पाकिस्तानच्या सलमान आगावर आयसीसीची कारवाई, धावबाद झाल्यानंतर हेल्मेट फेकणं महागात पडलं….

ढाका: पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा वनडे सामना सलमान अली आगा विचित्र पद्धतीनं धावबाद झाल्यानं चर्चेत आहे. सलमान अली आगा ज्या पद्धतीनं धावबाद झाला. त्यावरुन क्रिकेट विश्वात दोन मतप्रवाह दिसून येत आहेत. काही जणांनी बांगलादेशचा सलमान अली आगाला बाद करण्याचा योग्य असल्याचं म्हटलं तर काही जणांनी प्रकार खेळ भावनेच्या विरोधात असल्याचं म्हटलं. या पार्श्वभूमीवर आयसीसीनं सलमान अली आगा याच्यावर कारवाई केली आहे. सलमान अली आगाला तिसऱ्या पंचांनी बाद दिल्यानंतर त्यानं बांगलादेशी खेळाडूंबाबत नाराजी व्यक्त केली होती. सीमारेषेजवळ आगानं त्याचं हेल्मेट आणि ग्लोव्ज फेकले होते. यामुळं आयसीसीनं सलमान आगावर कारवाई केली आहे. आगाच्या खात्यात एक डिमेरिट पॉईंट जमा करण्यात आला आहे.

सलमान आगाला आयसीसीकडून समज

आयसीसीचे मॅच रेफरी नियामूर रशीद यांनी सलमान अली आगाला फटकारलं आहे. सलमान आगाला एक डिमेरिट पॉईंट देण्यात आला आहे. सलमान आगाची कृती क्रिकेटच्या वस्तूंचा दुरुपयोग करण्यासारखी होती. सलमान आगानं यापूर्वी आयसीसीच्या नियमांचं उल्लंघन केलेलं नाही. यामुळं आयसीसीच्या आचारसंहितेनुसार केवळ लेवल 1 ( अनुच्छेद 2.2) चं उल्लंघन सलमान आगाकडून झाल्याचं मानलं गेलं. हा नियम क्रिकेटची उपकरणं ग्लोव्ज, हेल्मेट किंवा बॅट याच्या दुरुपयोगाशी संबंधित आहेत. नियामूर रशीद यांनी हा निर्णय पूर्णपणे निष्पक्ष आणि तटस्थ असल्याचं म्हटलं.

नियामूर यांनी म्हटलं की, विशेष घटनेत मैदानातून बाहेर पडताना क्रिकेटच्या साहित्याचा दुरुपयोग सलमान आगाकडून करण्यात आला. सलमान आगानं यापूर्वी नियमाचं उल्लंघन केलेलं नाही. त्यामुळं त्याला अधिकृतपणे फटकारण्यात आलं आणि एक डिमेरिट पॉईंट देण्यात आला.

नियामूर रशीद यांनी डेली स्टार बांगलादेशला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की सलमान आगा आणि बांगलादेशच्या खेळाडूंमध्ये झालेल्या वादासंदर्भात कोणतंही प्रकरण दाखल करण्यात आलं नाही. ती गैरसमजातून घडलेली घटना होती. याबाबत आयसीसीला रिपोर्ट सोपवण्यात आला आहे, असंही ते म्हणाले.

बांगलादेशच्या शेर-ए- बांगला राष्ट्रीय मैदानात झालेल्या दुसऱ्या वनडे मॅचमध्ये पाकिस्ताननं डकवर्थ लुईस नियमानुसार बांगलादेशचा 128  धावांनी पराभव केला होता. पाकिस्ताननं तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. पहिल्या वनडे सामन्यात बांगलादेशनं पाकिस्तानचा पराभव केला होता.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.