विशेष- मराठी भाषेचे वैभव, अक्षरांचा ‘पत्रमैत्री’ उत्सव

>> स्वप्नील साळसकर

निकेत पावसकर या तरुणाने वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गजांच्या अभिप्रायाचे संदेशपत्र जमा करीत 'पत्र उत्सव’ हा उपक्रम साकारला आहे. मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने तळेरेसारख्या ग्रामीण भागातील या उपक्रमाबाबत जाणून घेऊया.

डिजिटल क्रांतीच्या ओघात हाताने लिहिलेली सुवाच्य हस्ताक्षरे आणि साहित्याचा वारसा जपण्याचे मोठे कार्य सिंधुदुर्गातील तळेरे येथील निकेत पावसकर करीत आहे. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ निकेत ‘अक्षरोत्सव’ या उपक्रमाच्या माध्यमातून संदेशपत्रांचे महत्त्व रुजवित आहे.

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने आपण भाषेचा अभिमान बाळगत असताना तळेरेसारख्या ग्रामीण भागातील हा उपक्रम सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. केवळ एका पत्राच्या माध्यमातून जगभरातील दिग्गजांशी ‘पत्रमैत्री’ जुळवण्याचा चमत्कार या संग्रहाने करून दाखवला. डिजिटलच्या जमान्यात जेव्हा मुले लेखणीपासून दूर जात आहेत, अशा काळात ‘अक्षरोत्सव’ने  त्यांना पुन्हा जवळ आणण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ एक संग्रह म्हणून मर्यादित न राहता या उपक्रमाने मुलांच्या मनात साहित्याची ओढ निर्माण करण्याचे मोठे काम सुरू केले. या संग्रहाचे सर्वात मोठे वैशिष्टय़ म्हणजे सुप्रसिद्ध कवी
विं. दा करंदीकर यांच्या पत्रापासून सुरू झालेल्या या संग्रहात देश-परदेशातील तब्बल दोन हजार दिग्गज व्यक्तींच्या हस्ताक्षरातील संदेशांचा समावेश आहे. केवळ स्वाक्षरी नाही, तर त्या व्यक्तींच्या भावना व्यक्त करणारी संदेश पत्रे हे या संग्रहाचे वैभव आहे. यामध्ये नोबेल विजेते, भारतरत्न, पद्म पुरस्कार सन्मानित व्यक्तींपासून ते ज्ञानपीठकार आणि साहित्य अकादमी विजेत्यांपर्यंतच्या मान्यवरांच्या अक्षरांचा ओलावा जपलेला आहे.

या संग्रहात प्रामुख्याने मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील पत्रे असली तरी संस्कृत, कोकणी, मोडी, ब्राम्ही, चायनीज आणि अंधांसाठीची ब्रेल लिपी अशा विविध लिपींमधील संदेशांचा खजिना येथे पाहायला मिळतो. गेल्या दोन दशकांत या संग्रहाने राज्याच्या विविध भागांत प्रदर्शने भरवून मराठी भाषेचे वैभव जनसामान्यांपर्यंत, विशेषत शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले आहे.

या चळवळीने कोणत्याही एका क्षेत्रापुरते स्वतला मर्यादित ठेवलेले नाही. यात साहित्य व कला (साहित्यिक, चित्रपट कलाकार, नाटय़कर्मी, चित्रकार), विज्ञान व प्रशासन (शास्त्रज्ञ, प्रशासकीय अधिकारी), समाजकारण व राजकारण (स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, समाजसेवक), क्रीडा व इतर (खेळाडू, जागतिक विक्रमवीर, सुलेखन आणि धार्मिक क्षेत्रातील व्यक्ती ) यांचा प्रामुख्याने समावेश आहे. या वेळी संदेश पत्र संग्राहक पावसकर म्हणाले की, हा संग्रह केवळ पाहण्याचा नाही, ऐकण्याचा नाही, तर तो प्रत्यक्ष वाचून अनुभवण्याचा संग्रह आहे. यातून शालेय मुलांच्या मनात जिद्द निर्माण करणारी ऊर्जा मिळते. हे ‘अक्षरांचे मोती’ आपल्या पुढच्या पिढीसाठी मार्गदर्शक आणि गुरूची भूमिका बजावत आहेत. मुलांनी या विचारांतून बोध घ्यावा आणि आपल्या यशस्वी आयुष्यासाठी नवी वाट चोखाळावी, हाच आमचा प्रामाणिक उद्देश आह

एक फिरते विद्यापीठ

अक्षरोत्सव संग्रहाची प्रदर्शने म्हणजे ज्ञानाचा खजिनाच असतो. राज्याच्या विविध जिह्यांत, शाळा-महाविद्यालयांत भरलेली ही प्रदर्शने पाहून अनेक मान्यवरांनी आश्चर्य व्यक्त केले. ही प्रदर्शने केवळ पाहण्यासाठी नसून त्यातून विद्यार्थ्यांना आपली संस्कृती किती प्रगल्भ आहे याची जाणीव करून दिली जाते. अशी 25 प्रदर्शने भरविण्यात आली आहेत.

अक्षरघराला यांनी दिली भेट

अनोखी संकल्पना असलेल्या अक्षरघराला विविध क्षेत्रांतील व्यक्तींनी भेट देऊन प्रशंसा केली आहे. ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत डॉ. सुनिलकुमार लवटे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर, आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू पूनम राऊत, फुटबॉल खेळाडू जयेश राणे, अभिनेते, दिग्दर्शक संजय खापरे, कवी गीतकार प्रसाद कुलकर्णी, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या नेमबाज रोहिणी हवालदार, लेखक रविप्रकाश कुलकर्णी अशा अनेक व्यक्तींनी भेट देऊन अक्षरघराचे कौतुक केले.

परदेशी व्यक्तींची पत्रे संग्रहात

या संग्रहामध्ये जागतिक कीर्तीचा खेळाडू, टेनिसच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळाडू रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड), मुहम्मद युनुस (बांगलादेश), आयर्लंड देशाचे पंतप्रधान
डॉ. लिओ वराडकर, युरोपियन सेंट्रल बँकेचे चेअरमन मारिओ ड्राघी (जर्मनी), हॉलीवूड निर्माता अभिनेता दिग्दर्शक सर मायकेल केन (लंडन), अभिनेता जॅकी चेन, अमेरिकन अभिनेत्री कँरोल अल्ट, वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे प्रिमीयर मार्क मँकगोवन, सुप्रसिद्ध टेनिस खेळाडू स्टेफी ग्राफ, नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ डॉ. अभिजित बॅनर्जी (अमेरिका) यासह अनेक परदेशी व्यक्तींच्या पत्रांचा समावेश आहे.

swapnilsalaskar2008@gmail.com

Comments are closed.