कुरुक्षेत्राच्याच भूमीवर रणांगणात श्रीकृष्णांनी भगवद्गीता अर्जुनाला दिली आहे.

 

Comments are closed.