पंजाब दा पुत्तर… बॉलीवूडचा ही-मॅन!
‘एक एक को चुन चुन के मारूंगा’ असे म्हणत भल्याभल्या खलनायकांना धडकी भरवणाऱ्या बॉलीवूडचे ‘ही-मॅन’ धर्मेंद्र यांचा जन्म पंजाबमधील एका लहानशा खेडेगावात झाला. फिल्मफेअरच्या ‘टॅलेंट हंट’ स्पर्धेतून चित्रपटात पहिला ब्रेक मिळाल्यानंतर पंजाबच्या या पुत्तरने कधीच मागे वळून पाहिले नाही. सहा दशकांच्या कारकीर्दीत त्यांनी तीनशेहून अधिक चित्रपटांत काम केले. अॅक्शन, रोमान्स असो वा हलकीफुलकी कॉमेडी, सर्व भूमिका तितक्याच ताकदीने साकारल्या. उतारवयातही ते चित्रपटसृष्टीत सक्रिय होते.
दिलीप कुमार यांच्यापासून अभिनयाची प्रेरणा
धर्मेंद्र यांचा जन्म 8 डिसेंबर 1935 मध्ये पंजाबमधील नसराली येथे झाला. बालपणापासून त्यांना चित्रपटांची आवड. चित्रपटांमध्ये येण्याची प्रेरणा त्यांना ‘ट्रजेडी किंग’ दिलीप कुमार यांच्याकडून मिळाली. दहावीत असताना त्यांनी पहिल्यांदा त्यांचा ‘शहीद’ हा चित्रपट पाहिला. त्यानंतर ते दिलीप कुमार यांचे फॅन झाले. ‘नोकरी करताना, सायकलवरून फिरताना, चित्रपटाच्या पोस्टर्समध्ये मी स्वतःची झलक पाहायचो. सकाळी उठल्यानंतर मी आरशाला विचारायचो, मी दिलीप कुमार होऊ शकतो?’ अशी आठवण धर्मेंद्र यांनी सांगितली होती.
पहिल्या चित्रपटासाठी 51 रुपये मानधन
चित्रपटांच्या आवडीमुळे धर्मेंद्र यांनी फिल्मफेअरने आयोजित केलेल्या ‘टॅलेंट हंट’ स्पर्धेत भाग घेतला. ही स्पर्धा जिंकल्यानंतर पहिला चित्रपट डब्यात गेला. तरीही ते खचले नाहीत. चित्रपट मिळवण्यासाठी निर्मात्यांच्या ऑफिसमध्ये चकरा मारायचे. पैसे वाचवण्यासाठी मैलोन् मैल चालत जायचे. कधीकधी ते चणे खात असत आणि बेंचवर झोपत. अर्जुन हिंगोरानी यांनी त्यांना चित्रपटसृष्टीत पहिला ब्रेक दिला. 1960 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटासाठी धर्मेंद्र यांना फक्त 51 रुपये मानधन मिळाले. त्याच धर्मेंद्र यांनी पुढे ‘शोले’ या चित्रपटातील वीरूच्या भूमिकेसाठी दीड लाख रुपये मानधन घेतले.
शेवटच्या सिनेमाचे पोस्टर आले अन्…
धर्मेंद्र यांच्या निधनाच्या अवघ्या काही तासापूर्वी मॅडरॉक फिल्म्सने सुपरस्टार धर्मेंद्र यांच्या आगामी ’इक्कीस’ या चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. धर्मेंद्र यांच्या शेवटच्या चित्रपटाचे हे पोस्टर पाहून चाहते भावूक झाले आहेत. मोशन पोस्टरमध्ये धर्मेंद्र यांचा आवाज ऐकू येतोय. यामध्ये धर्मेंद्र म्हणतायत की, ‘मेरा बड़ा बेटा अरुण, ये हमेशा इक्कीस का ही रहेगा…’ या चित्रपटात धर्मेंद्र वयाच्या 21व्या वर्षी शहीद झालेल्या सैनिकाच्या वडिलांची भूमिका साकारत आहेत. धर्मेंद्र यांचा हा चित्रपट 25 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. यात अगस्त्य नंदा मुख्य भूमिकेत आहे.
'फूल और पत्थर'ने सुपरस्टार बनवले
स्ट्रगलची काही वर्षे गेल्यानंतर ‘शोला और शबनम’ (1961) या चित्रपटामुळे ते लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले. या चित्रपटातील ‘जाने क्या ढूंढती रहती हैं ये आंखे’ या गाण्यात ते पहिल्यांदा शर्टलेस झाले होते. यानंतर आजही ‘शर्टलेस’ हा ट्रेंड बॉलीवूडमध्ये लोकप्रिय आहे. त्यानंतर आलेल्या ‘अनपढ’ (1962), ‘बंदिनी’, ‘सूरत और सीरत’ (1963), ‘बहारें फिर आएंगी’, ‘दिल ने फिर याद किया’ (1966), ‘दुल्हन एक रात की’ (1967) या चित्रपटांनी त्यांना रोमॅण्टिक हीरोचा दर्जा दिला. 1964 मध्ये प्रदर्शित झालेला ‘आयी मिलन की बेला.’ या चित्रपटात धर्मेंद्रने नकारात्मक भूमिका साकारली होती. ‘फूल और पत्थर’ ने (1966) त्यांना सुपरस्टार बनवले आणि ‘ही-मॅन’ ही पदवी मिळाली. या चित्रपटाने ‘गोल्डन ज्युबिली’ साजरी केली. मीनाकुमारी यांच्यासोबत त्यांची जोडी गाजली. त्यांनी ‘पूर्णिमा’, ‘काजल’, ‘मंझली दीदी’, ‘बहारों की मंजिल’ या चित्रपटांत एकत्र काम केले.
तीनशेहून अधिक चित्रपटांत भूमिका
1960 ते 1980 या दशकात धर्मेंद्र यांनी ‘हकीकत’, ‘अनुपमा’, ‘फुल और पत्थर’, ‘सत्यकाम’, ‘आँखे’, ‘शिकार’, ‘आया सावन झुमके’, ‘मेरा गाव मेरा देश’, ‘सीता और गीता’, ‘राजा जानी’, ‘जुगनू, ‘यादों की बारात’, ’‘प्रतिज्ञा’, ‘धरम वीर’, ‘आग ही आग’, ‘ऐलान ए जंग’, ‘चुपके चुपके’, ‘गुड्डी’, ‘द बार्ंनग ट्रेन’, ‘गुलामी’ अशा चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. ‘शोले’तील जय-वीरू जोडीची जादू आज पन्नास वर्षांनंतरही कायम आहे. नव्वदीच्या दशकानंतर ते चरित्र भूमिकांमध्ये रमले. ‘प्यार किया तो डरना क्या’, ‘अपने’, ‘लाईफ इन अ मेट्रो’, ‘जॉनी गद्दार’, ‘यमला पगला दिवाना’, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटांतील त्यांच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले. ते शेवटचे 2024 साली ‘तेरी बातें में ऐसा उलझा जिया’ चित्रपटात झळकले.
मिळालेले पुरस्कार
- 1997 – फिल्मफेअर जीवनगौरव
- 2012 – पद्मभूषण
प्रत्येक क्षण माझ्या हृदयाजवळ…
धर्मेंद्र आमच्या कुटुंबातील एक सदस्य होते. दिलीप कुमार त्यांना लहान भाऊ मानत होते. दोघे खूप केळ एकत्र घालकायचे. त्यांच्यासारखे कुणी होणार नाही. – सायरा बानो
गुडबाय मित्रा. तुमचं प्रेम आणि तुमच्यासोबतचे क्षण कधी विसरता येणार नाहीत. भावपूर्ण आदरांजली. तुमच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना. – रजनीकांत
आये दिन बहार के या चित्रपटावेळी आमची ओळख झाली. मस्क्युलर मॅचो मॅन अशी प्रतिमा असली तरीही त्यांचा चेहरा निरागस होता. अभिनय, कामाप्रति समर्पण यासारख्या गोष्टी आजच्या पिढीतील अभिनेत्यांनी शिकायला हव्या. – आशा पारेख
धर्मेंद्रजी यांच्या चित्रपटांची जादू गावखेडी, शहरांमध्ये पोहोचली. त्यांनी रिल आणि रिअल लाईफमधील दरी अखंडपणे ओलांडली आणि असंख्य चाहत्यांच्या मनात कायमचे स्थान मिळवले. त्यांचे जाणे माझे वैयक्तिक नुकसान आहे. – राज बब्बर
धर्मेंद्र यांच्यासोबत तीन चित्रपटांत काम करण्याची मला संधी मिळाली. ‘रेशम की डोरी’ या चित्रपटात मी त्यांच्या बालपणीची भूमिका साकारली होती. बॉलीवूडचा हा खरा ‘ही-मॅन’ कायम आपल्या हृदयात राहील. – सचिन पिळगावकर
मी धरमजींसोबत 17 सिनेमे केले आहेत. मी त्यांना कधी रागावलेलं बघितलं नाही, पण शेरोशायरी केली की, ते खुश व्हायचे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो. – मोहन जोशी
काही लोक सदैव तुमच्या हृदयात घर करतात. त्यापैकीच धर्मेंद्र हे होते. त्यांच्या निधनामुळे कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली. – संजय दत्त
पहिली पत्नी असतानाही ‘ड्रीम गर्ल’शी बांधली लग्नगाठ
धर्मेंद्र यांनी वयाच्या 19 व्या वर्षी प्रकाश कौर यांच्याशी लग्न केले. तेव्हा त्यांनी अभिनयातल्या करिअरला सुरुवात केली नव्हती. पहिले लग्न झाले असतानाही धर्मेंद्र तेरा वर्षांनी लहान असलेल्या हेमा मालिनी यांच्या प्रेमात पडले. त्यांची पहिली भेट ‘तुम हसीन मैं जवान’ या चित्रपटावेळी झाली. यादरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. पुढे त्यांनी लग्नगाठ बांधली. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी या जोडीने ‘शोले’सह ‘राजा जानी’, ‘सीता और गीता’, ‘शराफत’, ‘नया जमाना’, ‘जुगनू’, ‘चाचा भतीजा’, ‘तुम हसीन मै जवान’ या चित्रपटांत एकत्र काम केले.
मराठी चित्रपटाच्या गाण्यात झळकले
चांदिवली स्टुडिओचे मालक हेमंत कदम हे धर्मेंद्र यांचे मित्र होते. धर्मेंद्र यांनी आपल्या मित्रासाठी एका मराठी चित्रपटातील गाण्यासाठी शूटिंग केले होते. ‘हिचं काय चुकलं’ या चित्रपटातील ‘घेऊन टांगा सर्जा निघाला…’ या गाण्यात विक्रम गोखले यांच्यासोबत अभिनय केला होता.
मुलीच्या नावाने प्रॉडक्शन हाऊस
धर्मेंद्र यांनी 1983 साली मुलगी विजेता हिच्या नावाने प्रॉडक्शन हाऊस सुरू केले. या प्रॉडक्शनच्या ‘बेताब’ या चित्रपटातून त्यांनी मुलगा सनी देओल याला लाँच केले. पुढे 1995 साली ‘बरसात’ या चित्रपटातून छोटा मुलगा बॉबी देओल याला तर 2019 साली ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटातून नातू करण देओल याला लाँच केले. याशिवाय ‘घायल’, ‘दिल्लगी’, ‘अपने’, ‘इंडियन’, ‘यमला पगला दिवाना’ असे हिट चित्रपट त्यांनी दिले.
गाजलेली गाणी…
- प्रत्येक क्षण माझ्या हृदयाजवळ…
- मी वेडा वेडा वेडा
- ही मैत्री आम्ही तोडणार नाही
- जेव्हा सुंदर स्त्रीला राग येतो
- शायर की गझल ड्रीम गर्ल
- आता साजन सावन मध्ये
- चमकणारे तारे
- आज हवामानाचा मोठा अडथळा आहे
- अरे माझ्या प्रिये
- तुझ्याशिवाय हे हृदय मला वाटत नाही
- जाऊ नकोस मित्रा
- जर तुम्ही विसरला नाही
- तुझी नजर
- मी तुझ्या प्रेमात आहे
एका सीनसाठी केले हजारो रुपये खर्च
‘शोले’मध्ये एक सीन आहे ज्यात धर्मेंद्र हे हेमा मालिनी यांना बंदूक कशी वापरायची हे शिकवतात. चित्रपटातील या सीनच्या शूटिंगदरम्यान धर्मेंद्र स्पॉटबॉयला 20 रुपये द्यायचे, जेणेकरून या सीनसाठी वारंवार रिटेक घेता येईल. हेमा मालिनी यांना पुनः पुन्हा मिठी मारावी यासाठी धर्मेंद्र यांनी अशी शक्कल लढवली होती. त्यावेळी धर्मेंद्र यांनी हे करण्यासाठी हळूहळू दोन हजार रुपये खर्च केले होते.
धर्मेंद्र यांचे गाजलेले डायलॉग
- ठाकूर, तुम्ही कधी जमिनीशी बोललात का? ही भूमी आमची माता (गुलामी)
- डॉग बास्टर्ड मी तुझे रक्त पिईन (आठवणींची मिरवणूक)
- बसंती या कुत्र्यांसमोर नाचू नकोस (शोले)
- गब्बर सिंग, जर तुम्ही एकाला मारले तर आम्ही चार मारू (शोले)
- मी एक एक मारीन (शोले)
- जो घाबरतो त्याला मृत समजा (फुल आणि दगड)
- हा हात नाही, हातोडा आहे, जिथे पडेल तिथे छाप सोडतो (यमला पगला दिवाना)
- बेगम, मला गुपचूप प्रेमाचा आनंद घ्यायचा आहे (चुपके चुपके)
- आपण काय झालो, सारे जग बदमाश झाले (शराफत)
- आम्ही फक्त पैशासाठी काम करतो (लोह)
- नशिबात मरण लिहिले असेल तर कोणी वाचवू शकत नाही, आयुष्य लिहिले असेल तर आईला कोणी मारू शकत नाही (धरमवीर)
लोणावळ्यात स्वप्नातले घर
उतारवयात धर्मेंद्र शहराच्या झगमगाटापासून दूर राहत निसर्गाच्या सान्निध्यात लोणावळ्यातील आपल्या शंभर एकरवर पसरलेल्या फार्म हाऊसवर निवांत क्षण घालवायचे. या फार्म हाऊसचे फोटो ते नेहमी सोशल मीडियावर शेअर करायचे. मी जाट आहे आणि जाटांचे गायी, गुरे आणि शेतीवर प्रेम असते. माझा बहुतेक वेळ हा लोणावळा येथील फार्म हाऊसवर जातो. तिथे आमचा फोकस ऑर्गेनिक शेतीवर आहे, असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.
…म्हणून घेतली पहिली फियाट
धर्मेंद्र हे त्यांच्या करीअरच्या सुरुवातीच्या काळात शूटिंगसाठी सायकलने ये-जा करायचे. मात्र जेव्हा ते एक प्रसिद्ध कलाकार बनले तेव्हा त्यांच्या अनेक मित्रांनी त्यांना गाडी घेण्याचा सल्ला दिला. यानंतर त्यांनी ही फियाट गाडी खरेदी केली. ही गाडी त्यांनी त्यावेळी 18 हजार रुपयांना खरेदी केली होती. ‘भविष्यात चित्रपट चालले नाहीत तर या कारचा टॅक्सी म्हणून उपयोग करेन,’ असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. काही दिवसांपूर्वी या कारचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत ही फियाट माझ्या हृदयाच्या अगदी जवळ आहे, असे त्यांनी म्हटले होते.
Comments are closed.