विद्यार्थी आंदोलनाला आधी पाठिंबा, नंतर आंदोलन मागे घेण्याचं आवाहन; सलमानच्या यू-टर्नवर सोशल मीडियावर टीकेची झोड

अभिनेता सलमान खानने दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाबाबत केलेल्या नव्या सोशल मीडिया पोस्टमुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बुधवारी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवल्यानंतर गुरुवारी त्याने भूमिका बदलल्याचं दिसून आलं. नव्या पोस्टमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन थांबवून घरी परतावं, असं आवाहन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करतील, असा विश्वास व्यक्त केला. तसेच सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनीही उपोषण सोडावं, असंही त्याने म्हटलं.

सलमानच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली असून, काहींनी त्याच्या भूमिकेचं समर्थन केलं असलं तरी मोठ्या प्रमाणावर नेटकऱ्यांनी त्याच्यावर टीका केली आहे. त्यामुळे विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सेलिब्रिटींच्या भूमिका पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहेत. असे वृत्त टीव्ही 9 ने दिले आहे.

मात्र सलमानच्या या भूमिकेमुळे सोशल मीडियावर अनेकांनी त्याच्यावर टीकेची झोड उठवली. “जर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करू शकत नसशील, तर गप्प राहा”, अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने दिली. “लोकांना वाटलं होतं की हा वाघ आहे, पण तो उंदीर निघाला”, असा टोला दुसऱ्याने लगावला. “तुझं हे ट्विट तुझ्या मागच्या तीन चित्रपटांपेक्षाही वाईट आहे”, अशा शब्दांतही अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

युट्यूबर ध्रुव राठीनेही सलमानच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत, “तुझ्या चित्रपटावर बंदी घालण्याची धमकी देण्यात आली आहे का?” असा सवाल केला. तसेच सरकारवर टीका करत सलमानने दबावाखाली भूमिका बदलल्याचा आरोपही त्याने केला.

Comments are closed.