‘करा किंवा मरा’ सामन्यात साहिबजादा फरहानचे वादळी शतक; असा पराक्रम करणारा दुसरा पाकिस्तानी फलंदाज!

१८ फेब्रुवारी रोजी पाकिस्तान आणि नामीबिया यांच्यात टी-२० वर्ल्ड कप २०२६ चा सामना खेळला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने १९९ धावा केल्या आहेत. पाकिस्तानकडून सलामीवीर साहिबजादा फरहानने शानदार शतकीय खेळी केली. त्याने पाकिस्तानसाठी जबरदस्त कामगिरी प्रदर्शली असून, अखेरपर्यंत टिकून राहत नामीबियाच्या गोलंदाजांची दाणादाण उडवून दिली.
फरहानने ५८ चेंडूंमध्ये नाबाद १०० धावांची खेळी केली. यामध्ये त्याने ११ चौकार आणि ४ षटकार ठोकले. आपल्या या खेळीदरम्यान त्याने १७२.४१ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. याशिवाय सैम अयूबने १२ चेंडूंमध्ये १४ धावा केल्या. टी-२० वर्ल्ड कपच्या इतिहासात शतक झळकावणारा फरहान हा पाकिस्तानचा दुसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी अहमद शहजादने पाकिस्तानसाठी टी-२० वर्ल्ड कपमध्ये शतक झळकावले होते.
सुपर-८ मध्ये पोहोचण्यासाठी पाकिस्तानला हा सामना जिंकणे अत्यंत आवश्यक आहे. जर पाकिस्तान हा सामना हरला, तर ग्रुप ‘A’ मधून युएसए (USA) पात्र ठरेल. अशा स्थितीत पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारली आहे. पाकिस्तानकडून फरहानव्यतिरिक्त कर्णधार सलमान अली आगाने २३ चेंडूंमध्ये ३८ धावांची खेळी केली, तर शादाब खानने २२ चेंडूंमध्ये नाबाद ३६ धावांचे योगदान दिले.
यापूर्वी पाकिस्तानला भारताविरुद्ध लाजीरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला होता. भारताने पाकिस्तानचा ६१ धावांनी पराभव करत सुपर-८ मध्ये प्रवेश मिळवला होता. त्याआधी पाकिस्तानने नेदरलँड्स आणि युएसएचा पराभव केला होता. मात्र, नामीबियाविरुद्धच्या या सामन्यात जर पाकिस्तानचा पराभव झाला, तर युएसए थेट सुपर-८ मध्ये पोहोचेल.
Comments are closed.